|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्जमाफी, जीएसटी’च्या नाराजीचा फायदा उचला

कर्जमाफी, जीएसटी’च्या नाराजीचा फायदा उचला 

प्रतिनिधी/ मिरज

राज्यातील भाजपा शासनाच्या केवळ घोषणा आणि थापेबाजीमुळे  समस्यांची व्याप्ती वाढली आहे. कर्जमाफी, शेतीमालाचा भाव यामुळे शेतकऱयांमध्ये तर नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यापाऱयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. 12 डिसेंबरच्या नागपूर येथील मोर्चाला मोठय़ा संख्येने हजेरी लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी शहरातील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात सांगली आणि सातारा जिह्यातील काँग्रेस पदाधिकाऱयांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अशोकराव चव्हाण बोलत होते. नांदेडचा विजय हा लोकांना हवा असलेला उमेदवार दिल्यामुळे झाला. आपल्याला कोण पाहिजे, यापेक्षा लोकांना कोण पाहिजे, हे पाहणे गरजेचे आहे. तसे झाले तर लोक काँग्रेसच्या निश्चित मागे लागतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

सध्याच्या भाजपा शासनाने अनेक निर्णय घेतले. पण ते केवळ कागदावर आहेत. कर्जमाफी, शेतीमालाला मिळणारा भाव यामुळे शेतकऱयांत प्रचंड असंतोष असून, शेतकऱयांच्या आत्महत्यांमध्ये वाढच झाली आहे. जीएसटीमुळे तर व्यापाऱयांचे कंबरडे मोडले आहे. तरीही हे सरकार या गंभीर समस्यांकडे पहावयास तयार नाही. केवळ घोषणा आणि ऑनलाईन कार्यक्रमांचा बागुलबुवा केला जात आहे. त्यामुळे राज्यात समस्यांची व्याप्ती वाढली आहे. असंतोष जनतेला त्यांचा दबलेला आवाज उठविणारा पक्ष हवा आहे. काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारावी, कारण काँग्रेसबाबत लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

गुजरातच्या निवडणुकांवरुन देशातील राजकीय वातावरण बदलत आहे. येथे पंतप्रधानांना 50 सभा घ्याव्या लागत आहेत. शिवाय दहा-बारा राज्याचे मुख्यमंत्री तळ ठोकून आहेत. असे असतानाही राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचाच अर्थ भाजपाच्या अधोगतीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपप्रचार, शासकीय यंत्रणेचा चुकीच्या पध्दतीने वापर केला जात आहे. तरीही सध्या झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असल्याचे चव्हाण म्हणाले. राज्यातील भाजपाला काँग्रेसची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. यासाठी 12 डिसेंबरला नागपूरला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसनेते राहुल गांधी, गुलामनबी आझाद, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार, खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सांगली, सातारा जिह्यातील पदाधिकाऱयांनी यासाठी मोठय़ा संख्येने हजेरी लावावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

सांगली महापालिकेची निवडणूक एकोप्याने लढल्यास सत्ता हस्तगत करण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी सर्वजण एकत्रित बसा आणि एकसंघ होऊन एकोप्याने विचारपूर्वक लढा द्या, असे आवाहन चव्हाण यांनी केले. 2018 हे वर्ष काँग्रेससाठी सर्वार्थाने महत्वाचे वर्ष आहे. यावर्षात भाजपा विरुध्द लाटेचा फायदा घेण्यात आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात तुम्ही यशस्वी ठरला तर, 2019 नंतर सर्वत्र काँग्रेसचेच वर्चस्व असेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. कर्जमाफी आणि वाढत्या आत्महत्याबाबत आगामी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही ते म्हणाले.

प्रारंभी सांगली जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत केले. नांदेड निकालानंतर राज्यात आणि देशातील राजकीय चित्र बदलू लागले आहे. हाच नांदेड पॅटर्न सांगली जिह्यात राबवून मनपाची सत्ता पुन्हा काँग्रेस हस्तगत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्याहस्ते अशोक चव्हाण, आमदार डॉ. पतंगराव कदम, माजीमंत्री प्रतीक पाटील, बंटी पाटील, विश्वजित कदम यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला आमदार मोहनराव कदम, श्रीमती शैलजा पाटील, जिह्याचे प्रभारी प्रकाश यलगुलवार, प्रकाश सातपुते, प्रदेश प्रतिनिधी अल्लाबक्ष मेस्त्री, माजी आमदार हाफिजभाई धत्तुरे, सौ. मालन मोहिते, वहिदा नायकवडी, सौ. प्रतीक्षाताई सोनवणे, सत्यजित देशमुख, विशाल पाटील, आनंदराव मोहिते, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपूते, संजय मेंढे, धनराज सातपूते, माजी आमदार उमाजी सनमडीकर, सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्यासह सांगली, सातारा जिह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कायदा, सुव्यवस्था ढासळली

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, हे सांगली, नांदेड, लातूर येथे घडलेल्या घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. सांगली तर पोलिसांनी केलेल्या अत्याचारात एकाचा बळी गेला. ही घटना शासनाला कलंकीत करणारी आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलण्याची गरज होती. पण, तसे झाले नाही. उलट काही अधिकाऱयांना सवलत देण्याचा उद्योग यांनी केला. मराठा मोर्चा, लिंगायत मोर्चा याला हे शासन न्याय देणार का? असा सर्वांसमोरचाच प्रश्न आहे. यावरुन भाजपा शासनाच्या अधोगतीला सुरूवात झाली असून, याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहनही अशोक चव्हाण यांनी केले.

 

Related posts: