|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अखेर विसर्जन तळे बुजवण्याच्या कामास सुरुवात

अखेर विसर्जन तळे बुजवण्याच्या कामास सुरुवात 

पदाधिकारी अनभिज्ञ, मुख्याधिकारी गोरे यांचा होकार

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेने सुमारे 50 लाख रुपये खर्चून जिल्हा  परिषदेच्या शिक्षण विभागाच्या मालकीच्या जागेत तळे खोदले होते. हे तळे धोकादायक बनले होते. त्याबाबत वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासन आणि जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारी करुनही तळे बुजवले जात नव्हते. अखेर पालिका प्रशासनाने शनिवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने तळे बुजवण्याच्या कामास सुरुवात केली. याबाबत पालिकेचे पदाधिकारी अनभिज्ञ तर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केवळ होकार भरला. त्यावरुन पालिकेत पदाधिकारी अधिकारी यांच्यामध्ये तारतम्य नसल्याचेच समोर आले आहे.

सातारा शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विसर्जन तळे पालिकेने सुमारे 50 लाख रुपये खर्चून खोदले होते. या तळय़ात शहरातील गणेश मंडळांनी आपल्या गणेश मूर्तीचे तर दुर्गाउत्सव मंडळांनी आपल्या दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन केले होते. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत हे तळे आहे. तळयाकडेचे संरक्षक जाळे काढून नेण्यात आल्याने हे तळय़ाचा परिसर डेंजर झोन बनला आहे. तसेच तळय़ात पाणी नसल्याने विसर्जित केलेल्या मुर्ती उघडय़ा पडल्या आहेत. तसेच असलेले पाणी दुर्गंधीयुक्त बनले आहे. त्यामुळे रोगराईस निमंत्रण असे तळे बनले गेले. तसेच मध्यपींसाठीही तळय़ाचा परिसर आगार बनला आहे. पालिका प्रशासनाकडून हे तळे बुजवण्यात येत नव्हते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी तळे बुजवण्याबाबत पालिका प्रशासनाला फोनवरुन विचारणाही केली होती. तरीही त्याकडे पालिका प्रशासनाने कानाडोळा केला होता. अखेर शनिवारी सकाळी जेसीबीच्या सहाय्याने हे तळे बुजवण्याच्या कामाला सुरवात केली. मात्र, पुन्हा कशात माशी शिंकली ती जेसीबी अर्धवट काम सोडून निघून गेला. याबाबत पालिका प्रशासन म्हणून शंकर गोरे यांना विचारणा केली असता त्यांनी तळे बुजवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे, असे होकारार्थी सांगितले तर उपाध्यक्ष राजू भोसले यांना विचारणा केली असता त्यांनी तळे बुजवण्याचे काम लवकरच हाती घेवू असे सांगितले. त्यामुळे पालिकेत पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेच स्पष्ट झाले आहे. 

 

Related posts: