|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मानसिक दुखापतीशिवाय जगणे

मानसिक दुखापतीशिवाय जगणे 

मनुष्याची त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीशी सातत्याने देवाणघेवाण चाललेली असते. शारीरिक पातळीवर श्वसन, खाणेपिणे, इत्यादी तर मानसिक पातळीवर विचार, भावना, संवेदना, इत्यादी. प्रत्येक देवाणघेवाण ही मनुष्यामध्ये एक अवशेष सोडून जात असते, हा अवशेष स्मृतीच्या रूपाने मानवी मेंदूत साठत जातो व मनुष्याच्या भावी जीवनाचा आधार बनतो. मानवी स्मृती व संगणकीय स्मृती यातील महत्त्वाचा फरक म्हणजे मानवी स्मृतीमध्ये मानसशास्त्रीय घटक असतात तर संगणकीय स्मृतीमध्ये असे घटक नसतात. उदाहरणार्थ, काही गोष्टींच्या आठवणींनी माणसाला त्रास होतो पण संगणकाला त्रासाची भावनाच नसते-किंबहुना  संगणकामध्ये मानसशास्त्रीय घटक अशी संकल्पनाच दिसून येत नाही. आपल्याला असे कधीही पहावयास मिळत नाही, की संगणकाने रागाच्या भरात वस्तूंची तोडफोड केली किंवा दुखावला गेल्यामुळे काम करण्याचे नाकारले. मानसशास्त्रीय स्मृती ही माणसाच्या जीवनात सतत कार्यशील असते व त्यांच्या सुखदु:खांना कारणीभूत ठरत असते.

मनुष्य आपले दैनंदिन जीवन जगताना खूप वेगवेगळय़ा प्रकारच्या अनुभवांमधून जात असतो व प्रत्येक अनुभव हा आपला अवशेष स्मृतीच्या रूपाने मानवी मेंदूत सोडून जात असतो. हा अवशेष संगणकीय स्मृतीप्रमाणे निर्जीव नसून त्यात होऊन गेलेल्या घटनेचा अनुभव पुन्हा निर्माण करण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ मानसिकरित्या दुखावले जाण्याची घटनाः कोणीतरी व्यक्ती आपल्या संपर्कात येते व आपल्याला खूप काही भले-बुरे बोलून जाते. घटना संपलेली असते, व्यक्ती निघून गेलेली असते-कदाचित ती व्यक्ती पुन्हा कधीही आपल्याला भेटणार नसते, पण ती आपल्यामध्ये एक वेदनादायक स्मृती ठेवून गेलेली असते. कारण ज्या ज्या वेळी आपल्याला त्या घटनेची आठवण होते त्या त्या वेळी आपल्याला तेवढाच त्रास होतो जेवढा ती घटना प्रत्यक्षात घडताना व अनुभवताना झाला होता. याचा अर्थ मानसशास्त्रीय स्मृतीमध्ये घडून गेलेल्या घटनेचा अनुभव पुनरुज्जीवित करण्याची क्षमता असते, म्हणूनच घटना जरी फक्त एकदाच घडून गेलेली असली तरी मानसशास्त्रीय स्मृतीतून मनुष्य ती पुनः पुन्हा जगत राहतो. मानसिकरित्या एकदाच दुखावला गेला तरी मानसशास्त्रीय स्मृतीमुळे मनुष्य ते दु:ख वारंवार अनुभवत राहतो. कोणत्याही प्रकारच्या मानसशास्त्रीय दुखापतीशिवाय जगता येणे शक्मय आहे का?

जगातील प्रत्येक मनुष्य हा अगदी बालपणापासून विविध प्रकारे दुखावला जात असतो. शारीरिक दुखापतीवर औषधपाणी व अन्य इलाज करून त्या बऱया तरी करता येतात. पण मानसिकरित्या दुखावल्या गेलेल्या व्यक्तीवर कोणता इलाज करणार? या मानसिक दुखापती आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीवर परिणाम करतात आणि आपल्याला खूप सारे दु:ख भोगायला लावतात. त्यांच्यामुळे आपला जीवनाविषयीचा दृष्टिकोन विकृत होतो आणि त्याच्या परिणामस्वरूप आपण आपल्या भोवती एक संरक्षक कवच बनवून त्यात जगू लागतो. त्यामुळे कालांतराने आपण जीवनाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला होऊन एकटे पडतो व गतिहीन बनतो. जसे डबक्मयात साठलेले पाणी कुजत जाते तसे गतिहीन जीवनदेखील सडत जाते. कोणतीही घटना मानसिक दुखापतीशिवाय अनुभवता येणे शक्मय आहे का? पूर्वी घडून गेलेल्या घटनांची मानसशास्त्रीय स्मृती पुसून टाकता येणे शक्मय आहे का?

कोणत्याही दुखावल्या जाण्याच्या घटनेत दोन गोष्टींचा अंतर्भाव असतो. एक म्हणजे बाहय़ परिस्थिती अथवा अन्य व्यक्ती आणि दुसरी म्हणजे आपल्या आत निर्माण होणारी दु:खाची संवेदना अथवा भावना. सामान्यतया एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने किंवा वागण्याने जेव्हा आपण दुखावले जातो तेव्हा आपले सगळे लक्ष दुखवणाऱया व्यक्तीकडे असते पण आपल्या आत निर्माण झालेली दु:खाची भावना दुर्लक्षित होत असते. आपली संपूर्ण विचारयंत्रणा दुखावणाऱया व्यक्तीसंबंधी विचार करण्यात गुंतलेली असते. ती व्यक्ती किती वाईट आहे, ती असे बोलू तरी कसे शकते, पुन्हा त्या व्यक्तीने असे काही केले तर मी पण तिला सोडणार नाही, संधी मिळाल्यास मी पण सूड घेईन, इत्यादी विचारांनी आपले मन ग्रस्त होते. ही परिस्थिती आग लागलेल्या घरासारखी असते. आपल्या घराला लागलेली आग विझवण्याऐवजी आपण ती आग लावणाऱया व्यक्तीला धडा कसा शिकवता येईल याचा विचार करत बसलेलो असतो. आपल्या आत निर्माण झालेली दु:खाची संवेदना ही आगीसदृश असते, ती आपल्याला आतून जाळत असते, पण ती आग विझवण्याऐवजी आपण ती संवेदना निर्माण करणाऱया व्यक्तीच्या मागे धावत सुटतो. साहजिकच आहे, की या संपूर्ण घटनेची तिच्यातील सर्व मानसशास्त्रीय घटकांसकट आपल्या मेंदूत नोंद होते व स्मृतीच्या रूपाने ती आपले आंतरिक घर जाळत राहते. किती काळ ही आठवण आपल्याला त्रास देत राहील याचा काहीही हिशेब नसतो. घटनेनंतर कित्येक वर्षे, संपूर्ण जीवन व काही वेळा तर कित्येक पिढय़ा या मानसिक इजेच्या आगीत भस्मसात होऊन जातात. परंतु घटना घडत असताना आपण आपल्या आत काय घडते आहे त्याकडे लक्ष दिले तर? सर्वसाधारणपणे माणसाची वृत्ती त्याला होणाऱया सर्व प्रकारच्या त्रासासाठी अन्य व्यक्तीला किंवा परिस्थितीला जबाबदार धरण्याची असते व म्हणून त्याचे लक्ष नेहमी बाह्य गोष्टींकडेच जाते. परंतु कोणतीही घटना घडत असताना आपल्या आत काय घडते आहे त्याकडेदेखील लक्ष देता येणे शक्मय आहे का? आपल्या आत निर्माण होणाऱया प्रतिक्रियेकडे लक्ष देणे म्हणजे त्या प्रतिक्रियेसमवेत असणे, अवधानपूर्वक तिच्याकडे पाहणे. दु:ख निर्माण करणारी घटना घडत असताना जेव्हा आपण विचाराच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय दु:खाच्या संवेदनेकडे अवधानपूर्वक बघत असतो, त्यासंबंधी सजग असतो, तेव्हा ती संवेदना तिचा जीवनकाल संपवून लुप्त होते. तिची कोणतीही मानसशास्त्रीय नोंद आपल्या मेंदूत होत नाही. घटनेचा तपशील जरी स्मृतीच्या रूपाने आपल्या मेंदूत राहिला तरी त्या स्मृतीत कोणताही मानसशास्त्रीय घटक नसल्याने दु:खाचा अनुभव पुनरुज्जीवित होऊ शकत नाही. म्हणजेच घटना आठवली तरी आपल्याला त्या आठवणीचा त्रास होत नाही. याचा अर्थ आपल्या जीवनातील प्रत्येक घटना जर आपण अवधानपूर्वक अनुभवली तर तिच्यातील मानसशास्त्रीय घटक त्या घटनेबरोबरच संपून जातात व मग अशा घटनेची स्मृती आपल्याला पुन्हा त्रासदायक होत नाही.

आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या स्मृतीमध्ये साठलेल्या मानसशास्त्रीय आठवणी जसजशा वर येतात, तसतशा त्यादेखील वरीलप्रमाणे अवधानपूर्वक जगून संपवता येतात. तेव्हा आपल्यातील जुन्या मानसशास्त्रीय आठवणी संपुष्टात येतात व नव्या पण तयार होत नाहीत, तेव्हा आपल्या आत एक अवकाश तयार होऊ लागते. त्या अवकाशात मुक्तता व प्रेम असते.

Related posts: