|Monday, September 24, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकच्या ग्वादर बंदराला आव्हान

पाकच्या ग्वादर बंदराला आव्हान 

चाबहार बंदराचे रुहानींकडून उद्घाटन : अफगाणिस्तानशी थेट संपर्काचा भारताचा मार्ग मोकळा

तेहरान / वृत्तसंस्था

भारताच्या साहाय्याने बांधलेल्या चाबहार बंदराच्या एका भागाचे उद्घाटन इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी केले आहे. या बंदरामुळे भारत पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तानशी थेट संपर्क करू शकणार आहे. तसेच या बंदरामुळे पाक चीनच्या साहाय्याने बांधत असलेल्या ग्वादर बंदरालाही मोठे आव्हान निर्माण होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला भारत, अफगाणिस्तान, कतार, पाकिस्तान व इतर देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चाबहार हे सामरिक आणि वाहतूक अशा दोन्ही उद्देशांसाठी विकसित करण्यात आले आहे. ओमानच्या खाडीत असलेले हे बंदर अरबी समुद्रासाठीचे इराणचे मुख्य प्रवेशद्वारही आहे. त्याचे बांधकाम इराणच्या सरकारी खताम-अल्-अनबिया या कंपनीने केले आहे. गेल्या वर्षी भारताने या बंदरात 50 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. तसेच आतापर्यंत या बांधकामासाठी भारताने आर्थिक, तांत्रिक आणि मनुष्यबळाचे साहाय्य दिले आहे. भारत सरकारच्या कंपनीलाही याच्या विकासाचे कंत्राट देण्यात आले आहे.

भारताचा मोठा लाभ

अफगाणिस्तान हा भारताचा मित्रदेश आहे. मात्र या देशाशी संपर्क करायचा असल्यास भारताला तो पाकिस्तानमार्गे करावा लागतो. यात धोका असून पाकवर अवलंबून राहणे भारताला शक्य नसते. त्यामुळे अफगाणिस्तानशी थेट संपर्क करण्यासाठी भारताला पर्यायी मार्गाची आवश्यकता होती. ती आवश्यकता या बंदरामुळे पूर्ण होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी याच बंदरातून भारताने 1.3 लाख टन गहू अफगाणिस्तानला पाठविला होता.

पाकिस्तानची कोंडी शक्य

चीनने पाकिस्तानसाठी याच परिसरात ग्वादर बंदराचा विकास करण्याची योजना चालविली आहे. अद्याप हे बंदर पूर्ण व्हायचे आहे. तथापि, चाबहार बंदरामुळे पाकच्या या बंदराचे महत्व कमी होणार आहे. चाबहार हे सामरिक बंदरही असल्याने पाकसमोर नवे आव्हान उभे राहिले असून युद्ध काळात या बंदराचा उपयोग सामरिक कारणासाठी होऊ शकतो. बंदर परिसरात विमानतळ आणि नौदलतळही स्थापन करण्यात आला आहे.

तथापि, रुहानी यांनी आपल्या भाषणात पाकशी स्पर्धेच्या मुद्दय़ाला बगल दिली. हे बंदर या भागातील देशांमध्ये एकात्मता निर्माण करण्यास साहाय्यभूत ठरेल, असा दावा त्यांनी केला. तसेच या भागातील इतर बंदरांशी हे बंदर सकारात्मक स्पर्धा करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

रेल्वेशी जोडणार

हे बंदर इराण आणि इतर देशांच्या रेल्वेजाळय़ाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे समुद्रतट नसलेल्या अफगाणिस्तानसारख्या देशांना मध्य आशियातील इतर देशांशी, तसेच भारतासारख्या देशांशी जोडण्याचे माध्यम म्हणून या चाबहारचा उपयोग होणार आहे. उत्तर युरोप आणि रशियाशीही जोडण्यास ते साहाय्यभूत आहे.

 

Related posts: