|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पत्नीची छेड काढणाऱया तरुणाचा खून

पत्नीची छेड काढणाऱया तरुणाचा खून 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  पत्नीची छेड काढल्याने पतीने विवाहीत तरूणाचा चाकूने भोसकून खून केला. शनिवारी सकाळी साडेनउच्या सुमारास बागल चौक येथील होंडा शोरूमच्या पिछाडीस ही घटना घडली. समीर बाबासो मुजावर (वय 28 रा. सुभाषनगर) असे मृतांचे नांव आहे. याप्रकरणी अनिल रघुनाथ धावडे (वय 32 रा. ओमकार अपार्टमेंट, बागल चौक) या संशयीतास पोलीसांनी ताब्यात घेतले. चाकूने वार केल्यानंतर अनिल धावडे यानेच समीर मुजावरला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल केले. याबाबतची फिर्याद महेश कोलाप्पा पोवार (वय 26 रा. राजारामपुरी 14 वी गल्ली) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, समीर मुजावर आई, पत्नी सफीया, मुलगी रिया (वय 3) यांच्यासमवेत सुभाषनगर येथे राहतो. त्याचा सफीया सोबत चार वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. समीरने महेश भटेजा यांचे राजारामपुरी येथील खेळण्याचे दुकान तीन वर्षापासून चालविण्यासाठी घेतले आहे. अनिल धावडे हा पत्नी दोन मुलांसह बागल चौक येथील होंडा शोरूमच्या पिछाडीस राहतो. तो एका दवाखान्यात नोकरीस असून त्याची पत्नी राजारामपुरी परिसरातील एका जीममध्ये ट्रेनर म्हणून नोकरीस आहे. याठिकाणी समीर व त्यांची ओळख झाली होती. या ओळखीतून समीर अनिलच्या पत्नीची छेड काढत होता. वारंवार त्यांना त्रास देत होता. अनिलच्या पत्नीने याची माहिती घरच्यांना दिली होती. अनिलने व त्याच्या नातेवाईकांनी समीरला याबाबत समज दिली होती. मात्र समीर ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. यातून अनिल व समीर यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते.

    दरम्यान शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास समीर मुजावर याने त्याचा मित्र महेश पोवार याला मोबाईलवर फोनकरून बागल चौक येथे बोलविले. थोडय़ाच वेळात महेश पोवार मोपेड घेवून बागल चौक येथे आले. महेश व समीर हे अनिल  धावडे याच्या घराकडे गेले. यावेळी अनिल घराच्या दारामध्ये थांबला होता. यावेळी अनिल व समीरमध्ये  शाब्दिक चकमक उडाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी दोघांमध्ये जोरदार हातघाई झाली. यातून चिडून अनिल घरामध्ये गेला त्याने घरातील चाकूने समीरवर वार करण्यास सुरूवात केली. समीरच्या डाव्या बाजूस पोटावर एक वर्मी घाव बसल्याने समीर जागीच निपचीत पडला. त्याच्या पोटातून रक्तस्त्राव होवू लागला. यामुळे अनिल घाबरला त्याने महेश पोवारच्या मदतीने तात्काळ समीरला रिक्षातून उपचारासाठी सिपीआर रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच समीरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. दरम्यान सीपीआर पोलीस चौकीमधील पोलीस पी. के. जाधव व कृष्णा काकडे यांनी अनिल धावडेस सीपीआर पोलीस चौकीमध्ये बसवून ठेवले. तसेच समीरच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. यानंतर समीरच्या मित्रपरीवार, नातेवाईक यांनी सीपीआर रूग्णालयामध्ये गर्दी केली होती.  दरम्यान लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून संशयीत अनिल धावडे यास ताब्यात घेवून त्याला पोलीस  ठाण्यात नेले.  

            दरम्यान समीर मृत झाल्याचे समजताच त्याची आई, पत्नी, मुलगी, मामा यांच्यासह नातेवाईक, मित्रपरीवाराने सीपीआर रूग्णालयात मोठय़ाप्रमाणात गर्दी केली होती. समीर मृत झाल्याचे समजताच त्याच्या आई व पत्नीने केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. समीरच्या आई सीपीआर रूग्णालयामध्येच चक्कर येवून कोसळल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले.

    पोलीस अधिक्षक संजय मोहिते, शहर पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक संजय मोरे, संजय साळुंखे यांनी घटनास्थळी व सीपीआर रूग्णालयात भेट दिली. सीपीआर रूग्णालय तसेच बागल चौक परिसरामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यापूर्वीही झाला होता वाद

  समीर मुजावर हा अनिल धावडे याच्या पत्नीस वारंवार त्रास देत होता. याची माहिती अनिलच्या पत्नीने पतीसह नातेवाईकांना दिली होती. याच कारणातून अनिल व समीर यांच्यामध्ये दोन वर्षापूर्वी एकदा वाद झाला होता. यानंतरही या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. वारंवार समज देवूनही समीरने त्रास देणे कमी केले नाही.

स्वतःच रिक्षातून आणले…

   शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास समीर अनिल धावडे याच्या बागल चौक येथील घराच्या दारावरून निघाला होता. घराच्या दारात थांबलेल्या अनिलचा समीरसोबत वाद झाला. दोघांच्यात शाब्दिक चकमक उडून जोरदार हातघाई झाली. याचरागातून अनिलने घरामध्ये जावून घरातील चाकून समीरच्या पोटात डाव्याबाजूस वर्मी घाव केला. वार खोलवर असल्याने समीरच्या पोटातून मोठय़ाप्रमाणात रक्तस्त्राव होवू लागला. अनिलनेच तात्काळ रिक्षातून समीरला सीपीआर रूग्णालयात दाखल केले.

शाहूपुरी पोलीसांचे वरातीमागून घोडे

   बागल चौक येथे घडलेल्या खूनाच्या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलीसांनी नव्हती. तब्बल एक तासानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सीपीआर रूग्णालयात दाखल झाले. यानंतरही शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घडलेला प्रकार आपल्याच हद्दीमध्ये आहे काय, याची खातरजमा करण्यामध्ये गुंग होते. तर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांनी पोलीस व्हॅनमधून न उतरता मृत समीर मुजावरच्या भावाकडे चौकशी केली.

Related posts: