|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ग्रामीण पोलिसांच्या 65 चारचाकी गाडय़ांना जीपीएस

ग्रामीण पोलिसांच्या 65 चारचाकी गाडय़ांना जीपीएस 

डॉ. विजय भटकर यांच्याहस्ते ग्रामीण नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

 

प्रतिनिधी/ सोलापूर

ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोलिंगसाठी असणाऱया 65 चारचाकी गाडय़ांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आले असून, कोणती गाडी कोणत्या भागात आहे, दिवसभरात किती किलोमीटर फिरली आहे, गाडीचा चालक कोण आहे, एकाच ठिकाणी का थांबली आहे, अशी संपूर्ण माहिती जीपीएसच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातून ऑर्डर देणे सुलभ होणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी दिली आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात नागरिकांसाठी ‘ई-तक्रार केंद्र’ आणि डिजिटल ‘नियंत्रण कक्ष नुतनीकरण’ चे उद्घाटन पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, पोलीस उपअधिक्षक युन्नुस अत्तार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना कदम, सायबर गुन्हे शाखेचे रविंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

उद्घाटनाप्रसंगी पद्मभूषण विजय भटकर म्हणाले, दिवसेंदिवस संगणकीय क्षेत्रात प्रगती होत आहे. यासोबत सायबर गुन्हेही वाढत आहेत. लोकांनी ऑनलाईन व्यवहार काळजीपूर्वक केले पाहिजे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारनेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाची माहिती पोलिसांना शिकविणे गरजेचे झाले आहे. सायबर गुह्यांवर आळा घालण्यासाठी मोठी टेक्नॉलॉजी तयार केली पाहिजे. तसेच सॉफ्टवेअर क्षेत्रातही दररोज बदल घडत आहेत. याचेही ज्ञान पोलिसांना दिले पाहिजे.

ई-तक्रार केंद्र

नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार महाराष्ट्र पोलीस दलाबाबत महत्त्वाची माहिती ही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नागरिकांना आता घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोणत्याही जिह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यास दाखल असलेल्या गुह्यांची प्रथम खबर मिळेल. यामध्ये हरवलेल्या व्यक्तीबाबत माहिती, गुन्हेगार, अटक आरोपी, हरवलेली मालमत्ता, चोरीस गेलेली वाहने, अनोळखी मृतदेह, सार्वजनिक मंडळाबाबत माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

तसेच नागरिकांची पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून न घेतल्यास थेट ई-तक्रार केंद्रात नोंदवू शकता. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर संबंधीत पोलीस ठाण्यास याची माहिती देवून पुढील कारवाई केली जाणार. यासाठी www. mhpolice. maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. या ई-तक्रार केंद्रावर पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांचे नियंत्रण असणार आहे.

ऑनलाईन तक्रार कशी करावी?

नागरिकांनी ऑनलाईन तक्रार देण्यासाठी प्रथम  www. mhpolice. maharashtra. gov. in या संकेत स्थळाला भेट द्यावी. सिटीजन पोर्टल सुविधेतील ऑनलाईन सर्व्हिसेस या टॅबवर क्लिक करावे. नागरिकांनी सिटीझन पोर्टलमध्ये स्वतःचे रजिस्ट्रेशन करुन नविन अकाउंट तयार करावे. त्यानंतर स्वतःचे अकाउंट लॉगईन करुन ऑनलाईन तक्रार दाखल करावी.

‘प्रतिसाद’ मोबाईल ऍप

आपत्कालीन प्रसंगी पीडित नागरिकांना विशेषतः महिला व मुलींना तात्काळ पोलिसांची मदत मिळण्यासाठी ‘प्रतिसाद’ ऍप तयार करण्यात आले आहे. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. ऍप डाऊनलोड केल्यानंतर स्वतःची पूर्ण माहिती भरुन नोंदणी करावी. लॉगइन केल्यानंतर त्यात ‘हेल्प’ हे ऑप्शन दाबल्यास ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात सायरन वाजेल. तेथील उपलब्ध पोलीस अधिकाऱयांना तुमचे लोकेशन मिळेल. जेणे करुन त्या भागात पेट्रोलिंगसाठी असणाऱया पोलीस अधिकाऱयांना मदतसाठी पाठविले जाते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे इंटरनेट नसतानाही या ऍपचा वापर करु शकतो, अशी माहिती विरेश प्रभू यांनी दिली.

Related posts: