|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सईद निवडणुकी रिंगणात

सईद निवडणुकी रिंगणात 

2018 मध्ये पाकमधील सार्वत्रित निवडणूक लढणार

वृत्तसंस्था / लाहोर

 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद याने पाकिस्तानमध्ये 2018 मध्ये होणाऱया सार्वत्रिक निवडणूक लढविणार  असल्याची घोषणा केली. आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे त्याने पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या घोषित केले आहे. सईदने यापूर्वी मिल्ली मुस्लीम लीग नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली असून या पक्षाच्या माध्यमातून तो निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने अजूनही या पक्षाला मंजुरी दिली नसून दोनवेळा अर्ज फेटाळण्यात आला.

काश्मीरी लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आपण ही निवडणूक लढविणार अशीही दर्पोक्ती त्याने केली. भारताकडून दबाव येत असल्याने आपणाला पाकिस्तानमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र आता न्यायालयाने आपली सुटका केल्याने भारताची नाराजी झाली आहे असे त्याने म्हटले. हाफिज नजरकैदेत असतानाच ऑगस्टमध्ये राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली होती. गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्यासाठी त्याने संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहिले आहे. जमात उद दावाने यापूर्वी राजकीय रिंगणात आपले भविष्य आजमाविण्याचा प्रयत्न केला होता. सप्टेंबर महिन्यात लाहोर पोटनिवडणुकीत या संघटनेने समर्थन केलेला उमेदवार शेख याकूब याला पराभव पत्करावा लागला होता. याकूब याला अमेरिकने 2012 मध्ये दहशतवादी संघटनेचा नेता असल्याने बंदी घातली आहे. याकूब याच्या विरोधी आणि पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसुम नवाज यांचा या निवडणुकीत विजय झाला होता.

पाकिस्तानमधील मागील सार्वत्रिक निवडणुकीत हाफिज याने नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग (एन)ला पाठिंबा दिला होता. पाकिस्तानला खरे मुस्लीम राष्ट्र बनविण्याचे स्वप्न हाफिजची संघटना पाहत आहे. हाफिजच्या पक्षाला अमेरिकेच्या दबावामुळे मान्यता मिळाली नाही, तर हाफिज आणि त्याचे सहकारी बनावट उमेदवार अथवा पक्षाच्या सहाय्याने निवडणूक लढवितील असे पाकमधील तज्ञांचे मत आहे.

Related posts: