|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » संदीप देशपांडेसह सात कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी

संदीप देशपांडेसह सात कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी 

काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण : तपास बाकी असल्याचे सांगत पोलिसांनी केली कोठडीची मागणी

मुंबई / प्रतिनिधी

आझाद मैदान येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह इतर सात मनसे कार्यकर्त्यांना मुंबई किला कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयाची शुक्रवारी सकाळी तोडफोड करण्यात आली होती. हा मनसेने केलेला सर्जिकल स्ट्राईक आहे, असे संदीप देशपांडे यांनी ट्विट करत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पोलिसांनी या हल्ल्यानंतर तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासून संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश छिल्ले, विशाल कोकणे, हरिश सोळुंकी, दिवाकर पडवळ या सात कार्यकर्त्यांना अटक केली. अटक केलेल्या कार्यकर्त्यांवर दंगल माजवणे, नुकसान आणि नासधूस करणे असे आरोप ठेवण्यात आले हेते.

शनिवारी मुंबईतील किला न्यायालयात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एस. अराध्ये यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान गुन्हय़ासाठी वापरण्यात आलेला बांबू, लोखंडी रॉड आणि मोटारसायकल जप्त करण्यात आलेली नाही. तसेच उर्वरित तपास अद्याप बाकी असल्याचे सांगत पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केल्याने दंडाधिकारी आर. एस. अराध्ये यांनी सोमवारपर्यंत आठही जणांना पोलीस कोठडी सुनावली.

 काय आहे प्रकरण?

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या वादाने आता उग्ररुप धारण केले आहे. विक्रोळी येथील मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. आणि कार्यकर्ते तिथून पसार झाले. त्यानंतर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचे झेंडे आणि राज ठाकरे यांचे फोटो जाळले. हल्ल्याचे वफत्त कळताच काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांनी आमदार, खासदार आणि पदाधिकारी मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर जमा झाले. माजी खासदार गुरुदास कामत, एकनाथ गायकवाड यांच्यासह आमदार भाई जगताप, माजी आमदार मधुकर चव्हाण, कृपाशंकर सिंह यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला. या हल्ल्यानंतर काँग्रेस-मनसेमध्ये वाप्युद्धही रंगले. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीही काँग्रेस पक्षाच्या वांद्रे येथील कार्यालयावर अज्ञात व्यक्तींकडून शाईफेक करण्यात आली. याशिवाय, संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेकडून होर्डिंग्ज लावण्यात आले. यात निरुपम यांचे व्यंगचित्र रेखाटत त्यांचा परप्रांतीय भटका कुत्रा असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस आणि मनसेमधील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Related posts: