|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अतिक्रमण पथकावर दगडफेक

अतिक्रमण पथकावर दगडफेक 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 अनधिकृत केबिन, फुटपाथवरील अतिक्रमणावरून धडक कारवाई सूरू असताना गुरूवारी महापालिका कर्मचाऱयांवर दगडफेक झाली. गुरुवारी  सागरमाळ येथील रेडय़ाची टक्कर चौकातील केबिनवरील कारवाईवेळी मनपा कर्मचारी, केबिनधारक भिडले. केबिनची तोडफोड झाल्ल्याने केबिनधारकांनी कर्मचाऱयांवर दगडफेक व शिवीगाळ करत जेसीबी चालक, दोन कर्मचाऱयांना मारहाण केली.  कर्मचारीनी आक्रमक पवित्रा घेत होऊन सर्व केबिन जमीनदोस्त केल्या. या कारवाईमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पाच केबिनधारकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

महापालिकेने गेल्या चार दिवसांपासून अनधिकृत केबिन, फुटपाथवरील
अतिक्रमणावर कारवाई सुरु केली आहे. गुरुवारी शाहूनाका ते सायबर चौक, सायबर चौक ते सागरमाळ परिसर येथील अनधिकृत केबिनवर कारवाई करण्यात आली. सायबर चौक येथे अतिक्रमणवरील कारवाईसाठी महापालिकेचे कर्मचारी आल्यानंतर केबिनधारकांनी प्रचंड विरोध केला. माजी नगरसेवकाने कारवाईवेळी हस्तक्षेप करत शहरात सर्वच ठिकाणी कारवाई झाली पाहिजे असा दम इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांना दिला. यानंतर सागरमाळ, रेडय़ाची टक्करी चौकातील वि.स. खांडेकर शाळेच्या सरंक्षक भिंतीला लागून असणाऱया अनधिकृत केबिनवर कारवाई करण्यासाठी सर्व मनपा कर्मचारी आले.

येथील ओम पोहे सेंटर, अभिशिला टेलर्स याच्यासह पाच ते सहा केबिनधारकांनी कारवाईला विरोध केला. यावेळी उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, अतिक्रमन निर्मुलन पथक प्रमुख पंडित पोवार यांच्याशी त्यांनी हुज्जत घातली. यावेळी जेसीबीच्या सहायने केबिन डंपरमध्ये टाकताना  केबिनधारक आक्रमक झाले. मनपाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. उपशहर अभियंता घाटगे, मस्कर व पंडित पोवार यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही यावेळी घडला. केबिनची तोडफोड होणार असे लक्षात आल्यानंतर एका केबिनधारकांने आम्ही प्रशासनाला नेहमी सहकार्य करतो. साहित्य काढून घेण्यासाठी थोडावेळ द्या, अशी विनंती केली. यानंतर केबिनमधील साहित्य बाहेर काढण्यात आले. वादावादी होत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर या ठिकाणी आले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून शीघ्रकृती दलास बोलवून घेतले.

जीसीबी चालकाला मारहण, कर्मचाऱयांवर दगडफेक

रेडय़ाच्या टक्करी चौकात वातावरण तणावपूर्ण होत असल्याने अतिरिक्त पोलीस दल दाखल झाले. याचवेळी रिकामी झालेली केबिन फुटपाथवरून रस्त्यावर हालवताना आक्रमक झालेल्या केबिनधारकाने जेसीबी चालक शंकर पाटील यास मारहाण करण्यास सुरवात केली. या प्रकारमुळे मनपा कर्मचारीही चिडले. त्यांनी सर्व केबिन जमिनदोस्त करण्याचा सपाटा लावला. याचवेळी केबिनधारक व कर्मचाऱयांमध्ये हाणामारी सुरु झाली. डोळय़ा समोर केबिन भुसपाट होत असल्याच्या पाहून केबिनधारकांनी कर्मचाऱयांच्या दिशेन दगडफेकही केली. केबिन घेऊन जाऊ नये म्हणून केबिनमध्ये काही केबिनधारक जाऊन बसले. पोलीसाच्या सहायने त्यांना बाहेर काढून केबिनवर कारवाई केली.

पाच केबिनधारक ताब्यात

महापालिकेने अचानक कारवाई केल्यामुळे केबिनधारकांनी विरोध करण्यास सुरवात केली. नोटीस दिलेले नाही आणि कारवाई कशी करता, बायोमेट्रीक कार्डही आमच्याकडे आहे, केबिन काढल्यानंतर आम्हाला मनपामध्ये नोकरी देणार का? शहरामध्ये इतरही अनधिकृत बांधकामे असून त्यांच्यावर पहिला कारवाई करा, असे सवाल करण्यात आले. आठ दिवसापूर्वी अनधिकृत केबिनवर कारवाई करणार असल्याचे जाहिर केले होते, असे सांगून मनपा कर्मचारी कारवाईवर ठाम राहिले. जेसीबीच्या सहायने केबिन डंपरमध्ये ठेवण्यास सुरवात केल्यानंतर मनपा कर्मचारी, केबिनधारक आमने-सामने आले. केबिनधारकांनी जेसीबी चालकास मारहाण करत दगडफेक केली. यावर पोलीसांनी पाच केबिनधारकांना ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, महापालिकेच्या विरोधात केबिनधारकांनी जारेदार घोषणाबाजी केली.

 बडय़ा पदाधिकाऱयाच्या मुलाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न

रेडय़ाच्या टकरी चौकातील उद्यान शेजारील फुटपाथवरील लहान केबिन कर्मचाऱयांनी ताब्यात घेतली. यावेळीही किरोकळ वादावादी झाली. केबिन परत देण्यासाठी मनपामधील एका बडय़ा पदाधिकाऱयाच्या मुलाने अतिक्रमन निर्मुलन पथक प्रमुख पंडित पोवार यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

वातावरण तंग झाल्यानंतर पोलीस दाखल

अतिक्रमणावरील कारवाई करण्यासंदर्भात महापालिकेमध्ये पोलीस प्रशासनासमवेत बैठक झाली होती. यावेळी पोलीस उपाधीक्षक डॉ. अमृतकर यांनी पोलीसांचा फौजफाटा देऊ, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्ष कारवाईवेळी केवळ पाच ते सहाच पोलीस दिले जात आहेत. गुरुवारीही दिवसभर तोगडा पोलीस बंदोबस्त होता. रेडय़ाच्या टक्करी चौकात तणावपूर्ण वातावरण झाले. मनपा अधिकाऱयांनी डॉ. अमृतकर यांना फोन करून परिस्थतीची माहिती दिली. यानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.

दिवसभरात 42 केबिनवर हातोडा

महापालिकेच्यावतीने गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईवेळी 42 अनधिकृत केबिन व टपऱयांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये शाहू नाका परिसर-6, शांतिनिकेतन रोड-1, सायबर चौक-19, एन.सी.सी ऑफीस 7, रेडय़ाची टक्कर चौक-9 केबिनचा समावेश आहे.

कारवाई केलेल्या ठिकाणी आज पुन्हा कारवाई

मनपाकडून सोमवारपासून अतिक्रमणावर कारवाई सुरु आहे. चारही विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत. शुक्रवारी नवीन ठिकाणी कारवाई करण्यात येणार नाही. कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून शुक्रवारी यापूर्वी कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा कारवाई केली जाणार आहे.

 

Related posts: