|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अनिकेतच्या अस्थी पंचवीस दिवस पोलिसांच्या ताब्यात

अनिकेतच्या अस्थी पंचवीस दिवस पोलिसांच्या ताब्यात 

कुटुंबीयांनी पूर्ण बॉडी मागितली

प्रतिनिधी/ सांगली

 तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि पोलिसांच्या टोळक्याने पोलीस कोठडीत खून केलेल्या अनिकेत कोथळे याच्या अस्थींचे गेल्या पंचवीस दिवसांपासून अद्यापही विसर्जन करण्यात आलेले नाही. अनिकेतच्या अस्थी अद्यापही पोलिसांच्या ताब्यातच आहेत. तपासाच्या दृष्टीने महत्वाची असल्याने अनिकेतची बॉडी ऍनाटॉमी विभागाच्या ताब्यात आहे. तर आपल्याला अस्थी नकोत अनिकेतची पूर्ण बॉडीच हवी हा कुटुंबीयांचा आग्रह असल्याने अद्यापही त्याच्या अस्थींचे विसर्जन होऊ शकले नाही.

अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना पोलिसांनी सहा नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याला मारहाण करून रात्री त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला आणि दोघांनी पलायन केल्याचा बनाव केला. पण, दुसऱयाच दिवशी म्हणजे सात नोव्हेंबर रोजी पोलिसांचा बनाव उघडकीस आला. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलीस आणि एक झिरो पोलीस अशा सहा जणांना अनिकेतच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आली. पुढे त्यांना बडतर्फही करण्यात आले. त्यानंतर मिरजेचे डीवायएसपी धिरज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अनिकेतची बॉडी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आंबोलीतून आणली. त्याचे मिरजेत न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर डीएनए तपासणीसाठी बॉडी प्रशासनाने आपल्या ताब्यातच ठेवली.

सुरूवातीला अनिकेतच्या कुटुंबीयांनी त्याच्या अस्थी तरी आपल्या ताब्यात मिळाव्यात अशी मागणी केली. पण, अनिकेतची आहे तशी बॉडी अंत्यसंस्कारासाठी मिळण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे अनिकेतच्या अस्थी अद्यापही अप्पर पोलीस अधीक्षकांच्या केबिनमध्ये कपाटात ठेवण्यात आल्या आहेत. या अस्थीबाबत पंचवीस दिवसांनंतरही अद्याप निर्णय झाला नसल्याने त्या तशाच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात काम करणाऱया कर्मचाऱयांच्या मनातही चलबिचल आणि दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. कुटुंबीय बॉडीसाठी आग्रही असल्याने अजून तरी त्याच्या अस्थिबाबत निर्णय झालेला नाही.

 अनिकेत कुटुंबीयांना कळवले : बोराटे

 दरम्यान, अनिकेतची बॉडी अद्याप कुटुंबीयांच्या ताब्यात देता येणार नसल्याने त्यांच्या सुरवातीच्या मागणीनुसार अस्थी आणून ठेवण्यात आल्या आहेत. अस्थी घेऊन जाण्यासंदर्भात त्याच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात आले आहे. पण, अद्याप त्यांच्याकडून कोणताही निरोप नसल्याने अस्थी आपल्या कार्यालयातच ठेवण्यात आल्या असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिली.

अस्थि नको पूर्ण बॉडीच हवी : कोथळे

अनिकेतचा पोलिसांनी खून केल्यानंतर त्याचा मृतदेहही आपल्या ताब्यात मिळाला नाही. त्यामुळे त्याची आहे. त्या अवस्थेतील बॉडी आमच्या ताब्यात मिळण्याची मागणी आम्ही केली असल्याची माहिती मृत अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे यांनी दिली. डीएनए तपासणीनंतर प्रशासनाने आपल्याला बॉडीच द्यावी, तोपर्यंत आम्ही अस्थी ताब्यात घेणारा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनिकेतच्या अस्थी पंचवीस दिवसांपासून विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Related posts: