|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पालिका क्रीडाधिकाऱयांना बडतर्फ करण्याचा ठराव

पालिका क्रीडाधिकाऱयांना बडतर्फ करण्याचा ठराव 

प्रतिनिधी/ सोलापूर

महापालिका क्रीडा खात्यातील गैरप्रकारांना जबाबदार धरुन क्रीडाधिकारी नजीर शेख यांना बडतर्फ करा आणि झालेले नुकसानही त्यांच्याकडून वसूल करा, असा ठराव स्थायी समितीमध्ये एकमताने मंजूर झाला. फेरीवाल्यांना प्रशासनाकडून 21 टक्के भाडेवाढ केलेली असून स्थायीने 10 टक्केच करावी, असाही ठराव केला.

स्थायी समितीची सभा सभापती संजय कोळी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सायंकाळी पार पडली. क्रीडा खात्याच्या लेखापरीक्षण अहवालावरुन क्रीडाधिकारी शेख यांना सत्ताधारी भाजप व विरोधीपक्ष शिवसेनेच्या सदस्यांनी धारेवर धरले. तर मुस्लिम अधिकाऱयावर अन्याय होत असल्याचा आरोप बसपाचे आनंद चंदनशिवे यांनी केला.

क्रीडाखात्यातील गैरप्रकारात भरणा रकमेत तफावत, परस्पर गाळा हस्तांतर करणे, मुदत संपली तरी टिप्पणी उशिराने पाठवणे, वर्षानुवर्षे भाडेवसुली न करणे, गाळा नंबर 16 प्रकरणी गैरप्रकार असा ठपका ठेवत सत्ताधारी भाजपने सूचना व शिवसेनेने उपसूचना मांडत क्रीडाधिकारी नजीर शेख यांना बडतर्फ करा आणि झालेले नुकसानही त्यांच्याकडून वसूल करा, असा ठराव एकमताने करण्यात आला. या निर्णयास विरोध करताना बसपाचे चंदनशिवे म्हणाले की, क्रिडाधिकारी मुस्लिम असल्याने त्याच्यावर अन्याय होत असून सत्ताधाऱयांना आपल्या मर्जीतील क्रिडाधिकारी नियुक्त करायचा असल्याने हा प्रकार सुरु आहे. सहकारमंत्री व पालकमंत्री यांच्यातील वादाचा परिणाम पालिकेत होत असून महापौरांच्या निर्णयाला भाजपाचा दुसरा गट कायम विरोध करतो आहे.

कुत्रे निर्बिजीकरणाचे टेंडर दरवर्षी काढण्याच्या दुरुस्तीसह हा ठराव एकमताने करण्यात आला. शहरातील 30 हजार मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी   प्रति कुत्रा 665 रुपयांप्रमाणे काढण्यात येत असलेली टेंडर प्रक्रिया चुकीची आहे. बजेट 30 लाखांचे असताना एक कोटी 20 लाखांचे टेंडर काढण्याचा प्रकार सुरु असल्याचे चंदनशिवे यांनी सांगितले. आरोग्य खात्याकडील किटकनाशके खरेदी व प्रभाग 14 मधील रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव 4 दिवसात फेरसादर करण्याचाही विशेष निर्णय झाला. शहरातील चारचाकी हातगाडी विपेत्यांना प्रतिदिन 20 रुपयांप्रमाणे वार्षिक 7300 रुपये तर विनापरवाना व्यावसायिकांना 250 रुपये दंड, परवाना नूतनीकरण फी 100 रुपये असे एकूण प्रत्येक फेरीवाला विक्रेत्यांकडून वार्षिक 7 हजार 650 रुपये आकारणी करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. सत्ताधारी भाजपाने 10 टक्के वाढ सुचवून वार्षिक 3850 रुपये आकारण्याची सूचना मांडली तर शिवसेनेने आयुक्तांना अधिकार देण्याची उपसूचना मांडल्याने ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

बसपाने भाडेवाढीला विरोध करीत भाडेवाढीचा विषय फेबुवारीतच येणे आवश्यक होते असे सांगितले. शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अभिनंदनाचा ठराव केला. श्वानदंश लस खरेदीतील गैरप्रकाराबाबत शिवसेनेने आयुक्तांना सूचित करण्यात आल्यानंतर याप्रकरणी आयुक्तांनी योग्य निर्णय घेत महापालिकेचा अवास्तव होणारा खर्च वाचवला आणि दोषी आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांना निलंबित केले.

स्थायी सभेस श्रीनिवास करली, नागेश वल्याळ, गुरुशांत धुत्तरगावकर, रवी गायकवाड, मिनाश्री कंपली, राजश्री बिराजदार यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

Related posts: