|Saturday, October 20, 2018
You are here: Home » क्रिडा » शॉन मार्शचे शतक, ऑस्ट्रेलिया 442/8 घोषित

शॉन मार्शचे शतक, ऑस्ट्रेलिया 442/8 घोषित 

वृत्तसंस्था/ ऍडलेड

शॉन मार्शचे नाबाद शतक (126) व तळाचा फलंदाज टीम पेन (57), पॅट कमिन्स (44) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ऍशेस मालिकेतील दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 149 षटकांत 8 बाद 442 धावांवर घोषित केला. इंग्लंडच्या पहिल्या डावाची खराब सुरुवात झाली असून दुसऱया दिवसअखेरीस 9.1 षटकांत 1 बाद 29 धावा केल्या होत्या. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऍलेस्टर कूक 11 धावांवर खेळत होता. सातत्याने पावसाचा व्यत्यय आल्याने सामना काही खेळ थांबवण्यात आला होता.

तत्पूर्वी, यजमान ऑस्ट्रेलियाने 4 बाद 209 धावसंख्येवरुन दुसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. डावातील तिसऱयाच चेंडूवर पीटर हॅण्ड्सकोम्बला ब्रॉडने पायचीत करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. हॅण्ड्सकोम्बने 36 धावा फटकावल्या. यानंतर, शॉन मार्श व टीम पेन जोडीने सहाव्या गडय़ासाठी 85 धावांची भागीदारी साकारत संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. पेनने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 57 धावांचे योगदान दिले. पेन बाद झाल्यानंतर मार्शने कमिन्ससोबत आठव्या गडय़ासाठी 99 धावांची भागीदारी साकारताना संघाला चारशेपर्यंत मजल मारुन दिली. दरम्यान, मार्शने पाचवे कसोटी शतक साजरे करताना 231 चेंडूत 15 चौकार व 1 षटकारासह नाबाद 126 धावांचे योगदान दिले. कमिन्सनेही 7 चौकारासह 44 धावांची खेळी साकारत त्याला चांगली साथ दिली. मार्शचे शतक झाल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने संघाचा पहिला डाव 149 षटकांत 8 बाद 442 धावांवर घोषित केला. इंग्लंडतर्फे ओव्हर्टनने 3, ब्रॉडने 2 तर अँडरसन व वोक्सने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. सलामीवीर मार्क स्टोनमनला 18 धावांवर स्टार्कने पायचीत करत पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. यानंतर, पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबवण्यात आला. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 9.1 षटकांत 1 गडी गमावत 29 धावा केल्या होत्या. दिवसअखेरीस ऍलेस्टर कूक 11 धावांवर खेळत होता. इंग्लिश संघ अद्याप 413 धावांनी पिछाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव 149 षटकांत 8 बाद 442 घोषित (वॉर्नर 47, ख्वाजा 53, शॉन मार्श नाबाद 126, टीम पेन 57, कमिन्स 44, ओव्हर्टन 3/105, स्टुअर्ट ब्रॉड 2/72).

इंग्लंड प.डाव 9.1 षटकांत 1 बाद 29 (ऍलेस्टर कूक खेळत आहे 11, स्टोनमन 18, जेम्स विन्स 0, स्टोनमन 1/13).

Related posts: