|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुखांच्या हाती

रिफायनरीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुखांच्या हाती 

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीतेंचे स्पष्टीकरण

मुंबई-गोवा महामार्ग कार्यवाहीतील समस्या महिनाभरात मार्गी

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

राजापूरमधील नाणार रिफायनरीच्या उभारणीचा प्रश्न ऐरणीवर आहे. नाणार प्रश्न धोरणात्मक असल्याचे सांगून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी हा मुद्दा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. पक्षप्रमुखांनी या प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेतलेली असल्याने त्या बाबत तेच निर्णय घेतील, असे गीते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध योजनांच्या त्रैमासिक आढावा बैठकीनंतर गीते यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उत्तर) सचिन शिंदे हे देखील उपस्थित होते. नाणार रिफायनरीचा प्रश्न त्या ठिकाणी होत असलेल्या ग्रामस्थांच्या विरोधामुळे किचकट बनला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ न देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेनेनेही ग्रामस्थांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. गीते यांनी देखील रिफायनरीचा विषय धोरणात्मक आहे. शासन व पक्ष त्या बाबत आपापली भूमिका बजावत असल्याचे सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या सोबत राहून या प्रकल्पाला विरोधाची भूमिका दर्शवलेली असल्याचे गीते यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे नाणार येथे विस्थापनाचा मोठा प्रश्न उभा आहे. या परिसरातील 3 हजार घरांचे विस्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला असल्याचे गीते यांनी सांगितले.

महिना-दोन महिन्यात महामार्ग समस्या दूर होणार

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाची कार्यवाही वेगाने सुरू झाली आहे. पनवेल ते झाराप हा मार्ग लवकरात-लवकर पूर्ण करण्याचा मंत्रालयाने निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने मंत्रालयाकडून कार्यवाही सुरू आहे. या महामार्गाच्या सर्व कामांसाठी ठेकेदारही नियुक्त करण्यात आले आहेत. निविदाही काढण्यात आली आहे. लवकरच पुढील कामे सुरू होणार आहेत. महामार्गासाठी सुमारे 85 टक्के भूसंपादनही पूर्ण झाले आहे. येत्या महिना-दोन महिन्यात कार्यवाहीच्या सर्व समस्या दूर होतील, असे गीते यांनी सांगितले. खेडमध्येही या महामार्गाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. येत्या वर्षभरात तेथील काम ठेकेदाराला पूर्ण करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुहागरमध्ये एकही घर न हलवता प्रकल्प साकारणार

राजापूरमध्ये ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध दर्शवण्यात येत असताना हा प्रकल्प गुहागर तालुक्यात होण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. हा प्रकल्प गुहागरमध्ये येत असेल तर आपण त्याचे स्वागतच करू. कारण त्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जागाही उपलब्ध आहे. त्या ठिकाणी एकही घर विस्थापित करावे लागणार नाही. मात्र नाणारपेक्षा थोडय़ा कमी क्षमतेचा प्रकल्प गुहागरात साकारू शकेल, असेही गीते यांनी सांगितले.

परजिल्हय़ातील मजुरांची तपासणी

रत्नागिरी जिल्ह्य़ात परजिल्ह्य़ातून अनेक मजूरवर्ग कामाला येत आहे. त्यांच्यापासून आजारांचा फैलाव जिल्हय़ात होण्याचा संभव आहे. त्यासाठी या परजिल्ह्य़ातून येणाऱया मजुरांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असल्याचे गीते यांनी यावेळी सांगितले.

Related posts: