|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » म्हशींना अपायकारक लस देण्याचा प्रकार उघडकीस

म्हशींना अपायकारक लस देण्याचा प्रकार उघडकीस 

कोनवाळ गल्ली येथील गवळय़ाकडून 293 लस जप्त, दूध उत्पादन वाढीसाठी धोकादायक प्रकार

प्रतिनिधी / बेळगाव

दूध हे आरोग्यवर्धक आहे. नियमितपणे दूध घेतल्यास त्याचे अनेक फायदे होतात, असे आपण आजवर ऐकत आलो आहोत. आता नियमितपणे दूध पिणाऱयांना कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतो. कारण दूध वाढविण्यासाठी म्हशींना अपायकारक लस दिली जात आहे. सीसीबी व औषध नियंत्रण विभागाच्या अधिकाऱयांनी कोनवाळ गल्ली येथे केलेल्या कारवाईत हा धक्कादायक व तितकाच धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, औषध नियंत्रण विभागाचे अधिकारी दीपक गायकवाड आदी उपस्थित होते. कोनवाळ गल्ली येथील गंगाधर सिद्धाप्पा गवळी (वय 42) यांच्या घरातून अधिकाऱयांनी 293 बाटल्या अपायकारक लस जप्त केली आहे.

गंगाधर गवळी याच्या 52 म्हशी आहेत. दूध वाढण्यासाठी तो स्वतः ऑक्सीटॉसीन ही लस आपल्या म्हशींना टोचतो व इतर गवळय़ांनाही तो ही लस पुरवितो. पुणे येथून ही लस खरेदी करण्यात आली असून पुण्यात 30 रुपयांना एक बाटली खरेदी करुन बेळगावात 250 रुपये दर लावून त्याची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

म्हशींना ही लस टोचल्यानंतर दूधाचे प्रमाण वाढते. या लसीचा वापर वैद्यकीय कारणासाठीही होतो. खास करुन प्रसूती सुरळीतपणे व्हावी यासाठी ही लस दिली जाते. तज्ञ डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही लस मिळविता येत नाही. मात्र दुग्ध व्यवसाय करणाऱया अनेकांनी मात्र सहजपणे ती मिळविली आहे. प्रत्यक्षात या लसीच्या वापरामुळे दूधाचे प्रमाण वाढत नाही तर धार वाढते, असे पोलीस उपायुक्त व औषध नियंत्रण अधिकाऱयांनी सांगितले.

मानवी आरोग्यासाठी दूध धोकादायक

या लसीच्या वापरामुळे गायी व म्हशींचे आयुष्य कमी होते. अशा पध्दतीने काढलेले दूध मानवी आरोग्यासाठी धोकादायक असते. त्याच्या सेवनामुळे काविळ, कॅन्सरसारखे गंभीर आजार येतात. मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. गर्भाशय व स्तनकॅन्सर होण्याची शक्मयता अधिक असते. पुरुषांमध्ये अशक्तपणा वाढतो. मुली लवकर वयात येतात. अशा कारणांमुळेच केंद्रीय औषध नियंत्रण जनरलनी 17 जानेवारी 2014 पासून प्राण्यांना ही लस देवू नये, असा आदेश काढला आहे. तरीही दूध वाढविण्यासाठी ही लस वापरण्यात येत आहे.

26 सप्टेंबर 2017 रोजी मुख्यमंत्र्यांच्या वृत्तपत्र विषयक सल्लागारांनी औषध नियंत्रण विभागाला पत्र पाठवून अशा प्रकरणांची चौकशी करण्याची सूचना केली होती. या सूचनेवरुन सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, औषध नियंत्रण विभागाचे दीपक गायकवाड, राजशेखर मल्ली, एन. बी. रघुराम, ए. एम. सनोफरजान आदींनी कोनवाळ गल्ली येथील ब्रम्हलिंग मंदिरानजीक असलेल्या गंगाधर सिद्धाप्पा गवळी याच्या घरात तपासणी केली असता 293 इतक्या लसीच्या बाटल्या मिळाल्या. त्याची किंमत 73 हजार असून कर्नाटकातील ही मोठी कारवाई असल्याचे सीमा लाटकर यांनी सांगितले.

चौकशी औषध नियंत्रण विभागाकडे

या प्रकरणाची चौकशी आता औषध नियंत्रण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयाची परवानगी घेवून ही औषधे वैज्ञानिक पृथःकरणासाठी प्रयोग शाळेला पाठविण्यात येणार आहेत. न्यायालयाची परवानगी घेवून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. अपायकारक औषधांचा वापर करुन मिळविलेले दूध मानवी जीवाला धोका पोहोचविणारे आहे.

Related posts: