|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गिरिजाताई संगीत महोत्सवाला शानदार सुरूवात

गिरिजाताई संगीत महोत्सवाला शानदार सुरूवात 

सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा पत्रकार संघ आयोजित केलेल्या 29 व्या स्व. गिरिजाताई केळेकर स्मृती संगीत समारोहाचे उद्घाटन फर्मागुडी येथील गोपाळ गणपती देवस्थानच्या प्राकारात झाले. कला व संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्वरसोहळय़ाचे उद्घाटन गोव्याचे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते दिपप्रज्ज्वलाने झाले.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार परेश प्रभू. बांदोडा गावचे सरपंच रामचंद्र नाईक, गोपाळ गणपती देवस्थानचे अध्यक्ष ऍड. मनोज बांदोडकर, सत्कारमुर्ती पं. सुधाकर करंदीकर, लक्ष्मण म्हाब्रे, धर्मानंद गोलतकर, आयोजन समितीचे अध्यक्ष नारायण नावती व समेलनाध्यक्ष जयंत मिरेगकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रमुख पाहूणे मंत्री गोविंद गावडे म्हणाले की माणूस हा मुळातच कलावंत असतो, माणसांचे जीवन म्हणजे संगीतच आहे. आवड, जिद्द आणि निष्ठा असेल तर कुठलीही गोष्ट असाध्य नाही. हे संगीत संमेलन अव्याहतपणे चालू रहावे अशी ईच्छा व्यक्त कराताना सुर, ताल आणि लयीशिवाय माणसाचे जीवन अपुर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. समाजामध्येही समाजोपयुक्त घटक अविरतपणे वावरल्यास संगीताप्रमाणेच मानवी जीवनही प्रबळ आणि सुखी होऊ शकेल.

प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार परेश प्रभू म्हणाले की काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी बदलत असतात, लुप्त होत असतात परंतू संगीत हे चिरंतन आहे. सर्वकालीन आहे. संगीत ही ह्यदयाची भाषा असल्यामुळे ती समजायला सुलभ आहे. साहित्य आणि संगीत या मानवी मनाला समृद्ध बनविण्याच्या गोष्टी आहेत त्यामुळे चांगल्या पिढीच्या निर्मितीचे स्वप्न संगीताच्या माध्यमातून साकार होऊ शकते.

यावेळी शास्त्रिय संगीत संमेलनाचे गुरू पं. सुधाकर करंदीकर,भजन कलोपासक लक्ष्मण म्हांब्रे व नाटय, भजन, संगीतातील ज्येष्ठ प्रतिभावंत धर्मानंद गोलतकर यांचा अनुक्रमे आयोजन समिती, कै. लक्ष्मीकांत घाटे ट्रस्ट व पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती प्रित्यर्थ रघुनाथ फडके पुरस्कृत शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

आयोजन समितीचे अध्यक्ष नारायण नावती, सरपंच रामचंद्र नाईक, ऍड. मनोज बांदोडकर यांची यावेळी समयोचित भाषणे झाली. समितीतर्फे मंत्री गोविंद गावडे व परेश प्रभू यांचाही शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समाजोपयुक्त आणि संगीतोपयुक्त व्यक्तिमत्व म्हणून रामनाथ ग. नाईक यांना गौरविण्यात आले. याशिवाय पोलिस खात्याचे माजी जनसंपर्क अधिकारी जॉन आगियार, गायिका उर्वशी मिरिंगकर, राजू अनाथ यानाही विशेष कार्यासाठी गौरविण्यात आले. स्वरांजली या स्मरणिकेचे प्रकाशन सरपंच रामचंद्र नाईक यांच्याहस्ते करण्यात आले.

संमेलनाध्यक्ष जयंत मिरेगकर यानी स्वागत केले. दुर्गाकुमार नावती व दीपा मिरिंगकर यांनी सुत्रसंचालन तर गोकुळदास मुळवी यांनी आभार मानले. संगीत संमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये मयांक टेंग्से यांचे संवादिनी एकालवादन तर दुसऱया सत्रामध्ये पं. विजय कोपरकर यांचे बहारदार गायन झाले.

आज होणाऱया दुसऱया सत्रात ऋग्वेदा देसाई, मुग्धा गावकर यांचे गायन, श्री नरेश मडगांवकर यांचे संतूरवादन, पं. नयन घोष व कु. ईशान घोष यांची तबला वादनाची जुगलबंदी तसेच प्रल्हाद हडफडकर, रघुनाथ फडके, दिव्या चाफडकर व करूणा गावकर व अंबर मिरिंगकर यांचे नाटय़गीत गायनाचे सादरीकरण होईल. 

Related posts: