|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मधुमेह रोगाचा अज्ञानामुळेच बागुलबुवा

मधुमेह रोगाचा अज्ञानामुळेच बागुलबुवा 

माधवबागचे कॉर्पोरेट हेड मिलिंद सरदार यांचे मत

प्रतिनिधी/ बेळगाव

वाळवीप्रमाणे शरीर निकामी करणाऱया ‘मधुमेह’ रोगाचा अज्ञानामुळे बागुलबुवा झाला आहे. औषधाचे सेवन करून मधुमेह नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात मात्र मधुमेहाचे औषध एकदा घ्यायला सुरुवात केली की ते कायमचेच बनून जाते. मात्र, माधवबागतर्फे ‘मधुमेहावर कायमची मात’ ही चळवळ सुरू केल्यापासून हजारो रुग्णांचा मधुमेह पूर्णतः नियंत्रित झाला आहे, असे मत माधवबागचे कॉर्पोरेट हेड मिलिंद सरदार यांनी व्यक्त केले.

लोकमान्य सोसायटी आणि माधवबाग मल्टिडिसिप्लिनरी कार्डिऍक केअर क्लिनिक बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधुमेह निर्मूलन कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी मिलिंद सरदार बोलत होते. वरेरकर नाटय़ संघाच्या महावीर मिरजी सांस्कृतिक भवनात शनिवारी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यशाळेचे उद्घाटन लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर यांच्यासह बाबा धोंड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

व्यासपीठावर डॉ. सचिन पाटील, डॉ. सागर मित्तल, डॉ. शीतल महाजन, डॉ. सई पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी गजानन धामणेकर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

‘सर्वे भवन्तू सुखिनः सर्वे सन्तू निरामयः! ही आरोग्य प्रार्थना म्हणून मिलिंद सरदार यांनी व्याख्यानास प्रारंभ केला. चुकीची जीवनशैली, मानसिक ताणतणाव, व्यायामाचा अभाव यामुळे प्रामुख्याने मधुमेह होतो. या सर्वांवर उपचार आपण स्वतःच करू शकतो. मात्र, ‘कळते पण वळत नाही’ अशी वृत्ती बाळगून आपण स्वतःच मधुमेहाचा बागुलबुवा करत असल्याचे सरदार यांनी सांगितले.

मधुमेहामुळे शरीर निकामी होते, मानसिक स्थिती बिघडते, याहीपेक्षा खर्चामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते. यामुळे मधुमेह पूर्णतः बरा होण्यासाठी माधवबागतर्फे व्याख्यान, कार्यशाळा, जागृती कार्यक्रम यांच्या माध्यमातून मधुमेहावर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. देशातील 14 कोटी लोकांना मधुमेह झाला असून यामुळे पुढील काही दिवसात देशातील 60 टक्क्यांहून अधिकांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार आहे. याकरिता आतापासूनच जीवनशैलीत बदल केल्यास पुढील धोका टळेल, असे डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले.

यावेळी दृक साधनांच्या माध्यमातून मधुमेह आजाराची लक्षणे, उपचार, स्थिती याबाबतचा प्रवास त्यांनी उलगडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related posts: