|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फलटण बिबटय़ा

फलटण बिबटय़ा 

शहर प्रतिनिधी/ फलटण

शहरानजिक असलेल्या फरांदवाडी गावच्या हद्दीतील तांबमाळ येथील राजेंद्र जाधव यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीला हिंस्त्र प्राण्याने ठार मारल्याचा प्रकार काल सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडला. सदर पाहिलेला हिंस्त्र प्राणी बिबटय़ाच असल्याचा असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. तर परिसरातील पायांच्या ठशावरुन ते तरस असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या आधिकाऱयांनी व्यक्त केल्याने बिबटय़ाविषयी सस्पेन्स व भितीचे वातावरण कायम असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

  शहर व परिसरातील वातावरण बिबटय़ाच्या आगमनाच्या चर्चेने ढवळून निघालेले असतानाच हा प्रकार घडल्याने गोंधळात व अफवांमध्ये मोठय़ा प्रमाणात भरच पडली आहे. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास राजेंद्र जाधव हे आपल्या घरासमोर बांधलेल्या शेळ्य़ा घरामध्ये बांधण्यासाठी गेले असता, बाहेर त्यांना शेळीचे करडू जोरात ओरडल्याचा आवाज आल्याने ते बाहेर आले. तेव्हा त्यांच्या पाच महिन्याच्या पाटेस एक हिंस्त्र प्राणी मारुन त्यास ओढून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. सदर प्राण्याच्या अंगावर पांढरे ठिपके असून तो बिबटय़ाच असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. सदर घटनेचा प्रकार समजताच वनअधिकारी व पोलीस अधिकाऱयांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली परंतु रात्रीची वेळ असल्याने फारसे काही हाती लागले नाही. शनिवार 2 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास वनक्षेत्रपाल सुरेश घाडगे यांनी वनपाल जनार्दन पवार, जगताप, इनामदार आदींसह तांबजाई देवी मंदिराच्या परिसराची पाहणी केली असता या मंदिरामागील शेखर जगताप यांच्या शेतात मोठय़ा प्रमाणात ठसे आढळून आले. सदर ठशांचे नमुने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या साच्यात घेण्यात आले असून सातारा येथे तपासणीअंती ते ठसे कोणाचे हे स्पष्ट होणार आहेत. मात्र प्राथमिकदृष्टय़ा हे ठसे बिबटय़ाचे नसून तरसाचे असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. 

  बिबटय़ा अजून अंधारातच…

फलटण शहरातील एका सिनेमागृहाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेला प्राणी बिबटय़ाच असल्याचे वन खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र पाळीव प्राण्यांवर हल्ला झालेल्या घटनांमध्ये बिबटय़ाचा सहभाग नसल्याचे वनविभागाचे म्हणणे असल्याने अंधारातील बिबटय़ा अद्याप उजेडात न आल्याने सर्वत्र भितीचे   वातावरण आहे. सोशल मीडियावरही आफवांना ऊत आल्याने शहर व पलिसरात संभ्रमाचे वातावरण कायम आहे.

 

  दरम्यान, वनक्षेत्रपाल सुरेश घाडगे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की,  1 रोजी तांबमाळ येथील राजेंद्र बबन जाधव यांच्या राहत्या घरासमोर झाडांना बांधलेल्या तीन शेळ्य़ांपैकी एका शेळीवर बिबटय़ाने हल्ला केल्याचे समजल्यावरून प्रत्यक्ष घटनास्थळी वनविभागाचे कर्मचाऱयांनी मृत शेळीची पाहणी केली व प्रत्यक्षदर्शी जाधव यांना वन्यप्राण्याची विचारपूस केली. रात्रीची वेळ असल्याकारणाने त्या परिसरात फिरून वन्यप्राण्याचे पायाचे ठसे न घेता आल्याने 2 रोजी सदर परिसरामध्ये फिरून जवळील शेतामध्ये लोकांच्या सांगण्यानुसार गेलेल्या दिशेला फिरून पाहणी केली. जागोजागी असलेल्या ठशांचे ट्रेसिंग घेऊन त्याचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे कास्टिंग तयार केले व पुढील तपास कामी विभागीय कार्यालय सातारा येथे पाठवले असता आढळून आलेले ठसे हे निश्चितपणे तरसाचे असल्याचे उलट तपासाअंती कळविण्यात आले आहे. तसेच 29 रोजी फलटण शहरातील सिटी प्राईड सिनेमागृहाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबटय़ाचा वावर आढळून आलेला होता. प्रसंगी सिटीप्राईड सिनेमागृहाचे आमचे सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण. एस. बी व सर्व स्टाफ यांचेसमवेत पुर्ण सिनेमागृहामध्ये सिनेमागृहातील बिबटय़ा लपुन बसले असण्याची शंका असलेली ठिकाणांची पाहणी केली त्यामध्ये बिबटय़ा आढळून आलेला नाही. सीसीटीव्ही फुटेज नुसार बिबटय़ा असल्याची खात्री असल्याने आमचे सर्व कर्मचारी बाणगंगा नदी परिसर शहरातील इतर ठिकाणांचा फिरून सर्व परिसर पिंजून काढलेला आहे. तरी फलटण शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही बातमीची पुर्ण खात्री झाल्याशिवाय सोशल मिडीयामध्ये त्याचा प्रचार व प्रसार करू नये. तसेच रात्री अपरात्री फिरताना नागरिकांनी,शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी. बिबटय़ासंदर्भात काही माहिती समजल्यास त्वरित 98506517 61 व 9423593597 या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन घाडगे यांनी केले आहे.

Related posts: