|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » बोर्ड परीक्षेसाठीची नियमावली योग्यच

बोर्ड परीक्षेसाठीची नियमावली योग्यच 

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा खुलासा

पेपरफुटीला आळा घालण्यासाठी निर्णय

मुंबई / प्रतिनिधी

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शालेय शिक्षण बोर्डाने तयार केलेली नियमावली ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फायद्यासाठी असून ती योग्यच आहे. त्यामुळे एक मिनिट उशीर झाल्यास परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्याच्या निर्णयावर होणारी टीका पूर्णपणे अनाठायी असल्याचा खुलासा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी येथे केला.

पेपरचीट वेळ सकाळी 11 वाजताची असेल तर परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा वाजता पोहचण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना असतात. त्यामुळे उशीर झाल्यास विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात येणार आहे. सध्या व्हॉटस् ऍपवरून पेपर फुटण्याचे प्रकार वाढत असून त्याला आळा घालण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे तावडे म्हणाले.

मुळात एक मिनिट उशीर झाल्यास परीक्षेला बसण्यास अनुमती नाही असे म्हणणे चुकीचे आहे. कारण पेपरची वेळ सकाळी 11 वाजताची असल्यास विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगण्यात येते. विद्यार्थ्यांना 10 वाजून 45 मिनिटांनी हॉलमध्ये प्रवेश देण्यात येतो. 10 वाजून 50 मिनिटांनी विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका वाचायला दिली जाते आणि 11 वाजता तो पेपर लिहिण्यास सुरुवात करतो. त्यामुळे 11 वाजल्यानंतर एक मिनिट म्हणजेच तो विद्यार्थी 31 मिनिट उशीरा आलेला असतो. व्हॉटस्ऍपवरून पेपर फोडला जात असल्याने एखाद्या उनाड मुलाला वाचवण्यासाठी आपण शेकडो चांगल्या मुलांचे भवितव्य पणाला लावू शकत नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.

तुघलकी निर्णय

दरम्यान, शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. बोर्डाच्या परीक्षेासाठी तयार करण्यात आलेली नवीन नियमावली हा तुघलकी प्रकारचा निर्णय असून या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे.