|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » क्रिडा » पुणे मॅरेथॉनवर इथिओपियाची वर्चस्व

पुणे मॅरेथॉनवर इथिओपियाची वर्चस्व 

पुणे / प्रतिनिधी

32 व्या पुणे मॅरेथॉन स्पर्धेच्या पुरूष आणि महिलांच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी रविवारी वर्चस्व गाजवले. पुरुषांच्या 42 किलोमीटरच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या गेताचू बेशा याने 2 तास 15. मिनिटे 15 सेकंद वेळेसह स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. झेलालेम लेमा डिलेमा (2.15.91), देवेजे कसाव (2.17.20) हे इथिओपियाचेच खेळाडू अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले. या गटातील पहिले सहा खेळाडू आणि पहिल्या दहापैकी आठ खेळाडू इथिओपियाचे आहेत.

सकाळी 5.30 वाजता माजी ऑलिंपियनपटू बाळकृष्ण आकोटकर यांच्याहस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झाली. 21 किलोमिटर पर्यंत गेताचू बेशा, झेलालेम लेमा डिलेमा, देवेजे कसाव हे तिघे एकत्रच धावत होते. यानंतर शेवटच्या टप्प्यात गेताचू बेशा याने आघाडी मिळवून ती शेवटपर्यंत टिकवली. महिलांच्या गटात देखील इथिओपियाची तिसासूआ बॅसाझीन विजेती ठरली. तिने 1 तास 23.40 मिनिटे अशी वेळेत स्पर्धा पूर्ण केली. इथिओपियाचीच आगेर बेलेव (1.25.40) दुसरी तर, केनियाची दसकॅलिया जेपकोगेल (1.30.15) तिसरी आली.

भारतीय पुरूष गटात करणसिंग तर महिलांमध्ये संपदा बुचडे यांची बाजी

भारतीय पुरुषांच्या 42 किलोमीटर शर्यतीत पुण्याच्या करणसिंग तर महिला गटात अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत संपदा बुचडे या खेळाडूंनी बाजी मारली. करणसिंग याने 2 तास 28.01 मिनिटांच्या वेळेसह पहिले स्थान पटकावले. किशोर गव्हाणे आणि दादासाहेब खिलारे हे पुणेकर खेळाडू अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले. महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये पुण्याची संपदा बुचडे अव्वल ठरली. विनया मालुसरे आणि निकिता गोयल या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान प्राप्त केले.

सर्व तांत्रिक बाबी तपासल्यानंतरच पालिका बक्षिसाची रक्कम देईल

स्पर्धेचा बक्षिस समारंभ पुण्याचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सणस मैदानावर पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलताना महापौर म्हणाल्या, महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा निधी आणि इतर बाबी या महापालिकेच्या धोरणानुसार दिल्या जातील. पण भारतीय ऍथलेटीक्स महासंघ आणि महाराष्ट्र संघटना यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्व तांत्रिक बाबी तपासून मगच महानगरपालिका आपला 35 लाखांचा निधी देईल. तोपर्यंत पालिका निधी देणार नाही. त्यामुळे यंदा खेळाडूंचा फक्त ट्रॉफी देऊन महापौरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

60 दिवसांत बक्षिसाच्या रक्कम चेकद्वारे देणार 

या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पालिकेने पैसे देवो अगर न देवो, आम्ही स्पर्धाकांना बक्षिसाची रक्कम देणार आहोत. गेल्यावर्षी नोटाबंदीमुळे बक्षिसाची रक्कम 90 दिवसांत दिली होती. यावेळी आम्ही 60 दिवसांत देणार आहोत. तसेच खेळाडूंना चेकद्वारे बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. असे पुणे मॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी शनिवारी पत्रकारांना बोलताना ही माहिती दिली आहे.

पुढील वर्षी पुणे मॅरेथॉन स्पर्धेचे भवितव्य टांगणीवर  

भारतीय ऍथलेटीक्स महासंघ आणि महाराष्ट्र संघटना यांच्यात उफाळून आलेल्या वादामुळे यंदा स्पर्धेचा रंग उडला होता. नियोजनाचे तीन तेरा वाजले होते. मुख्य स्पर्धा सुरू झाल्यावर स्पर्धाकांच्या पुढे टाईम व्हॅन असते परंतु यंदा या वादामुळे टाईम व्हॉन कुठेच दिसली नाही. तसेच स्पर्धा सकाळी 5.30 ला सुरू झाल्याने रस्त्यावर देखील खूप आंधार होता. त्यामुळे या आंधारातून मार्ग काढत जाणे खेळाडूंना जिकीरीचे गेले. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींनी पुणे मॅरेथॉनला एक वलय प्रप्त करून दिले होते. यामुळे पुण्याची मॅरेथॉन जगात पोहोचली, एकेकाळी शिखरावर असणारी या मॅरेथॉन स्पर्धेचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. त्यात आता भारतीय ऍथलेटीक्स महासंघ आणि महाराष्ट्र संघटना यांच्यात  वाद सुरू झाल्याने पुढील वर्षीपासून स्पर्धा होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.  

Related posts: