|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तमाशाच्या वादातून धुळगावात निर्घृण खून

तमाशाच्या वादातून धुळगावात निर्घृण खून 

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

धूळगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेत तमाशा सुरू असताना आम्ही दंगा करतो म्हणून पंच कमिटीला का सांगितले? या किरकोळ कारणावरून गावातीलच अशोक तानाजी भोसले (वय 37) याचा सात जणांनी धारदार शास्त्रांनी वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. याच हल्ल्यात मयत अशोकचा भाऊ प्रकाशही हल्लेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. या खुनाच्या घटनेचे तीव्र पडसाद गावात उमटले संतप्त लोकांनी घटनास्थळी असलेल्या मोटारसायकलींची तोडफोड केली. तर शनिवारी आरोपींना पकडण्याची मागणी करीत धूळगाव बंद ठेवण्यात आले. गावामध्ये तणाव असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱयांनी तळ ठोकला आहे.

धूळगाव येथे शुक्रवारी यल्लम्मा देवीची यात्रा होती. याच दिवशी बोनीचा कार्यक्रम होता यात्रेनिमित्त रात्री तमाशाचा कार्यक्रम होता. तमाशा पाहण्यासाठी गावातील तमाशा शौकिनांची गर्दी झाली होती. तमाशामध्ये गणगौळण सुरू असताना दंगा सुरू झाला. हा दंगा चौगुले वस्तीवरील मुलांनी सुरू केला होता. दंगा सुरू असताना अशोक तानाजी भोसले व त्यांचे बंधू प्रकाश भोसले यांनी 12.45 मिनिटानी यात्रेतील पंचकमिटीला चौगुले वस्तीवरील तरूण मुले तेथून निघून गेली.

रात्री 1.00 वाजता संदीप चौगुले, विशाल बिरा चौगुले, सागर चौगुले, कोंडीराम कनप, सागर बाबासाहेब चौगुले, विजय चौगुले, आरेवाडी येथील बिरू कोळेकर हे सर्वजण हातामध्ये कोयता, कुकरी, चाकू व काठय़ा घेऊन आले. अशोकच्या डोक्यात पाठीवर सपासप वार केले. प्रकाशवरही वार केले. या सातजणांच्या हल्यात अशोक ठार झाला. तर प्रकाश गंभीर जखमी झाला. ही घटना पोलीस स्टेशनला समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी अशोक भोसले यांचा खून झाल्याची बातमी गावात पसरल्यानंतर संतप्त लोकांनी यल्लम्मा मंदिराजवळ लावलेल्या दुचाकी गाडय़ांची तोडफोड केली. यात्रेकरूंचे स्वागत करण्यात लावलेले डिजिटल बोर्ड जमावांनी फाडले. या घटनेचे गावात तीव्र पडसाद उमटले आणि रात्रीपासून शनिवारी दिवसभर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. गाव कडकडीत बंद असताना एक दूध डेअरी चालू होती. गावातील संतप्त लोकांनी डेअरीची तोडफोड केली.

गावात कडक बंदोबस्त

धुळगावच्या यल्लम्मा यात्रेसाठी नारळ, उदबत्ती, मेवा, मिठाईवाले बाहेरगावावरून येतात. खून झाल्यानंतर या किरकोळ व्यापाऱयांनी त्वरित गाव सोडून आपल्या गावी धाव घेतली. धुळगावमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी नागनाथ वाकुडे कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यासह पाच पोलीस अधिकारी शंभरहून पोलिसांचा फौज फाटा दोन जलद कृतीदलाचे पोलीस गावात तळ ठोकून आहेत.

अशोक भोसले यांचे वडील तानाजी संभाजी भोसले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत असे म्हटले आहे की, मयत अशोक हा पुणे येथे पिंपळी सौदागर येथे राहतो. तिथे आपल्या मुलाचा खासगी व्यवसाय आहे. गावातील यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त मुलगा पत्नी मुलासह आला होता. आपला दुसरा मुलगा प्रकाश याच्यासह आम्ही तिघेजण तमाशा बघायला गेलो. तिथे चौगुले वस्तीवरील तरूणांनी दंगा सुरू केला होता. ही मुले कायमच दंगा करतात असे अशोकने व प्रकाशने यात्रा पंच कोंडीराम कनप, सागर बाबासाहेब चौगुले, वजिय चौगुले, व बिरू कोळेकर यानी अशोकचा खून केला. प्रकाशला जखमी केले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी भेट देऊन आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. अशोक भोसले यांच्या खूनप्रकरणी सात जणांवर कवठेमहांकाळ पोलिसांत 387, 302, 324, 143, 148, 149, 4 व 25 या कलामन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनाचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड करीत आहे.

पाच पथके रवाना

अशोक भोसले खून प्रकरणातील सातही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके शोध घेण्यासाठी रवाना केली आहेत. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडील दोन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील दोन आणि गुंडाविरोध पथकाकडील एक अशी ही पाच पथके आरोपींचा शोध घेत आहेत, अशी माहिती जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मयत अशोकच्या मांडीवरच आरोपींनी तीक्ष्ण हत्यारांनी वार केल्याने रक्तस्राव मोठय़ा प्रमाणात झाला असे शवविच्छेदानंतर स्पष्ट झाल्याचे वाकुडे यांनी सांगितले.

Related posts: