|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऑनलाईन परवाने सुरळीतपणे मिळण्यात अडथळे

ऑनलाईन परवाने सुरळीतपणे मिळण्यात अडथळे 

प्रतिनिधी / बेळगाव

राज्य वाहतूक विभागाने वाहन परवाना तसेच नव्या वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात सुरू केली आहे. यामुळे नागरिकांना आवश्यक अर्ज घरबसल्या भरून या सेवांचा लाभ घेता येणार आहे, अशी खात्याची योजना असली तरी ऑनलाईन परवाने सुरळीतरीत्या मिळणे कठीण होत आहे. ही योजना सुरू होऊन दोन वर्षे होत असताना तांत्रिक चुका आणि खात्याच्या गलथान कारभाराचीच चर्चा असून ऑनलाईनसाठीही एजंटांचाच आधार घ्यावा लागत आहे.  

मोठा गाजावाजा करून ही योजना 2015 पासून सुरू करण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयात पूर्णपणे कागदाविना काम होणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, नागरिकांना प्रत्यक्षात वेगळाच अनुभव येत आहे. ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध होणारे फॉर्म भरूनही कोणतीच हालचाल होत नाही. शेवटी वेगवेगळ्या कामांसाठी कार्यालयात जावून लेखी अर्ज भरण्याचीच वेळ नागरिकांवर येत आहे. सारे काही सुरळीत होण्यासाठी शेवटी एजंटांचाच आधार घ्यावा लागत आहे. 

वाहतूक विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्यावर भर दिला आहे. या अन्वये सर्व आरटीओ कार्यालये एकमेकांशी जोडली गेली आहेत. यामुळे ऑनलाईन स्वरुपात शिकावू व पक्का वाहन परवाना तसेच नूतन वाहनांची नोंदणी करून घेतली जात आहे. खात्याच्या www.rto.kar.nic.in  या वेबसाईटवर जाऊन संबंधित कामासाठीचा अर्ज नागरिकांनी भरल्यानंतर मात्र वेगळाच अनुभव येऊ लागला आहे. सदर अर्ज भरून महिनाभर प्रतीक्षा केली तरी पुढील कोणतीच प्रक्रिया होत नसल्याने नागरिकांना पुन्हा जुन्याच पद्धतीने वाहन परवाने व नोंदणी करावी लागत आहे.

घोषणा विरली हवेत

ऑनलाईन अर्ज भरल्यास वाहन चाचणीसाठी ठरावीक वेळ दिली जाईल. तसेच  चाचणीत उत्तीर्ण होणाऱयांना वाहन परवाना देण्यात येईल. किंवा वाहन नोंदणीसाठीही याच वेबसाईटवर फॉर्म भरणाऱयांना एखादा ठरावीक क्रमांक हवा असल्यास तो निवडून त्यासाठी निर्धारित रकमेचा डीडी आरटीओ खात्याकडे दिल्यानंतर तातडीने नोंदणीची प्रक्रिया होईल, यासारखी आश्वासने आणि एकंदरच घोषणा हवेतच विरून गेल्या आहेत.

ही सुविधा खात्याच्या नव्या मोबाईल ऍपवरसुद्धा उपलब्ध आहे. यासाठी संबंधितांनी 1800-425-425-425 या क्रमांकावर आपल्या मोबाईलवरून मिसकॉल दिल्यास तातडीने उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही जाहीर करण्यात आले होते. पण या नंबरवर कॉल किंवा मिसकॉल काहीही केल्यास उत्तरच मिळत नाही.

सुरुवातीच्या टप्प्यात म्हैसूर, मंगळूर, कोलार, बेळगाव, तुमकूर, बागलकोट, मंडय़ा, कारवार, हासन, बळ्ळारी, शिमोगा व बिदर आदी जिल्हय़ांसाठी ही योजना उपलब्ध झाली आहे. बेळगावसह उर्वरित सर्व जिल्हय़ात अशीच परिस्थिती आहे, अशी माहिती वाहतूक खात्यातील सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. याकडे वाहतूक विभाग केव्हा लक्ष देणार, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

Related posts: