|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नवउदारमतवाद-फॅसिझम विरोधातील चळवळी गतीमान-दत्ता देसाई

नवउदारमतवाद-फॅसिझम विरोधातील चळवळी गतीमान-दत्ता देसाई 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

नवउदारमतवाद आणि नवफॅसिझमला रोखण्यासाठी गेल्या काही वर्षात देशातील चळवळी गतीमान झाल्या आहेत. या चळवळींचे एकत्रिकीकरण व मजबूतीकरण झाले पाहिजे. चळवळींचे मजबूतीकरण होईल त्यावेळी या शक्तींचा नि:पात होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांनी केले. अविनाश पानसरे व्याख्यानमालेत नवउदारमतवाद व नवफॅसिझम या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना दत्ता देसाई बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. उदय नारकर होते.

श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने शाहू स्मारक येथे अविनाश पानसरे व्याख्यानमाला सुरु आहे. रविवारी ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांनी  नवउदारमतवाद व नवफॅसिझम या विषयावर मांडणी केली. यावेळी त्यांनी जगातील नवउदारमतवाद व नवफॅसिझमचा आढावा घेतला.जागतिक पातळीवर नवउदारमतवाद आणि नवफॅसिझममुळे एकाधिकारशाही निर्माण होऊन सत्ता गठित झाली आहे. कंपन्यांची मक्तेदारी वाढली आहे.  भारतात असंघटितांना संघटित करण्यासाठी नोटाबंदी आणि समान पातळीवर करासाठी जीएसटी असे हेतू दाखवण्यात आले. मात्र शासकीय संस्थेने दडपशाहीच्या जोरावर नोटाबंदी व जीएसटी जनतेवर लादली असून यामुळे सामान्य  माणूस कोलमडला आहे असे देसाई म्हणाले. नवउदारमतवाद्यांकडून मध्ययुगीन काळातील सरंजमशाहीचे वातावरण तयार केले जात आहे हे त्यांनी काही उदाहणातून स्पष्ट केले. या नवउदारमतवाद व नवफॅसिझमचा धोका लक्षात घेणे आवश्यक आहे पण त्याची सत्यता तपासली पाहिजे.

या शक्तीकडून राज्यघटनेतील सामाजिक न्यायाचे तत्व बाजूला सारुन नवउदारमतवादात बाजारीकरणाचे स्वरुप देण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्याची गरज असून यासाठी राज्यघटना हेच महत्वाचे माध्यम आहे. नवउदारमतवाद व नवफॅसिझमला रोखण्यासाठी गेल्या काही वर्षात देशातील चळवळी गतीमान झाल्या आहेत. विविध आंदोलनाच्या माध्यमातून ते दिसून येत आहे. या चळवळींचे एकत्रिकीकरण आणि मजबूतीकरण आवश्यक असून ते झाल्यास या शक्तींचा नि:पात होईल असे देसाई यांनी सांगितले.प्रा. उदय नारकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. स्वागत प्रास्ताविक नवनाथ मोरे यांनी केले. आभार पूनम कोकणी यांनी मानले.

Related posts: