|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सहा महिन्यात संपूर्ण प्लास्टीक बंदी

सहा महिन्यात संपूर्ण प्लास्टीक बंदी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प मुंबईत सुरू होणार

राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2017

मुंबई / प्रतिनिधी

येत्या सहा महिन्यात राज्यात प्लास्टीकवर पूर्णपणे बंदी आणली जाईल. सरसकट प्लास्टीक बंदीसाठी राज्य सरकार पर्यायी व्यवस्था निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प मुंबईत उभारण्यात येणार असून तो येत्या तीन-चार वर्षात पूर्ण होईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

राष्ट्रीय हरित लवाद आणि पर्यावरण विभागाच्यावतीने आज एनसीपीएच्या सभागृहात ‘राष्ट्रीय पर्यावरण परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरसकट प्लास्टीक बंदीची घोषणा केली. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यापूर्वीच येत्या गुढीपाडव्यापासून प्लास्टीकबंदीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी आज संपूर्ण प्लास्टीक बंदी सहा महिन्यात पूर्णपणे अंमलात येईल, असे स्पष्ट केले.

सध्या वातावरणात बदल होत आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून तो सोडवण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. समुद्रातील दूषित पाण्यामुळे किनारा प्रदूषित होत आहे. यावर उपाय म्हणून पाण्यावर प्रक्रिया करणार असून त्यासाठी पर्यावरण विभागाने काही नियम घालून दिले आहेत. प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प येत्या तीन-चार वर्षात पूर्ण होऊन त्यामुळे प्रदूषित पाणी समुद्रात सोडले जाणार नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

मुंबईत मेट्रोचे काम सुरू आहे. परंतु, काही नागरिकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने काम रखडले आहे. मेट्रोचे काम दिवसा करावे, रात्री करू नये. धुळीचा त्रास होतो, इमारतींना तडे जातात असे काही मुद्दे आहेत. जनतेने विकासाला साथ दिली पाहिजे. मेट्रोमुळे दळणवळणाला गती येणार आहे. मेट्राचे काम रखडत गेले तर कोटय़वधी रुपयांचे नुकसान होते, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

देशात अनेक नद्या प्रदूषित आहेत. महाराष्ट्रात मात्र नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन वर्षात 11 हजार गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र आघाडीवर आहे. प्रत्येक घराघरात शौचालय बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नवी पिढी पर्यावरण विषयक बाबींमध्ये जागरूक आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Related posts: