|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संभाजी महाराजांच्या त्यागामुळेच ते धर्मवीर!

संभाजी महाराजांच्या त्यागामुळेच ते धर्मवीर! 

बेळगाव / प्रतिनिधी

जगावे तर शिवबासारखे आणि बलिदान द्यावे तर ते संभासारखे, असे नेहमी म्हणण्यात येते. कारण संभाजी महाराजांचा त्याग हा फार मोठा आहे. धर्म बदलल्यास माफ करू, असा पैगाम औरंगजेबाने देऊनही संभाजी महाराजांनी तो झुगारून ‘जगेन तर हिंदू धर्मातच आणि मरण येईल तेही हिंदू धर्मातच’, असे खडसावून सांगितले. त्यामुळेच संभाजी महाराजांना धर्मवीर ही उपाधी मिळाली, असे विचार दौंड (पुणे) येथील इतिहास अभ्यासक व शिवदुर्ग संवर्धन समितीचे अध्वर्यु लक्ष्मणराव नाईकवाडी यांनी मांडले.

गुरुवर्य मो. ग. कुंटे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य रंगमंदिर येथे शुक्रवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. त्यांनी धर्मवीर संभाजीराजे यांच्या शौर्यगाथा व पेडगावच्या भुईकोट किल्ल्याची माहिती सांगितली.

छत्रपती संभाजी राजांना पकडल्यानंतर पेडगाव (अहमदनगर) जवळील बहाद्दूर गडावर नेण्यात आले. या गडावर त्यांना अनेक त्रास देऊन त्यांचा छळ करण्यात आला. परंतु हा राजा मुघल साम्राज्यासमोर झुकला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म सोडला नाही. हा सर्व रणसंग्राम या गडावर झाल्याने बहाद्दूर गडाचे नाव बदलून ‘धर्मवीर गड’ असे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हा धर्मवीर गड श्रीगोंदा तालुक्मयातील भीमा व सरस्वती नद्यांच्या संगमावर वसला आहे. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला असा हा भुईकोट किल्ला आहे. यामध्ये 52 पेठा होत्या, याचा उल्लेख आजही आपणाला सापडतो. 300 एकर अशा विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या या गडावर मुघल साम्राज्याने बरीच वर्षे राज्य केल्याचे नाईकवाडी यांनी सांगितले.

प्रारंभी अनिल चौधरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व तरुण भारतचे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर, ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी, लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष अशोक याळगी, चित्पावन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रकाश बापट, वरेरकर नाटय़संघाचे जगदीश कुंटे व्यासपीठावर उपस्थित होते. माधव कुंटे यांनी स्वागत केले. भालचंद्र कुंटे यांनी परिचय करून दिला.

 ‘पेडगावचा शहाणा’ ही म्हण झाली प्रसिद्ध

शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी निधीची गरज असल्याने त्यांनी पेडगावच्या किल्ल्याची लूट करण्याचे ठरविले. त्यावेळी गडावर बहाद्दूरशहाचे राज्य होते. नेताजी पालकर यांनी शिताफीने मुघल सैनिकांना चकवा देऊन आपल्या मागून नेल्यानंतर किल्ल्यावर कोणीच नाही, याचा फायदा घेऊन मराठी सरदारांनी गडावरील सोने, नाण्यांची व किमती घोडय़ांची लूट केली. त्यानंतर ‘पेडगावचा शहाणा’ अशी म्हण प्रसिद्ध झाली.

…हा तर राजकारणाचा एक भाग

संभाजी महाराज हे मुघलांना जावून मिळाले, असा इतिहास नेहमी सांगितला जातो. परंतु मुघलांना स्वराज्याकडे फिरकू देऊ नये, यासाठी हा शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा एक भाग होता, ते आजवर कोणी सांगितले नाही. त्यामुळे संभाजी महाराजांची बदनामी करण्याचेच काम अधिक झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने इतिहास वाचला पाहिजे, असे नाईकवाडी यांनी सांगितले.

Related posts: