|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अण्णा ठाकूर यांचे निधन

रा.स्व.संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अण्णा ठाकूर यांचे निधन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीराम गणेश ठाकूर (वय 97, रा.श्याम सोसायटी, देवकर पाणंद) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. संघ परिवारात अण्णा म्हणून ते परिचीत असून जिह्यामध्ये संघ कामाचा विस्तार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शनिवारी संध्याकाळी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये ठाकूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी 9 वाजता होणार आहे.  

    रत्नागिरी जिह्यामधील लांजा तालुक्यातील भांबेड गावी 1921 मध्ये  अण्णा ठाकूर यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले. 1933 साली ते संघाचे स्वयंसेवक बनले. शिक्षण पूर्ण झाल्यावर चार वर्षे त्यांनी संघाचे प्रचारक (पूर्णवेळ कार्यकर्ता) म्हणून काम केले. त्यानंतर ते कोल्हापुरातच स्थायिक झाले. बिनखांबी गणेश मंदीर येथे त्यांचे ‘ठाकूर ऍण्ड कंपनी’ हे किराणामालाचे दुकान होते. रा.स्व.संघाचे तत्कालीन जिल्हा संघचालक दिग्दर्शक भालजी पेंढारकर आणि ऍड.बाबासाहेब खासबारदार यांच्या सोबत त्यांनी काम केले हेते. 1948 साली रा.स्व.संघावर असलेल्या बंदीच्या काळात ते सांगली येथे कारागृहात होते. त्यानंतर 1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळातही 2 वर्षे त्यांना तुरुंगवास झाला होता.  यावेळी त्यांच्या पत्नी कृष्णाताई ठाकूर व मुले असा संपूर्ण परिवारच कारागृहात होता. अण्णा ठाकूर 22 वर्षे संघाचे जिल्हा कार्यवाह होते. जिह्यामध्ये रा.स्व.संघ आणि परिवारातील विविध संघटना यांचा विस्तार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना कोल्हापूर भूषण सन्मानाने गौरवण्यात आले होते.

अण्णा ठाकूर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. गेल्या आठवडय़ापासून ते आजारी होते. शनिवारी सकाळी खासगी इस्पितळामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यसंस्कारावेळी बालगोपाल तालमीचे अध्यक्ष श्रीनिवास साळोखे, माजी आमदार सुरेश साळोखे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष मगेश जाधव, सदस्य सुभाष वोरा, स्थायी समितीचे माजी सभापती सुनील मोदी, विशेष सरकारी वकील विवेक शुक्ल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

Related posts: