|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून घोडावत विद्यापीठाचे डॉ. दादा नाडे यांना मिळाला स्पेस मॉनिटर

अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून घोडावत विद्यापीठाचे डॉ. दादा नाडे यांना मिळाला स्पेस मॉनिटर 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

संजय घोडावत विद्यापीठाचे अवकाश वैज्ञानिक डॉ. डी. पी. नाडे यांना अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून सुपर एसआयडी स्पेस वेदर मॉनिटर मिळाला आहे. डॉ.नाडे यांच्या वातावरणातील आयनांबर थराच्या संशोधनाची दखल घेऊनच या विद्यापीठाने हि भेट प्रदान केली आहे. सदर स्पेस मॉनिटर स्टॅनफोर्ड विद्यापीठ व नासा यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेला आहे.

सूर्याच्या अंतरंगामध्ये अनेक नैसर्गिक घटना सातत्याने घडत असतात. त्याच्याविषयी अनेक वैज्ञानिकांना कुतुहूल असल्यामुळे  संपूर्ण जगात संशोधनात्मक अभ्यास सुरु आहे. या स्पेस मॉनिटरच्या मदतीने सूर्यावरती होणाऱया घडामोडीचा परिणाम आयनांबरावरती कसा होतो याचा अभ्यास करता येणार आहे. सूर्यावरच्या सौर वादळ, कोरोनल मास इजेक्शन, सौर डाग, या घटकांचा परिणाम प्रामुख्याने मोबाईल कम्युनिकेशन, नेव्हिगेशन आणि जी.पी.एस. सारख्या अत्यंत महत्वाच्या दळणवळण साधनांवरती होतो. याचा सर्व अभ्यास या स्पेस मॉनिटरने करता येतो. नासा व स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून संवेदनशील असणाऱया या संशोधनासाठी  अशा प्रकारचे मॉनिटर नेटवर्क तयार करीत आहेत.

गेल्या काही महिन्यापूर्वीच संजय घोडावत यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठाला अभ्यास भेट दिली होती, या भेटीदरम्यान समाजोपयोगी संशोधनासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली होती. त्याअनुषंगाने संजय घोडावत विद्यापिठाची झालेली निवड हि विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे.

अवकाश व हवामान शास्त्र या समाजोपयोगी संशोधनाचे कार्य डॉ. नाडे हे सातत्याने विद्यापीठात करीत आहेत. समाजामध्ये जनजागृती व भविष्यमधील या संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी डॉ. नाडे हे प्रयत्नशील आहेत.

डॉ. नाडे यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरू डॉ. व्ही. ए. रायकर यांच्या हस्ते डॉ. नाडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, या संशोधनातून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी विद्यापीठाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, या संशोधनातून प्राप्त होणाऱया ज्ञानाचा समाजासाठी उपयोग होणार आहे, असे सांगून डॉ. नाडे यांचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या उपकरणाचे उद्घाटन झाले.

यावेळी कुलसचिव डॉ .बी. एम. हिर्डेकर, संचालक. डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी, विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए डी सावंत, डॉ. संतोष माने, डॉ. राणी पवार, डॉ. संध्या जगदाळे, प्रा. एस. बी. वाटेगावकर, संशोधक विद्यार्थी स्वप्नील पोतदार आदी उपस्थित होते.

Related posts: