|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » 63 नौकांसह 809 कर्मचारी आश्रयाला

63 नौकांसह 809 कर्मचारी आश्रयाला 

देवगड बंदरात प्रांताधिकाऱयांकडून पाहणी

महसूल, आपत्ती विभागाकडून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

गोवा, कर्नाटकमधूनही नौका दाखल

समुदात उसळताहेत मोठय़ा लाटा

 

वार्ताहर / देवगड:

केरळ व तामिळनाडूच्या किनाऱयावर आलेल्या ‘ओखी’ चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवरील देवगड किनाऱयावरही दिसून येऊ लागला आहे. समुद्रात मोठय़ा लाटा उसळत असून दिवसभर काही प्रमाणात वातावरण ढगाळ होते. रविवारपर्यंत तामिळनाडू व केरळमधील सुमारे 63 नौका सुरक्षित समजल्या जाणाऱया देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत. या नौकांवर एकूण 809 कर्मचारी आहेत. जिल्हा आपत्ती विभाग व देवगड तहसीलदार कार्यालयाच्यावतीने या कर्मचाऱयांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण प्रांताधिकारी नीता शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आले.

कोकण किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात विविध भागातून मच्छीमारी नौका आपत्तीकाळात आश्रयाला येत असतात. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू व केरळमधील हायस्पीड नौका सुरक्षिततेसाठी देवगड बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत. या नौकांवर सुमारे 800 हून अधिक कर्मचारी असून त्यांना जीवनावश्यक साहित्याची गरज होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व देवगड महसूल विभागाच्यावतीने त्यांना जीवनावश्यक साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी शिंदे, देवगड तहसीलदार वनिता पाटील व महसूल अधिकारी उपस्थित होते.

बंदर विभागात कंट्रोल रुम कार्यान्वित

ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर येथील बंदर विभाग कार्यालयात कंट्रोल रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीतर्फेही नौकांवरील कर्मचाऱयांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरच्या माध्यमातून करण्यात आली. स्थानिक मच्छीमारांकडूनही या नौकांना मदतीचा हात देण्यात आला. सायंकाळी उशीरापर्यंत गोवा, वेंगुर्ले व कर्नाटक मलपी येथील नौकाही आश्रयाला येत होत्या.

सिंधुदुर्ग किनारपट्टीला धोका कायम

ओखी वादळ अरबी समुद्रातून पुढे सरकत असल्याने ते कोकण किनारपट्टीवरही घोंघावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या वादळाचा धोका सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर कायम आहे. देवगड बंदरात धोक्याचा दोन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. खोल समुद्रात मच्छीमारांनी मासेमारीला जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत प्रशासन यंत्रणेकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.

समुद्रात मोठय़ा लाटा उसळल्या

देवगडच्या समुद्री भागात मोठय़ा लाटा उसळत आहेत. मिठमुंबरी-तारामुंबरी किनारी भागात मोठय़ा लाटा किनाऱयावर धडकत आहेत. दक्षिण भागातून सध्या 40 किमी वेगाने वारे वाहत आहेत. येत्या दोन दिवसात त्याची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 मालवण, देवबाग किनारपट्टीवर लाटांचे थैमान

मालवण : रविवारी सकाळपासून मालवण किनारपट्टीसह तारकर्ली, देवबाग या भागात समुद्राला जोरदार उधाण आले होते. मालवण किनारपट्टीवर सकाळच्या सत्रात जोरदार लाटा धडकत होत्या. या लाटांमुळे मालवण बंदरजेटीवर असणाऱया स्टॉलमध्ये समुद्राचे पाणी घुसले होते. त्यामुळे ओखी चक्रीवादळाचा जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील प्रभाव अजूनही कायम असल्याचे दिसून येत होते.

मालवण किनारपट्टीवर सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरण व जोरदार वाऱयामुळे पावसाळी वातावरण असल्याची स्थिती निर्माण झाली होती. देवबागच्या व मालवण किनारपट्टीवर सकाळपासून जोरदार लाटा येत होत्या.

होडी वाहतूक, स्कुबा, वॉटरस्पोर्ट बंद

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून बंदर विभागाने मच्छीमारांना, जलपर्यटन व्यावसायिकांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. बंदर विभागाने लावलेला दोन नंबरचा बावटा अजूनही कायम आहे. खराब हवामानामुळे किल्ला होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, वॉटरस्पोर्टही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळी हवामान असल्याने किल्ला होडी वाहतूक सेवा बंद असल्याची माहिती किल्ला होडी वाहतूक सेवेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली.

48 तासांत पावसाची शक्यता 

भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार 3 ते 6 डिसेंबर या कालावधीत अरबी समुद्रातील ओखी चक्रीवादळाबाबत कोकण किनारपट्टीजवळ असणाऱया सर्व जिल्हय़ांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 48 तासांत ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता राहील. संबंधितांनी आपल्या अखत्यारितील सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने दिल्या आहेत.

Related posts: