|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हाळोली, माद्याळ परीसरात हत्तीचा धुमाकूळ

हाळोली, माद्याळ परीसरात हत्तीचा धुमाकूळ 

प्रतिनिधी/ आजरा

दररोजच्या नुकसानी हत्तीने तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱयांना हैराण करून सोडले आहे. शनिवारी रात्री हत्तीने हाळोली गावच्या हद्दीतील चाळोबा देवालयालगतच्या शेतात धुमाकूळ घातला आहे. उभ्या ऊस पिकाचे नुकसान करण्याबरोबरच हत्तीने शेतातील पाण्याच्या सिंटेक्स टाक्या फोडून टाकल्या आहेत.

तालुक्यात तळ ठोकून असलेल्या दोन पैकी एका हत्तीने गेल्या महिन्याभराच्या काळात भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यापर्यंत मजल मारली होती. आठ दिवसापूर्वी हा हत्ती पुन्हा तालुक्यात परतला. तर चार दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यात दाखल झालेल्या हत्तीच्या कळपात हा हत्ती दाखल झाला आहे. मात्र एक हत्ती तालुक्यातून तळ हलविण्यास तयार नाही. गेल्या वर्षभरापासून पश्चिम भागातील चाळोबा जंगलात असलेल्या या हत्तीने गेला महिनाभर पेरणोली, वझरे परीसरात धुमाकूळ घातला होता. आठ दिवसांपूर्वी हा हत्ती पुन्हा पश्चिम भागात परतला आहे.

दोन दिवसांपूर्वी मसोली येथील एम. आर. कांबळे यांच्या शेतातील भाताचे नुकसान हत्तीने केले आहे. तर आजरा शहरालगतच्या कर्पेवाडी बागेत धुमाकूळ घातलेला हत्ती गेल्या दोन दिवसांपासून हाळोली परीसरात वावरत आहे. शुक्रवारी तसेच शनिवारी रात्री हत्तीने हाळोली परीसरात ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. आजरा-आंबोली मार्गालगत असलेल्या चाळोबा देवालयानजीकच्या हाळोलीपैकी पोवारवाडी जवळील शेतात हत्तीने उभा ऊस उध्वस्त केला आहे. येथील भिकाजी गुरव, यशोदा गुरव, बंडू पोवार, सुनील पोवार, पांडूरंग गुरव, केरबा कांबळे, रामदास गुरव, विश्राम धुरी, बाळासो धुरी, बाळू तावडे यांच्या ऊसाचे मोठे नुकसान केले आहे.

उभ्या ऊसात हत्ती घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी नुकसान केलेल्या हत्तीने आजरा-आंबोली रस्ता ओलांडून पलिकडील शेतात प्रवेश केला. देवर्डे येथील मुकुंद तानवडे यांच्या ऊसाचे नुकसान करण्याबरोबरच शेतातील पाण्याच्या सिंटेक्स टाक्या फोडून टाकल्या आहेत. येथून पुढे माद्याळ गावच्या हद्दीत गेलेल्या हत्तीने बोलके यांच्या ऊसाचेही नुकसान केले आहे. हत्तीकडून दररोज नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. तर वनविभागाकडून हत्ती हटविण्याबाबत ठोस उपाययोजना राबविली जात नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

 

Related posts: