|Thursday, December 13, 2018
You are here: Home » क्रिडा » यु-19 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉकडे

यु-19 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉकडे 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील वर्षी होणाऱया यु-19 विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा मुंबईकर पृथ्वी शॉ कडे सोपवली आहे. रविवारी बीसीसीआयने 16 सदस्यीय युवा भारतीय संघ जाहीर केला. 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2018 दरम्यान ही विश्वचषक स्पर्धा न्यूझीलंडमध्ये पार पडणार आहे.

विद्यमान उपजेता असलेल्या युवा भारतीय संघाने याआधी 2000, 2008 व 2012 मध्ये यु-19 विश्वचषक जिंकलेला आहे. गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला विंडीजकडून पराभव पत्कारावा लागल्यामुळे उपजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा न्यूझीलंडमध्ये होणाऱया या स्पर्धेसाठी पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली तगडा संघ निवडला असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली. प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ जेतेपदाचा चौकार लगावेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यंदाच्या रणजी हंगामात पृथ्वी शॉने शतकी धडाका लगावताना चमकदार कामगिरी साकारली आहे. या कामगिरीच्या जोरावरच पृथ्वीची युवा संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली असल्याचे चौधरी यांनी सांगितले. पंजाबचा युवा फलंदाज शुभम गिलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. स्पर्धेआधी भारतीय संघाचे सराव शिबिर 8 ते 22 डिसेंबर दरम्यान बेंगळूर येथील राष्ट्रीय अकादमीत होणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. यानंतर, भारतीय संघ 3 जानेवारी रोजी न्यूझीलंडला रवाना होणार आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी युवा भारतीय संघ – पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभम गिल (उपकर्णधार), मनजोत कार्ला, हिमांशु राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, आर्यन जोयल (यष्टीरक्षक), हार्विक देसाई, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशान पोरेल, अर्शदीप सिंग, अंकुल रॉय, शिवा सिंग, पंकज यादव.

राखीव खेळाडू – ओम भोसले, राहुल चाहर, निनाद राठवा, उर्वल पटेल व आदित्य ठाकरे.

Related posts: