|Thursday, July 19, 2018
You are here: Home » क्रिडा » विराट, मुरली विजयची झुंजार दीडशतके

विराट, मुरली विजयची झुंजार दीडशतके 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कर्णधार विराट कोहली (नाबाद 156) व सलामीवीर मुरली विजय (155) यांनी दुबळय़ा लंकन गोलंदाजीचा चांगलाच फडशा पाडत तिसऱया गडय़ासाठी 283 धावांची आक्रमक भागीदारी साकारल्यानंतर भारताने लंकेविरुद्ध तिसऱया कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर 4 बाद 371 धावांचा डोंगर रचला. एकीकडे, मुरली विजयने 13 तर दुसरीकडे, विराट कोहलीने 16 चौकार वसूल करत लंकेच्या आव्हानातील जणू जानच काढून घेतली. प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱया एखाद्या संघाकडूनही होणार नाही, इतकी लंकेची सुमार गोलंदाजी झाली आणि याचा विराट-विजयने लाभ घेतला नसता तरच नवल होते.

विराट कोहलीने दिवसभरात आपल्या भात्यातील विविध फटक्यांची मनमुराद बरसात केली. शिवाय, दुसरीकडे मुरली विजयने एकापाठोपाठ एक असे लाजवाब कट लगावत लंकन गोलंदाजांच्या मर्यादा आणखी चव्हाटय़ावर आणल्या. लंकन संघाचा सुमार गोलंदाजी दर्जा पाहत सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेल्या एका माजी भारतीय खेळाडूने अतिशय मार्मिक टिपणी केली. लहिरु गमागे हा लंकेचा सध्याचा आघाडी गोलंदाज रणजीमधील तिसरा मध्यमगती गोलंदाज देखील ठरु शकत नाही, असे तो म्हणाला.

वास्तविक, यापूर्वी, या मालिकेत लंकेने काही वेळा जरुर प्रतिकार केला. पण, इथे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर फारशी चुरस रंगलीच नाही. उलटपक्षी, लंकेच्या सुमार गोलंदाजीचा भारताने केवळ फायदाच घेतला. अपवाद म्हणून शिखर धवन व चेतेश्वर पुजारा स्वस्तात बाद झाले. मात्र, विराट व विजय यांचा झपाटाच इतका होता की, त्यामुळे लंकन गोलंदाजीच्या मर्यादा अधोरेखित होण्यासाठी आणखी कशाचीच गरज भासली नाही.

दिवसभरातील शेवटच्या टप्प्यात अखेर लक्शन संदकनच्या एका चेंडूवर मुरली विजय त्रिफळाचीत झाला आणि लंकेला थोडेसे हायसे वाटले. केवळ दोनच सत्रात त्यांनी 38 चौकारांची लयलूट करुन दिली, यावरुनही बरेचसे चित्र स्पष्ट होते. गमागेने ऑफस्टम्पवर अनेक हाफ व्हॉलीज दिल्या आणि विराटने त्याचा समाचार घेतला नसता तरच ते आश्चर्याचे ठरले होते. गमागे (1/68), ऑफस्पिनर दिलरुवन परेरा (1/97) व चायनामन लक्शन संदकन (2/110) यांना थोडेफार यश लाभले.

विराटने सर्वप्रथम 52 चेंडूत कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले व नंतर 110 चेंडूत शतकही साजरे केले. संदकनच्या चेंडूवर बॅकफूट कव्हरड्राईव्हवर त्याने हा टप्पा गाठला. मुरली विजयने देखील येथे 163 चेंडूत शतक साजरे केले होते.

धावफलक

भारत पहिला डाव : मुरली विजय यष्टीचीत डिकवेला, गो. संदकन 155 (267 चेंडूत 13 चौकार), शिखर धवन झे. लकमल, गो. परेरा 23 (35 चेंडूत 4 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. समरविक्रमा, गो. गमागे 23 (39 चेंडूत 4 चौकार), विराट कोहली खेळत आहे 156 (186 चेंडूत 16 चौकार), अजिंक्य रहाणे यष्टीचीत डिकवेला, गो. संदकन 1, रोहित शर्मा खेळत आहे 6 (14 चेंडूत 1 चौकार). अवांतर 7. एकूण 90 षटकात 4/371.

गडी बाद होण्याचा क्रम

1-42 (धवन, 9.6), 2-78 (पुजारा, 20.2), 3-361 (मुरली विजय, 85.6), 4-365 (रहाणे, 87.3).

गोलंदाजी

लकमल 14-2-50-0, गमागे 17-6-68-1, परेरा 21-0-97-1, संदकन 23-1-110-2, सिल्व्हा 15-0-45-0.

बोलके आकडे…

3

विराट कोहलीपूर्वी, केवळ तीनच भारतीय फलंदाजांना सर्वात कमी कसोटीत 5 हजार धावांचा टप्पा सर करता आला आहे. विराटने 105 कसोटीत हा टप्पा सर केला असून यापूर्वी, गावसकरनी 95, सेहवागने 99 तर सचिनने 103 कसोटीत 5 हजार धावांचा टप्पा पार केला.

4

सर्वात कमी डावात 20 कसोटी शतके झळकावणाऱया फलंदाजांच्या यादीत विराट सध्या चौथ्या स्थानी आहे. विराटने हा टप्पा 105 कसोटीत पार केला. त्यापूर्वी, ब्रॅडमननी 55 कसोटीत, गावसकरनी 93, हेडनने 55 तर स्टीव्ह स्मिथने 99 कसोटीत 20 शतके पूर्ण केली आहेत.

25

दिलरुवन परेराने 25 कसोटीत 100 कसोटी बळींचा माईलस्टोन गाठला. कसोटीत किमान 100 बळी घेणाऱया गोलंदाजात तो सर्वात जलद हा टप्पा गाठू शकला. यापूर्वी, मुरलीधरनच्या खात्यावर हा विक्रम होता. मुरलीने 25 कसोटीत 100 कसोटी बळी टिपले होते.

11-0

दिल्लीत मागील 12 कसोटी सामन्यात भारताने 11 विजय व 0 पराभव, अशी कामगिरी नोंदवली आहे. भारत येथील मैदानावर यापूर्वी 1987 साली विंडीजविरुद्ध पराभूत झाला होता.

3 कसोटींच्या मालिकेत हॅट्ट्रिक शतके झळकावणारा विराट पहिलाच कर्णधार!

भारतीय क्रिकेटमधील सध्याचा ‘माईलस्टोन मॅन’ विराट कोहली शनिवारी 3 सामन्यांच्या कसोटीत मालिकेत सलग 3 शतके झळकावणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलाच कर्णधार ठरला. विराटने यावेळी कसोटी क्रिकेटमधील 5 हजार धावांचा टप्पा सर केला. शिवाय, कसोटी, वनडे व टी-20 क्रिकेटमध्ये 16 हजार धावांचा माईलस्टोनही गाठला. आजवर, 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनेक कर्णधारांनी 3 किंवा 4 शतके बऱयाचदा फटकावली आहेत. पण, 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग 3 शतके झळकावणारा तो आजवरचा पहिलाच कर्णधार ठरला आहे. विराटच्या खात्यावर आता कॅलेंडर वर्षात 11 आंतरराष्ट्रीय शतके असून तूर्तास, सचिनपेक्षा तो केवळ एका शतकाने मागे आहे.

भारतीय कर्णधाराने यापूर्वी, कोलकाता येथील पहिल्या कसोटीत नाबाद 104 धावा झळकावल्या तर नागपूरमधील दुसऱया कसोटीत 213 धावांसह झुंजार द्विशतक साकारले होते. येथे त्याने 63 व्या लढतीत 20 वे कसोटी शतक साजरे केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 16 हजार धावांचा विक्रम

भारतीय कर्णधार विराट कोहलीने 5 हजारपेक्षा अधिक कसोटी धावा, 9030 वनडे धावा व 1956 टी-20 धावांसह सर्वात जलद 16 हजार आंतरराष्ट्रीय धावा झळकावणाऱया फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागे टाकले. त्याने आजवर 105 कसोटी, 194 वनडे व 51 टी-20 डाव खेळले आहेत. 350 डावात विराटचे हे 52 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले असून या आघाडीवर देखील त्याने हाशिम आमलाचा 378 डावांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटने याचवेळी एकाच वर्षात 11 शतकांच्या सचिन व रिकी पाँटिंग यांच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली.

Related posts: