|Thursday, October 18, 2018
You are here: Home » मनोरंजन » … अशी सापडली परी

… अशी सापडली परी 

स्टार प्रवाहने कायमच नाविन्यपूर्ण कथानक असलेल्या मालिका सादर केल्या आहेत. ज्यांच्या कथा सांस्कृतिकदृष्टय़ा महाराष्ट्राशी नातं सांगणाऱया आहेत. या आधी कोल्हापूरची पार्श्वभूमी लाभलेल्या स्टार प्रवाहच्या देवयानी, पुढचं पाऊल या मालिका म्हणजे मराठी टेलिव्हिजनवरचे बेंचमार्क आहेत. या मालिकांवर महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं. या मालिकांमध्ये नकळत सारे घडले या मालिकेच्या रुपाने महत्त्वपूर्ण भर पडणार आहे.

नकळत सारे घडले ही कथा आहे परीची. लडिवाळ आवाजात तिने विचारलेल्या मी तुला आई म्हणू…? या तिच्या प्रश्नाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं आहे. स्टार प्रवाहच्या नकळत सारे घडले या मालिकेतील या छोटय़ा परीने प्रत्येकाच्या मनात जागा पटकावली आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे 100 हून अधिक ऑडिशननंतर ही परी सापडली. नकळत सारे घडले या मालिकेची मूळ संकल्पना आहे स्टार प्रवाह क्रीएटीव्ह टीमची. स्टार प्रवाहने अभिनेता स्वप्नील जोशीच्या जिसिम्स या संस्थेला या मालिकेची निर्मिती करायची संधी दिली. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेत उलगडणार आहे. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची अशा उत्तम स्टारकास्टची निवड स्टार प्रवाहने केली आहे. मात्र, मालिकेचे प्रोमो सुरू झाल्यापासून छोटी परी चर्चेत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 100 हून अधिक ऑडिशन घेतल्यानंतर ही परी सापडली.

परीच्या निवडीविषयी स्टार प्रवाहचे प्रवक्ते म्हणाले, आम्हाला या भूमिकेसाठी अतिशय निरागस चेहऱयाची मुलगी हवी होती. मात्र, आताच्या काळात लहान मुलं आपल्या वयापेक्षा जास्त मॅच्युअर दिसतात आणि वागतात जे आम्हाला नको होतं. महाराष्ट्रभरातून आलेल्या 100हून अधिक छोटय़ा मुलींची आम्ही ऑडिशन घेतली. मात्र, कुणीच योग्य वाटेना. अचानक एका ऑडिशनमध्ये ही परी सापडली. ती ज्या आत्मविश्वासाने ऑडिशनला उभी राहिली, ते पाहूनच आम्ही तिला निवडलं. ती खूप गोड आहे, निरागस आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसारखीच आहे. ही परी प्रेक्षकांच्या मनात घर करणार ही आमची खात्री आहे.

गाडी, बंगला, नोकर, सगळं आहे परीकडे, पण आईची माया ती सगळय़ांमध्ये शोधते. या छोटय़ा, लाघवी परीचा प्रवास नकळत सारे घडलेमध्ये सोमवार ते शनिवार सायंकाळी 7. 30 वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.

Related posts: