|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोली बुश फ्रॉग’वर लारव्यांचा हल्ला

आंबोली बुश फ्रॉग’वर लारव्यांचा हल्ला 

शेखर सामंत/ सिंधुदुर्ग

करवतीसारखे धारदार दात असलेल्या आणि शिकाऱयाचीच शिकार करण्यात माहीर असलेल्या ‘इपोमीस’ नावाच्या खतरनाक लारव्यांनी जगातील अतीदुर्मीळ म्हणून ओळखल्या जाणाऱया आणि संपूर्ण जगात फक्त आंबोलीच्याच पट्टय़ात सापडणाऱया ‘आंबोली बुश फ्रॉग’ या बेडकांच्या प्रजातीवर हल्ला केला असल्याचे निदर्शनास आले आहे.

 भक्ष समजून खाण्यासाठी अंगावर धावून येणाऱया बेडकाच्या जबडय़ावरच हा लारवा हल्ला करून थेट त्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि अवघ्या काही तासात जिवंतपणे त्याला आतून पोखरून फस्त करतो. अतिशय धोकादायक अशा या लारव्यांच्या हल्ल्यामुळे आंबोलीतील ही अतीदुर्मीळ बेडकांची जात धोक्यात तर आली नाही ना, अशी भीती वर्तविली जात आहे.

आंबोली येथील मलबार नेचर क्लबचे निसर्ग अभ्यासक महादेव भिसे आणि अनिश परदेसी (पुणे) यांनी ही बाब जगभरतील निसर्ग अभ्यासकांच्या निदर्शनास आणली आहे. आंबोलीतील बेडकांच्या प्रजातीवरील हा धोका आहे की हे जैवविविधतेच्या चक्रातील नैसर्गिक कंट्रोल आहे, याचा शोध संशोधकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

भिसे यांच्या ‘आंबोली बुश फ्रॉग’च्या एका छायाचित्राला आंतरराष्ट्रीय पारितोषिक नुकतेच प्राप्त झाले. या पारितोषिकामुळे भिसे यांचे व त्यांनी काढलेल्या छायाचित्राचे बरेच कौतूक झाले. परंतु या छायाचित्रातील त्या बेडकावर झालेल्या ‘इपोमीस’ या लारव्याच्या लागणीबाबत फारशी चर्चा झाली नाही. थोडक्यात कोकणवासीयांना नवखा असलेला ‘इपोमीस’ हा लारवा नक्की काय करतो? बेडकांच्या अंगावर तो काय करतो? तो किती धोकादायक आहे? या बाबत फारशी माहिती कुणालाच नाही. मात्र आंबोलीच्या या वनक्षेत्रात संशोधन करणाऱया महादेव भिसे आणि अनिश परदेसी या अभ्यासकांनी या पाहुण्या लारव्याचा इतिहास शोधून काढला आहे.

शिकारीच बनतो शिकार

संपूर्ण भारतात यापूर्वी फक्त एकदाच आणि तो देखील तामिळनाडूमध्ये सापडल्याची नोंद असलेला हा खतरनाक लारवा धक्कादायकरित्या आंबोलीच्या या जंगलात सापडला आहे. बेडकापेक्षा आकाराने खूपच लहान असलेल्या या लारव्याचा आकार अवघा दोन ते तीन से. मी. एवढाच असतो. त्याच्या तोंडाकडच्या भागाला करवतीसारखे दोन हात असतात. या हातांचा वापर धारदार शस्त्रासारखा करीत तो भक्षाची शिकार करतो. मध्यम आकाराचे बेडूक हे त्याचे प्रमुख अन्न आहे. तो साधारणत: जमिनीवरच वावरत असतो. त्याच्या हालचाली अतिशय मंद असतात. मात्र तो अतिशय आक्रमक असतो. ज्यावेळी बेडकांच्या नजरेत तो येतो, त्यावेळी कीडा समजून त्याला खाण्यासाठी बेडूक त्याच्यावर हल्ला करतात. मात्र त्याचवेळी प्रतिहल्ला करीत हा लारवा त्या बेडकाच्या जबडय़ावर वा मानेखालच्या बाजूवर आपल्या करवतीसारख्या धारदार हातांनी वार करतो आणि त्याच्या शरीराला छिद्र पाडून थेट शरीरात घुसतो. एकदा का त्याला बेडकाच्या शरीरात एन्ट्री मिळाली की मग अतिशय आक्रमकपणे तो त्या बेडकाला आतून पोखरण्यास सुरुवात करतो. अनपेक्षित अशा या हल्ल्याने त्या बेडकाला प्रतिकार करण्याची संधीच मिळत नाही. भक्ष म्हणून शिकार करण्यासाठी आलेला हा शिकारी बेडूक अवघ्या काही तासातच स्वत:चे अस्तित्व गमावून बसतो. संपूर्ण बेडूक आतून खाऊन फस्त केल्यानंतरच हा लारवा बाहेर पडतो. त्याच्या या भक्षाचा समाचार घेण्याच्या अतिशय क्रूर अशा पद्धतीमुळेच तो धोकादायक म्हणून ओळखला जातो.

Related posts: