|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लिंगायत समाजाचा आज महामोर्चा

लिंगायत समाजाचा आज महामोर्चा 

पश्चिम महाराष्ट्रातील समाज उतरणार रस्त्यावर : जगद्गुरुंसह अनेकांची उपस्थिती : प्रशासन सज्ज

प्रतिनिधी/ सांगली

स्वतंत्र धर्म मान्यतेसह अल्पसंख्यांक दर्जा व आरक्षणाच्या मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्यावतीने आज  महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा महामोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात पश्चिम महाराष्ट्रातील अवघा लिंगायत समाज सहभागी होणार आहे. महाराष्ट्रात नांदेड, लातूर नंतर सांगलीत निघणाऱया या महामोर्चाचे नेतृत्व डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज (वय 102) करणार असून त्यांच्यासह समाजाचे अनेक जगद्गुरु उपस्थित राहणार आहेत. 

सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे या जिह्यातून तसेच कर्नाटकातील विजापूर, बेळगाव मधून या मोर्चात मोठय़ा संख्येने लिंगायत समाज बांधव सहभागी होणार आहेत. सुमारे पाच लाख समाज बांधव रस्त्यांवर उतरतील असा आत्मविश्वास अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या पदाधिकाऱयांनी केला आहे. कर्नाटक व महाराष्ट्रात आतापर्यंत लिंगायत समाजाच्या वतीने 10 मोर्चे काढण्यात आले आहेत. महाराष्ट्रात नांदेड व लातूर पाठोपाठ सांगलीत निघणारा हा तिसरा महामोर्चा आहे. लातूरमध्ये निघालेल्या महामोर्चात 5 लाखाहून समाज बांधव रस्त्यांवर उतरले होते. त्याहीपेक्षा मोठा प्रतिसाद सांगलीतील महामोर्चास मिळेल असा दावा संयोजकांनी केला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून संयोजकांनी सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला आहे. सभा, मोटार, मोटारसायकल रॅली, बैठका घेत समाजामध्ये जनजागृती निर्माण केली आहे.

नेतृत्व डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांकडे

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. लिंगायत स्वतंत्र धर्म, अल्पसंख्याक दर्जा आणि सर्व पोटजातींना ओबीसी आरक्षण अशी समाजाची मागणी आहे. सकाळी 10 वाजता विश्रामबाग चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी विश्रामबाग चौकात भव्य बसवपीठ तयार करण्यात आले आहे. या पीठावरुन समाजातील जगद्गुरुसह मान्यवर भूमिका मांडणार आहेत. तीन मुलींचीही भाषणे होणार आहेत. नंतर महामोर्चाने जात दहा जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱयांना निवेदन देणार आहे.

सांगली शहर भगवे

महामोर्चाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण सांगली शहर भगवे झाले आहे. ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. याशिवाय भगव्या झेंडे लावण्यात आले आहेत. महामोर्चाच्या मार्गावर लाऊडस्पिकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस, महापालिका व जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. विजयनगर ते विश्रामबाग या रस्त्यांवरील वाहतूक सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद टेवण्यात आली आहे. महामोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची सांगली पोलिसांनी काळजी घेतली आहे. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चोख पार्किंग व्यवस्था

महामोर्चासाठी पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातून लाखो समाज बांधव येणार आहेत. त्यांच्या वाहनांसाठी चोख पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मिरज व कर्नाटकातून येणाऱया वाहनांसाठी संजय भोकरे कॉलेज, चिंतामण, विलिंग्डन महाविद्यालय, भारती विद्यापीठाजवळील वॉन्लेसचे मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूरहून येणाऱया वाहनांसाठी नेमिनाथनगरमधील मैदान व शंभर फुटी रस्त्याची एक बाजू, इस्लामपूर-शिराळाकडून येणाऱया वाहनांसाठी आंबेडकर स्टेडियम, तासगाव-पलूसकडून येणाऱया वाहनांसाठी सह्याद्रीनगर येथील 80 फुटी रोड व मार्केट यार्ड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

महामोर्चासाठी पाचहजार स्वयंसेवक

महामोर्चा यशस्वी करण्यासाठी समाजातील पाचहजार स्वयंसेवक राबत आहेत. यामध्ये महिला स्वयंसेवकांचाही समावेश आहे. या स्वयंसेवकांना शनिवारी प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मोर्चासाठी परजिह्यातून येणाऱया समाज बांधवांसाठी न्याहरीचाही सोय करण्यात आली आहे. मिरज शहरात वैद्यकिय व्यावसाय करणाऱया समाजातील डॉक्टरांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सुमारे अडीच लाख समाज बांधवांच्या न्याहरी व पाण्याची सोय करण्यात आली आहे. मुस्लीम समाजाच्या वतीनेही महामोर्चाच्या मार्गावर पाण्याची सोय करण्यात आली आहे. 

वाहनांना बंदी असलेले मार्ग

विजयनगर ते विश्रामबाग चौक, टाटा पेट्रोल पंपाकडून विश्रामबाग चौक, शंभर फुटीकडून अय्यंगार बेकरीकडे, आलदर चौक ते खरे मंगल कार्यालयाकडून आदित्या हॉस्पिटलकडे येणारा मार्ग, हनुमान हॉटेलकडून पै प्रकाश हॉटेलकडे येणारा मार्ग, रेल्वे फाटकांकडून विश्रामबागकडे येणारा मार्ग, †िवश्रामबाग गणपती मंदीराकडून बाटा शोरुमकडे येणारा मार्ग, मंगळवार बाजाराकडून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्याकडे येणारा मार्ग.

पर्यायी वाहतूक मार्ग

मिरजकडून सांगली शहरात येण्यासाठी विजयनगर-हसनीआश्रम-स्फूर्ती चौक-100 फुटी मार्गे एसटी स्टँड सांगली,

विश्रामबाग गणपती मंदिराकडे जाणारा शंभर फुटी रोड : टाटा पेट्रोल पंप-नेमीनाथ नगर-शंभर फुटीरोड- एसटी स्टँड सांगलीकडे.

मिरजकडे जाण्यासाठी : एसटी स्टँड-सिव्हील हॉस्पिटल-माळी मंगल कार्यालय-100 फुटी रोड-स्फूर्ती चौक-हसनी आश्रम-विजयनगर-मिरज.

Related posts: