|Thursday, July 19, 2018
You are here: Home » क्रिडा » न्यूझीलंडला 313 धावांची भक्कम आघाडी

न्यूझीलंडला 313 धावांची भक्कम आघाडी 

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर यजमान न्यूझीलंडने विंडीजवर पहिल्या डावात 313 धावांची भक्कम आघाडी मिळविली. न्यूझीलंडच्या ग्रॅण्डहोमने 71 चेंडूत आपले कसोटी पहिले दमदार शतक झळकविले. दिवसअखेर न्यूझीलंडने दुसऱया डावात 127 षटकांत 9 बाद 447 धावा जमविल्या. रॉस टेलरचे शतक सात धावांनी हुकले.

या कसोटीत न्यूझीलंडने शुक्रवारी खेळाच्या पहिल्या दिवशी विंडीजला पहिल्या डावात 134 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर न्यूझीलंडने 2 बाद 85 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. उपाहारापर्यंतच्या सत्रात न्यूझीलंडने 96 धावांची भर घालताना एकमेव गडी गमविला. उपाहारावेळी न्यूझीलंडची स्थिती 64 षटकांत 3 बाद 181 अशी होती. टेलर 66 तर निकोल्स 24 धावांवर खेळत होते. या सत्रामध्यें टेलरने 87 चेंडूत 6 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. रॉचने रॅव्हेला झेलबाद केले त्याने 5 चौकारांसह 42 धावा जमविल्या. टेलर आणि निकोल्स यांनी संघाचा डाव सावरताना उपाहारापर्यंत चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 72 धावांची भागीदारी केली.

खेळाच्या दुसऱया सत्रात न्यूझीलंडने आणखी एक गडी गमवताना 86 धावांची भर घातली. चहापानावेळी न्यूझीलंडने 92 षटकांत 4 बाद 267 धावांपर्यंत मजल मारली. विंडीजने या कालावधीत दुसरा नवा चेंडू घेतला. निकोल्सने आपल्या अर्धशतक 126 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने झळकविले. रॉचने रॉस टेलरला पायचीत केले. त्याने 160 चेंडूत 10 चौकारांसह 93 धावा जमविताना निकोल्ससमवेत चौथ्या गडय़ासाठी 127 धावांची भागिदारी केली. चहापानावेळी निकोल्स 66 तर सँटेनर 12 धावांवर खेळत होते.

ग्रॅण्डहोमचे जलद शतक

खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये न्यूझीलंडने 180 धावांची भर घालताना 5 गडी गमविले. कसोटी पदार्पणात ग्रॅण्डहोमचे जलद शतक हे या सत्रातील वैशिष्टय़ ठरले. कमिन्सने निकोल्सला झेलबाद केले. त्याने 8 चौकारांसह 67 धावा जमविल्या. कमिन्सने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना सँटेनरचा 17 धावांवर त्रिफळा उडविला. कॉलिन डी. ग्रॅण्डहोमने आक्रमक फलंदाजी करत आपले पहिले कसोटी शतक 71 चेंडूत झळकविले. ग्रॅण्डहोमने अर्धशतक 44 चेंडूत 1 षटकार 6 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. तसेच सातव्या गडय़ासाठी ग्रॅण्डहोम आणि ब्लंडेल यांनी 148 धावांची भागीदारी केल्याने न्यूझीलंडला 400 धावांचा टप्पा ओलांडता आला. ग्रॅण्डहोमने 74 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांचा 105 धावा झळकविल्या. ग्रॅण्डहोमने या खेळीमध्ये आपले पहिले आठ चौकार लेगच्या दिशेने ठोकले. चेसच्या गोलंदाजीवर ग्रॅण्डहोम पॉवेलकरवी झेलबाद झाला. चेसने वेग्नरचा 3 धावांवर त्रिफळा उडविला. गॅब्रियलने हेन्रीला 4 धावांवर झेलबाद केले. ब्लंडेल 6 चौकारांसह 57 तर बोल्ट दोन धावांवर खेळत आहे. विंडीजतर्फे रॉचने 3 तर कमिन्स आणि चेस यांनी प्रत्येकी दोन, गॅब्रियल व होल्डर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडतर्फे कसोटीत जलद शतक झळकविणारा ग्रॅण्डहोम हा दुसरा फलंदाज आहे.

संक्षिप्त धावफलक

विंडीज प. डाव सर्वबाद 134, न्यूझीलंड प. डाव 127 षटकांत 9 बाद 447 (ग्रॅण्डहोम 105, टेलर 93, ब्लंडेल खेळत आहे 57, निकोल्स 67, लेथम 37, रॅव्हेल 42, रॉच 3/73, कमिन्स 2/74, चेस 2/83, गॅब्रियल 1/80, होल्डर 1/85).

Related posts: