|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जानवलीत पाच लाखाचे दागिने लंपास

जानवलीत पाच लाखाचे दागिने लंपास 

कणकवली

कणकवली शहरानजीकच्या जानवली-रामेश्वरनगर येथील सौ. सुजाता गणपत सावंत (43) यांचे जेमतेम तीन तासांसाठी बंद असलेले घर अज्ञात चोरटय़ाने फोडले. ही घटना शुक्रवारी सकाळी 10.15 ते दुपारी 1.30 या वेळेत घडली. तब्बल पाच लाखांचे दागिने चोरटय़ाने लंपास केले. या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांत भीती पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता सावंत यांचे जानवली रामेश्वरनगर येथे दुमजली घर आहे. तेथे त्या पती गणपत, मुलगी व मुलगा यांच्यासमवेत राहतात. त्यांचे पती गणपत हे एलआयसी कार्यालयात नोकरीला आहेत. शुक्रवारी सकाळी 10.15 वा. सुमारास सर्व कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी 1.30 च्या सुमारास सुजाता व पती गणपत असे दोघेजण घरी आल्यानंतर ही घरफोडी झाल्याचे उघडकीस आले.

कपाट अस्ताव्यस्त

घरी आलेल्या सावंत दाम्पत्याने घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप उघडले. मात्र, आतील ‘लॅच’ला जाताना लॉक केले नव्हते, तरीही ‘लॅच’ला आतून लॉक असल्याचे निदर्शनास आले. सावंत यांनी चावीने लॅच उघडत घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील लाईट सुरू दिसली. त्यांनी घराच्या बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता आतील उघडलेले कपाट व अस्ताव्यस्त असलेले सामान पाहून चोरीची घडल्याचे समजले. चोरटय़ाने नजीकच असलेल्या चाव्या शोधून कपाट उघडले होते. कपाटातील सामान अस्ताव्यस्त होते. दागिन्यांचे रिकामे डबेही बेडवर पडले होते. दागिन्यांच्या पिशव्या फरशीवर पडल्या होत्या.

चोरटय़ाचा मागील दरवाजाने केला प्रवेश

दरम्यान त्यांनी पाहणी केली असता घराच्या किचनरुमचा दरवाजा काहीसा उघडा दिसला. त्यांनी पाहिले असता दरवाजाचे आतील लॉक तुटलेले होते. चोरटय़ाने याच दरवाजाने येत दरवाजाला जोराची धडक देऊन कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते.

पाच लाखांचे दागिने चोरीस

पुढे सावंत यांनी पाहणी केली असता कपाटातील दागिने चोरीस गेल्याचे आढळले. यात दोन तोळय़ांचा सोन्याचा हार, 17 ग्रॅमचा सोन्याचा हार, सहा तोळय़ांच्या सोन्याच्या दोन बांगडय़ा, सोन्याच्या साडेतीन तोळय़ांच्या सहा आंगठय़ा, 10 ग्रॅमच्या कानातील रिंगजोड, सोन्याचा रिंग, 11 ग्रॅमचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमच्या 15 अंगठय़ा, एक तोळय़ाची सोन्याची चेन, पाच ग्रॅमची सोन्याची चेन, तीन ग्रॅमची नथ व दोन हजार रुपये रक्कम मिळून सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

सावंत यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत व पोलीस दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यात बेडरुममध्ये बेडवर एक लोखंडी पट्टी पडलेली होती. ही पट्टी आपल्या घरातील नसल्याचे सावंत कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्वान घरापासून फिरत फिरत एका पायवाटेवर येत तेथून याच परिसरातील एका मंदिराजवळून जात पुन्हा तरंदळे रस्त्यावर आले. दरम्यान ठसे तज्ञांनाही बोलावण्यात आले होते.

सुजाता यांचे पती गणपत हे काहीसे आजारी आहेत. पतीच्या औषधोपचारासाठीच सुजाता यांनी सदरचे दागिने बँक लॉकरमधून घरी आणले होते. मात्र, चोरटय़ाने डल्ला मारल्याने संपूर्ण कुटुंबीय चिंतेत पडले आहे. घटनेबाबत सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरटय़ावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरा सुरू होती.

पोलिसांकडून तपासणी मोहीम

दरम्यान, पोलीस चौकशीत याच परिसरातील एका व्यक्तीला परिसरात एक महिला व पुरुष संशयास्पद स्थितीत दिसले होते. तर अलिकडेच गोवा परिसरात झालेल्या एका चोरीतही महिला व पुरुषाची जोडी ‘सीसी टीव्ही’मध्ये कैद झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील हॉटेल, लॉजिंगची तपासणी करतानाच रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले. मात्र, चोरटय़ांचा मागमूस लागू शकलेला नाही.

 

Related posts: