|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News »  प्राचीन शिल्पांचे जतन होणे आवश्यक : गिरीश बापट

 प्राचीन शिल्पांचे जतन होणे आवश्यक : गिरीश बापट 

पुणे / प्रतिनिधी  :

 भारतात पुरातत्त्व शिल्प मोठय़ा प्रमाणावर आहेत. या शिल्पांच्या जतनाकडे ब्रिटीश काळात दुर्लक्ष झाले. स्वातंत्र्यानंतरही त्यात फार सुधारणा झाली नाही. अनेक  ठिकाणची शिल्पे आजही दुर्लक्षित आहेत. नव्या पिढीला भारतीय कला, संस्कृती समजण्यासाठी या पुरातन शिल्पाचे जतन करण्याची आवश्यकता पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केली.

वाई येथील अनेक प्राचीन देवळे, वास्तू आणि पर्यटनस्थळांना कॅनव्हासवर चितारणाऱया प्रसिद्ध चित्रकार वनिता जाधव यांच्या ‘सोल इन स्टोन’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते बालगंधर्व कलादान येथे झाले. याप्रसंगी ते बोलत होते. चित्रकार वनिता जाधव, जी. एस. जाधव, ‘जडण-घडण’चे संपादक डॉ. सागर देशपांडे, प्रसिद्ध कवी संदीप खरे, राम शेट्टी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

 बापट म्हणाले, पुरातन मंदिरांना डागडुजी करताना पेंट दिला जात आहे, ते थांबायला हवे. शासनाने या बाबींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, याचे चांगले परिणाम भविष्यात दिसतील. चित्र पाहताना अनेकदा यात काय आहे, हे कळत नाही. मात्र वनिता जाधव यांच्या चित्रांमधून आपण प्रत्यक्ष शिल्प बघत असल्याचा भास होतो. वाईच्या दगडांमध्ये लपलेल्या इतिहासाला या चित्रांच्या निमित्ताने उजाळा मिळाला आहे. तसेच या प्रदर्शनातून शिल्पकलेकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाल्याचेही बापट यांनी नमूद केले.

जाधव म्हणाल्या, 1993 साली या ठिकाणी माझ्या चित्रांचे प्रदर्शन भरविले होते. आज पुन्हा तो योग आल्याचा आनंद झाला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून वाईचा सांस्कृतिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळात समावेश करण्याचा माझा प्रयत्न आहे. 

 

Related posts: