|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पाठलाग चुकवायला गेला अन् जीव गमावला

पाठलाग चुकवायला गेला अन् जीव गमावला 

अबकारी अधिकाऱयांचा पाठलाग चुकविताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव

गावठी दारु जप्त करण्यासाठी पाठलाग करणाऱया अबकारी अधिकाऱयांना चुकविण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्याशेजारील पडक्या विहिरीत पडून सोनट्टी (ता. बेळगाव) येथील एका युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने अबकारी कार्यालय व वाहनावर दगडफेक केली.

आडव्याप्पा सिद्धाप्पा मुचंडी (वय 22, रा. सोनट्टी) असे त्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी पहाटे अबकारी अधिकाऱयांनी होनगा येथील लक्ष्मी धाब्याजवळ गावठी दारु वाहतूक करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मोहीम राबविताना ही घटना घडली आहे. आडव्याप्पाच्या कुटुंबियांनी मात्र अबकारी अधिकाऱयांनी खून करुन आपल्या मुलाला विहिरीत टाकल्याचा आरोप केला आहे.

दगडफेकीत कर्मचारी जखमी

या घटनेची माहिती मिळताच सोनट्टी येथील संतप्त नागरिक बेळगावात दाखल झाले. त्यांनी पोलीस मुख्यालयाजवळील अबकारी कार्यालयावर दगडफेक केली. कार्यालयाबाहेरील वाहनावरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अबकारी विभागाचे कर्मचारी एकनाथ बाबू गावडे (वय 55, रा. शांतीनगर) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, ग्रामीण विभागाचे एसीपी भालचंद्र, काकतीचे पोलीस निरीक्षक रमेश गोकाक आदी अधिकाऱयांनी सिव्हील हॉस्पिटलमधील शवागार व घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. पोलिसांनी संतप्त जमावाला शांत केले. सध्या काकती पोलीस स्थानकात सीआरपीसी कलम 174 सी अन्वये संशयास्पद मृत्यू प्रकरण असे या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱयांनी घेतली माहिती

अबकारी अधिकाऱयांनीही तोडफोडीबद्दल येथील मार्केट पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनीही या संपूर्ण घटनेसंबंधी अधिकाऱयांकडून माहिती घेतली आहे. अबकारी निरीक्षक के. लिंगराजू व त्यांचे सहकारी होनग्याजवळ गावठी दारु वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असताना पहाटे ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.

पोलीस व अबकारी अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार आडव्याप्पा व त्याचा आणखी एक साथीदार शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरुन गावठी दारुची टय़ूब नेत होते. अबकारी अधिकाऱयांनी पाठलाग केल्यामुळे मोटारसायकल व गावठी दारुने भरलेली टय़ूब रस्त्यावरच टाकून त्यांनी पलायन केले. आडव्याप्पा होनग्याहून देवगिरीकडे जाणाऱया मार्गावर पळत होता. रस्त्या शेजारील पडक्मया विहिरीत तो पडला. तातडीने दोरी टाकून त्याला विहिरीतून  बाहेर काढण्यात आले. 108 रुग्णवाहिकेतून त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या संबंधी अबकारी विभागाचे वरि÷ अधिकारी अरुणकुमार यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. पहाटे 5 वाजता ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

कुटुंबीयांचा आक्रोश

पाठलाग चुकविताना रस्त्याशेजारील विहिरीत पडून आडव्याप्पाचा मृत्यू झाल्याचे समजताच सोनट्टी येथील महिला व त्याचे नातेवाईक मोठय़ा संख्येने सिव्हील हॉस्पिटलमधील शवागाराबाहेर जमले. यावेळी महिला एकच आक्रोश करीत होत्या. अबकारी अधिकाऱयांवर थेट आरोप करण्यात येत होता. आडव्याप्पाचा खून करुन त्याला विहिरीत टाकल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र अबकारी विभागाचे वरि÷ अधिकारी अरुणकुमार यांनी हा आरोप फेटाळला. आडव्याप्पा विहिरीत पडला ही गोष्ट आपल्या अधिकाऱयांच्या लक्षात आली नाही. तो फरारी झाला असणार म्हणून सकाळी ते कार्यालयाला परतले. 6 वाजण्याच्या सुमारास अबकारी कार्यालय व वाहनावर दगडफेक झाल्यानंतरच ही गोष्ट आपल्या लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले.

संघर्ष जुनाच

बेळगाव तालुक्मयातील काकती, मुत्यानट्टी, हुल्यानूर, सोनट्टी, कारांवीसह डोंगराळ भागात गेल्या अनेक वर्षांपासून गावठी दारुच्या भट्टय़ा आहेत. राज्य सरकारने गावठी दारु थोपविण्यासाठी पोलीस व अबकारी विभागाला सक्त सूचना केल्या आहेत. पूर्वीपेक्षा या भट्टय़ांचे प्रमाण कमी झाले असले तरी व्यवसाय मात्र अद्याप सुरुच आहे. त्यामुळे पहाटेच्यावेळी अधिकारी गस्त घालत असतात. पहाटे मोटारसायकलीवरुन गावठी दारुची टय़ूब ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम सुरु असते. अनेकवेळा अबकारी व पोलिसांना पाहून मोटारसायकल व दारुने भरलेली टय़ूब तेथेच टाकून संशयित आरोपी पळून जातात. हा संघर्ष जुनाच आहे.

Related posts: