|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसचे रस्तारोको

राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसचे रस्तारोको 

वार्ताहर/ कराड

तब्बल 21 कोटी रुपये खर्चून नुकताच नव्याने करण्यात आलेल्या वारूंजी रस्त्याचे पुन्हा काम करण्यासाठी नवीन रस्ता उखडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी वारूंजी येथे रस्तारोको केल्याने गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. राज्य व केंद्र शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे जनतेचे कोटय़वधी रुपये पाण्यात जात असल्याचा आरोप आमदार आनंदराव पाटील यांनी केला.

आमदार आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, वैशाली वाघमारे, विद्याताई थोरवडे, सुनील पाटील, नंदना करमरकर, अजित पाटील-चिखलीकर, विजय चव्हाण, शिवाजीराव जमाले व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार आनंदराव पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून सुमारे 21 कोटी रुपये खर्चून पाटण तिकाटणे ते विजयनगर दरम्यानच्या चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. अजून संबंधित ठेकेदाराचे पूर्ण पैसेही दिलेले नाहीत. दरम्यान, गुहागर-विजापूर या राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा जाहीर झाल्याने हा रस्ता केंद्र शासनाच्या ताब्यात गेला आहे. केंद्र सरकारने या रस्त्यावरील चिपळूण ते कराड रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध केला असून प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली आहे.

हे काम करताना संबंधित ठेकेदाराला चिपळूण बाजूकडून काम करण्याचे आदेश असताना ठेकेदाराने मनमानी करत वारूंजी येथे नव्याने केलेला रस्ता खोदण्यास सुरुवात केली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वर्दळ आहे. ठेकेदाराने काम सुरू केल्याने एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे अपघातात लोकांना प्राण गमवावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. याबाबत आपण अधिवेशनातही आवाज उठवणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास आमदार पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी वारूंजी येथे रस्ता रोको करत काम बंद पाडले. रस्तो रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related posts: