|Monday, December 17, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ती आई होती तरीही

ती आई होती तरीही 

सकाळची वेळ होती. घराजवळ कुठल्या तरी पुढाऱयाच्या कृपेने भंडारा चालू होता आणि पहाटेपासून स्पीकर्सच्या भिंतींमधून कर्कश्श आवाजात भक्तिगीतांचा वर्षाव होत होता. म्हणून चौकातल्या बागेत जाऊन शांतपणे एक पुस्तक वाचत बसलो होतो.

अकरा वाजता बाग बंद होते. त्याआधी पंधरा मिनिटे सर्वांना बाहेर निघण्याची सूचना म्हणून सेविका शिट्टी वाजवते. लोक उठून गेले की बागेला कुलूप लावून घरी जाते. तो आवाज ऐकल्यावर बाहेर पडण्यासाठी पुस्तक मिटून मी उठलो.

त्याच वेळी हिरवळीवर एक छोटा मुलगा जोरजोरात रडत होता. आसपास कोणी पालक दिसत नव्हते. सेविकेने त्याला उचलून कडेवर घेतले आणि शांत करायचा प्रयत्न केला. त्याला नाव विचारू लागली. पण तो मुलगा नाव न सांगता नुसताच मम्मी मम्मी म्हणून रडत आणि ओरडत होता. त्याची मम्मी उर्फ आई गायब होती. कुठे गेली होती कुणास ठाऊक. 

सेविकेने मुलाला बरोबर घेऊन बागेच्या एका दाराला कुलूप लावले आणि दुसऱया दारापाशी येऊन खोळंबून उभी राहिली. बरोबर आम्ही चारपाच जण. मुलगा शांत झाला होता, पण दम खाऊन मधूनच भोकाड पसरत होता. आता लोकांनी सेविकेला विविध सल्ले द्यायला सुरुवात केली. मुख्य सल्ला म्हणजे मुलाला जवळच्या पोलीस चौकीत नेणे. पोलीस चौकी म्हणजे पुढच्या दोन तीन तासांची निश्चिंती. पण अन्य पर्याय दिसत नव्हता. मुलाला ती घरी घेऊन तर जाऊ शकत नव्हती.

या घोळात अकरा वाजून बराच वेळ झाल्यावर बागेशेजारच्या बोळातून भाजीच्या पिशव्या घेऊन बाळाची संत्रस्त सुविद्य आई आली आणि तिने घाईघाईने सेविकेच्या कडेवरून बाळाला खसकन ओढून घेतले. मग त्याच्यावर शिव्यांचा भडिमार केला, तुला बागेतल्या बेंचवर थांबायला सांगितलं होतं ना? ओळख नसलेल्या. अननोन-कोणाच्या बरोबर नेव्हर. कधी जायचं नाही. मघाशी कुठे गेला होतास? स्टुपिड. फूल. वगैरे…

बाळाला अशी अक्कल शिकवण्याच्या गडबडीत ती गरीब बिचारी माउली सेविकेचे आभार मानायला विसरलीच. असो.

बाळ मोठा होईल तेव्हा त्याला मराठी भाषा येत असेल तर ते कविता म्हणेल,

ती आई होती तरीही घनव्याकूळ मीही रडलो.

किंवा इंग्रजीत काय म्हणेल ते देवाला किंवा गॉडला ठावे.

 

Related posts: