|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत-लंका तिसरी कसोटी आजपासून,

भारत-लंका तिसरी कसोटी आजपासून, 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विजयरथावर स्वार झालेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया शनिवारपासून येथे लंकेविरुद्ध सुरू होणाऱया तिसऱया व व शेवटच्या कसोटीत लागोपाठ नववी मालिका जिंकून नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने उतरणार आहे. कर्णधार कोहलीसमोर मात्र सलामीवीर निवडण्याची गोड समस्या असणार आहे.

भारताने नागपूरमध्ये झालेल्या दुसऱया कसोटीत एक डाव 239 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने याआधी गेल्या आठ कसोटी मालिका जिंकल्या असून ही कसोटी अनिर्णीत राखली तरी हा भारतासाठी नववा मालिकाविजय ठरणार आहे. असे झाल्यास भारताची ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या  9 मालिका जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी होईल. भारताने 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत शेवटची मालिका गमविली होती. चार सामन्यांची ती मालिका ऑस्ट्रेलियाने 2-0 फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारताने 9  मालिका खेळल्या आणि त्यापैकी आठ मालिका जिंकल्या असून ते इतिहास रचण्याच्या मार्गावर आहेत. या कालावधीत भारताने मायदेशात 5, लंकेत 2 व विंडीजमध्ये एक मालिका जिंकली आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱया टीम इंडियाने मायभूमीत नेहमीच पाहुण्या संघांवर वर्चस्व गाजविले आहे. 2012-13 मध्ये इंग्लंडविरुद्धची चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने गमविल्यानंतर मायदेशातील सात मालिका जिंकलेल्या आहेत. या कालावधीतील 23 पैकी 19 कसोटी जिंकल्या तर केवळ एक कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमविली.

सलामीची अडचण

लंकेचे या मालिकेतील आतापर्यंतचे प्रदर्शन पाहता त्यांच्याकडून फारसा प्रतिकार झालेला नाही. त्यामुळे सामन्यात चुरस निर्माण होण्यासाठी त्यांच्या सर्वच प्रमुख फलंदाजांना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. याशिवाय त्यांचे गोलंदाजही फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. कोहलीसमोर मात्र सलामीला कोणाची निवड करावी, ही अडचण निर्माण झाली आहे. शिखर धवन पुन्हा दाखल झाला असून धवन, राहुल व मुरली विजय यापैकी दोघांची त्याला निवड करावी लागणार आहे. गोलंदाजांत मोहम्मद शमी फिट झाला असला तरी इशांत शर्मा अंतिम संघात कायम राहण्याची शक्मयता आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाज ढेपाळल्यानंतर दुसऱया डावात धवन (94) व राहुल (79) यांनी अर्धशतके झळकवली. या कसोटीत वगळलेल्या मुरली विजयला दुसऱया कसोटीत धवन नसल्याने संधी मिळाली आणि शतक (128) झळकवले. त्यामुळे आता धवन संघात पुन्हा दाखल झाल्याने तिघांपैकी दोघांना निवडावे लागणार आहे. जर कोहलीने या कसोटीतून बाहेर राहण्याचे ठरविले तर या तिघांना संघात स्थान मिळू शकेल. अशा स्थितीत राहुल चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो.

जलद खेळपट्टी?

या मालिकेनंतर भारतीय संघ द.आफ्रिका दौऱयावर जाणार असून त्याआधीची ही शेवटची कसोटी असणार आहे. त्यामुळे संघव्यवस्थापनाच्या इच्छेनुसार कोटलाच्या खेळपट्टीवर हिरवळ ठेवण्यात येण्याची शक्मयता आहे. कोलकाता कसोटीत हिरवळयुक्त खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला होता. पण नागपूर कसोटीत फिरकी गोलंदाज प्रभावी ठरले होते. त्यामुळे कोलकात्याप्रमाणे पाच की नागपूरप्रमाणे 4 गोलंदाज या सामन्यात खेळवायचे हा प्रश्न संघव्यवस्थापनापुढे असेल. पाच गोलंदाज खेळवले तर उपकर्णधार अजिंक्मय रहाणेला संघाबाहेर रहावे लागेल. या मालिकेतील एकाही डावात त्याला दुहेरी धावसंख्याही गाठता आलेली नाही. रोहित शर्माने दीर्घ काळानंतर कसोटीत पुनरागमन करून शतकी खेळी केली असल्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेणे कठीण जाऊ शकते.

कोटलावर शानदार रेकॉर्ड

कोटलामध्ये गेल्या 30 वर्षांत भारत अपराजित राहिले असून येथे झालेल्या गेल्या 11 पैकी 10 सामन्यात भारताने विजय मिळविला आहे तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. या मैदानावर भारताने आतापर्यंत 33 कसोटी खेळल्या असून त्यापैकी 13 जिंकल्या आणि 6 गमविल्या आहेत तर 14 सामने अनिर्णीत राहिले आहेत. नोव्हेंबर 1987 मध्ये भारताने या मैदानावर विंडीजविरुद्ध शेवटचा पराभव स्वीकारला होता. लंकेचा या मैदानावर फक्त एक सामना झाला असून डिसांबर 2005 मधील या सामन्यात त्यांना भारताकडून 188 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. कोलकात्यातील पहिला डाव वगळता भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत प्रभावी प्रदर्शन केल आहे. कोहलीने तीन डावात दोन शतकांसह 317 धावा जमविल्या असून 5000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त 25 धावांची गरज आहे. त्याने आतापर्यंत 62 कसोटीत 51.82 च्या सरासरीने 4975 धावा जमविल्या आहेत.

भारतीय संघ : कोहली (कर्णधार), मुरली विजय, राहुल, धवन, पुजारा, रहाणे, साहा, रोहित शर्मा, अश्विन, जडेजा, इशांत शर्मा, उमेश यादव, शमी, विजय शंकर, कुलदीप यादव.

लंका संघ : चंडिमल (कर्णधार), करुणारत्ने, समरविक्रमा, थिरिमने, डिकवेला, मॅथ्यूज, दिलरुवान परेरा, क्हान्डरसे, रोशन सिल्वा, शनाका, लकमल, गमगे, संदकन, धनंजय डिसिल्वा.

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 पासून.

Related posts: