|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ठाणे पालिकेने दिव्यांगाना न्याय द्यावा

ठाणे पालिकेने दिव्यांगाना न्याय द्यावा 

आ. कडू यांची मागणी, 7 डिसेंबरला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

ठाणे महानगरपालिका स्थापन झाल्यापासून दिव्यांगाना वाऱयावर सोडण्यात आले आहे. 1995 पासून दिव्यांग कायदा होऊनही 128 कोटींचा निधी इतरत्र दुसऱया कामासाठी वापरला गेल्याचा खळबळजनक आरोप अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला. शनिवारी आ. बच्चू कडू यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ठाणे महापालिकेची स्थापना 1982 मध्ये झाली. तरीही 1993 पासून 28 कोटीच्या निधीमधून केवळ 5 टक्के रक्कम खर्च करून निधीवर डल्ला मारून सत्ताधाऱयांनी दिव्यांगांचा घोर अपमान केला आहे. गेली 18 वर्षे दिव्यांगाना अनुदानच दिले नसल्याचा आरोप करत त्यांनी याची सखोल चौकशी कारवाई अशी मागणीही केली. याच पार्श्वभूमीवर ‘प्रहार’ संघटना ठाणे महापालिकेला चांगलाच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला. दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी आ. बच्चू कडू हे महापालिका आयुक्त संजीव जैसवाल यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीदरम्यान दिव्यांगाच्या विविध समस्या तसेच निधीबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये दिव्यांगाना शहरात 1500 स्टॉल्स, 3 टक्के अपंगांना घरे, अपंगासाठी शॉपिंग मॉल्स या मागण्यासाठी मान्य करण्यात आल्याचे आ. कडू यांनी सांगितले. दरम्यान, आगामी 3 महिन्यात या मागण्या मान्य न झाल्यास आयुक्तांना भेटायला नाही तर ठाण्यात आंदोलन छेडण्यासाठी येणार असल्याचा इशारा आ. कडू यांनी दिला.

केवळ मराठी पाटय़ा लावून मराठीपण जपले जाणार का असा प्रश्न उपस्थित करून सध्या सुरू असलेल्या मनसे आणि काँग्रेस यांच्या वादाचा आ. बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यातील वाद हा ठरवून केलेला असून या द्वायींचे केवळ चर्चेत राहण्याचे काम सुरू असल्याचा आरोप कडू यांनी केला. राज ठाकरे यांनी भावनिक मुद्यांवर हाणामारी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर बोलावे असा सल्लाही यावेळी बच्चू कडू यांनी दिला. दरम्यान, भाजप सरकारच्या काळात देव सुटीवर गेले असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सरकारने शेतकऱयांची अवहेलना केली असून ऊस, कापूस, डाळींना भाव नाही आणि त्यामुळे येत्या 7 डिसेंबर रोजी शेतकऱयांच्या हितासाठी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचे आ. बच्चू कडू म्हणाले.

Related posts: