|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » कर्णधार कोहलीचे सहावे द्विशतक

कर्णधार कोहलीचे सहावे द्विशतक 

रोहितचे अर्धशतक, 7 बाद 536 धावांवर भारताचा डाव घोषित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कर्णधार विराट कोहलीने झळकवलेले सलग दुसरे व एकूण सहावे द्विशतक आणि रोहित शर्माचे अर्धशतक यांच्या आधारे भारताने तिसऱया व शेवटच्या कसोटीच्या दुसऱया दिवशी 7 बाद 536 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर लंकेने दिवसअखेर पहिल्या डावात 3 बाद 131 धावा जमविल्या. अँजेलो मॅथ्यूजने अर्धशतक झळकवले. मॅथ्यूज 57 व कर्णधार चंडिमल 25 धावांवर खेळत असून ते अद्याप 405 धावांनी पिछाडीवर आहेत. धुके व धूळ यामुळे दुसऱया दिवशी सामन्यात काही काळ व्यत्यय आला होता.

कर्णधार कोहलीने सलग दुसरे व कारकिर्दीतील एकूण सहावे द्विशतक झळकवताना वैयक्तिक सर्वोच्च कामगिरीही नोंदवली. त्याने 287 चेंडूत 25 चौकारांच्या मदतीने 243 धावांचे योगदान दिले. रोहित शर्मानेही अर्धशतकी खेळी करताना 102 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 65 धावा जमविल्या. धूळ व धुक्मयामुळे कोहलीने 7 बाद 536 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर चहापानापर्यंत लंकेचे 18 धावांत 2 गडी बाद करीत भारताने सामन्यावर पकड मिळविली. पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर दुसरी कसोटी डावाच्या फरकाने जिंकून भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे.

लंका संघ येथील वातारणात संघर्ष करीत असून धूळ व धुक्मयाच्या थरामुळे उपाहारानंतर त्यांच्या अनेक खेळाडूंनी फेसमास्क घालून मैदानात प्रवेश केला होता.  या स्मॉगमुळे दोनदा सामना थांबविण्यात आला आणि यात 22 मिनिटे वाया गेली. त्यांचे वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल व लाहिरु गमगे यांना स्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना मैदान सोडावे लागले. पंच नायजेल लाँग व जोएल विल्सन पाहुण्या संघाशी हवामानाबाबत चर्चा करीत असताना चिडलेल्या कर्णधार कोहलीने संघाला आत बोलावून घेत डाव घोषित केल्याचे सूचित केले.

कोहलीचे सहावे द्विशतक

त्याआधी स्टेडियमवर उपस्थित सुमारे 20000 शौकिनांना कोहली व रोहित यांनी आकर्षक फटकेबाजी करून खुश केले. 4 बाद 371 या धावसंख्येवरून दोघांनी सुरुवात दुसऱया दिवसाच्या खेळास पुढे सुरुवात केली होती. दोघांनी पाचव्या गडय़ासाठी 135 धावांची भागीदारी केली. रोहितने डावखुरा स्पिनर संदकनला लाँगॉफच्या दिशेने षटकारही खेचला. पण सर्वांचे लक्ष होते ते कोहलीच्या द्विशतकाकडे. 195 वर असताना त्याच्याविरुद्ध पायचीतचे अपील झाले. पंचांनी त्याला नाबाद ठरविले व नंतर रिव्हय़ूमध्येही तो नाबाद असल्याचे स्पष्ट झाले. कोहलीने लकमलला दोन धावांसाठी पिटाळून या मालिकेतील सलग दुसरे द्विशतक पूर्ण केले. नंतर रोहितनेही परेराला सरळ षटकार ठोकत सलग पाचवे अर्धशतक पूर्ण केले. मात्र 65 धावांवर तो संदकनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाला.

लंकेने वातावरणाचे कारण पुढे करीत रडीचा डाव केला. त्यावरून चिडलेल्या कोहलीने डावाची घोषणा केली. पण नंतर मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर दिमुथ करुणारत्नेला शून्यावर बाद केले आणि नंतर इशांत शर्माने धनंजय डीसिल्वाला एका धावेवर पायचीत करून लंकेची स्थिती 2 बाद 14 अशी केली. दिलरुवान परेराही 16 धावांवर बाद झाला असता. पण स्लिपमध्ये त्याला जीवदान मिळाले. त्याने 42 धावांचे योगदान दिल्यावर जडेजाने पायचीत करून त्याची खेळी संपुष्टात आणली. मॅथ्यूज व कर्णधार चंडिमल यांनी ही पडझड रोखत दिवसअखेर संघाला 3 बाद 131 धावांची मजल मारून दिली. दिवसअखेर मॅथ्यूज 57 व चंडिमल 25 धावांवर खेळत होते. मॅथ्यूजने 118 चेंडूत 8 चौकार, 2 तर चंडिमलने 81 चेंडूत 3 चौकार मारले आहेत.

धावफलक

भारत प.डाव : मुरली विजय यष्टिचीत डिकवेला गो. संदकन 155, धवन झे. लकमल गो परेरा 23, पुजारा झे. समरविक्रमा गो. गमगे 23, कोहली पायचीत गो. संदकन 243 (287 चेंडूत 25 चौकार), रहाणे यष्टिचीत डिकवेला गो. संदकन 1, रोहित शर्मा झे. डिकवेला गो. संदकन 65 (102 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), अश्विन झे. परेरा गो. गमगे 4, साहा नाबाद 9, जडेजा नाबाद 5, अवांतर 8, एकूण 127.5 षटकांत 7 बाद 536.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-42, 2-78, 3-361, 4-365, 5-500, 6-519, 7-523.

गोलंदाजी : लकमल 21.2-2-80-0, गमगे 25.3-7-95-2, डी. परेरा 31.1-0-145-1, संदकन 33.5-1-167-4, धनंजय सिल्वा 16-0-48-0.

लंका प.डाव : करुणारत्ने झे. साहा गो. शमी 0 (1 चेंडू), डी. परेरा पायचीत गो. जडेजा 42 (54 चेंडूत 9 चौकार), धनंजय सिल्वा पायचीत गो. इशांत 1 (14 चेंडू), मॅथ्यूज खेळत आहे 57 (118 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), चंडिमल खेळत आहे 25 (81 चेंडूत 3 चौकार), अवांतर 6, एकूण 44.3 षकांत 3 बाद 131.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-0, 2-14, 3-75.

गोलंदाजी : शमी 11-3-30-1, इशांत 10-4-44-1, जडेजा 14.3-6-24-1, अश्विन 9-3-28-0.

लंकन खेळाडूंच्या वर्तनावर नाराज प्रेक्षकांकडून हुर्यो!

या सामन्यात धुरकट हवामानाचा दोनदा व्यत्यय आला. हवा खराब असल्याचा बहाणा करून लंकेने दोनदा सामना थांबविला. उपाहारानंतर लंकन खेळाडूंनी फेसमास्कसह मैदानात प्रवेश केला. 140 वर्षाच्या क्रिकेटच्या इतिहासात प्रदूषणरोधी मास्क घालून मैदानात उतरण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला. लंकन खेळाडू पंचांशी या संदर्भात चर्चा करीत असताना सुमारे 22 मिनिटांचा खेळ वाया गेल्यावर काहीसा नाखुश झालेल्या कोहलीने डाव घोषित केल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर लंकन खेळाडू तंबूकडे परतत असताना प्रेक्षकांनी त्यांची ‘लूजर्स, लूजर्स’ अशा शब्दांत टर उडवित नापसंती व्यक्त केली. विशेष म्हणजे भारतीय संघ मैदानात आला तेव्हा एकाही खेळाडूने मास्क घातला नव्हता. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही दिल्लीतील हवेचा दर्जा एकदम खालावलेला असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘20000 प्रेक्षकांना तसेच भारतीय खेळाडूंची हवेबाबत कोणतीही तक्रार नसताना लंकन खेळाडूंनी त्याचा एवढा बाऊ का केला, याचे आश्चर्य वाटते. यासंदर्भात सचिवाशी बोलून लंकन मंडळाकडे लेखी तक्रार करायला हवी,’ असे बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना म्हणाले.

 

 

Related posts: