|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिलालेखामुळे हतरसंगकुडला राष्ट्रीय स्तरावर ओळख सहकारमंत्री देशमुख

शिलालेखामुळे हतरसंगकुडला राष्ट्रीय स्तरावर ओळख सहकारमंत्री देशमुख 

वार्ताहर/ मंद्रुप

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हतरसंगकुडल येथील श्री. संगमेश्वर मंदिरात असलेल्या मराठी भाषेतील शिलालेखामुळे हत्तरसंग कुडल गावाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले.

सोलापूर जिह्यातील हत्तरसंग कुडल येथील प्राचीन शिलालेख आणि मंदिर समूहाबाबत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या सत्रात श्री. देशमुख बोलत होते. हत्तरसंग कुडल येथे आज झालेल्या या चर्चासत्राचे आयोजन राज्य शासनाच्या पुरातत्वशास्त्र विभाग, सोलापूर विद्यापीठ आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. ए.एन.मालदार, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ.गो.ब.देगलूरकर, परातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, प्रा.डॉ. अभिजीत दांडेकर, सहाय्यक संचालक विलास वहाणे, डॉ.माया पाटील, संगमेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष षडाक्षरी बिराजदार, सरपंच मधुकर बिराजदार आदी उपस्थित होते.

  सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, ‘सोलापूर जिह्यात अनेक ठिकाणी भारतीय संस्कृतीच्या खुणा असलेली मंदिरे आहेत. ही मंदिरे शिल्प यांचे संवर्धन करण्याचा आणि लोकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाबाबत आज होणारे चर्चासत्र याबाबतीत अतिशय महत्वाचे आहे.’

सोलापूर जिह्यात धार्मिक स्थळे आहेत. जिह्याला संत आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. जिह्यातील सर्व धार्मिक स्थळे एका सर्किटमध्ये जोडली तर धार्मिक पर्यटनाचा विकास होईल आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, मात्र त्यासाठी आपण दृष्टीकोनात बदल करण्याबरोबरच नव नवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत, असे श्री. देशमुख म्हणाले.

डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘भारतीय संस्कृती प्राचीन आहे. मंदिर आणि मूर्ती आपल्या संस्कृतीमध्ये मुख्य वैशिष्टय़ आहे. संस्कृती संरक्षीत ठेवण्यासाठी मंदिर आणि मूर्तीकलांचा अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. यासाठी पुरातत्वशास्त्र अतिशय महत्वाचे आहे.’’

यावेळी डॉ. मालदार यांचेही भाषण झाले. डॉ. माया पाटील आणि डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. ज्ञानेश्वरी हजारे यांनी आभार मानले. यावेळी संगमेश्वर महाविद्यालयतील पर्यटशास्त्र विभागाचे प्रा. मेघा शिलै यांच्यासह जिह्यातील विविध महाविद्यालयातील इतिहासाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. तत्पुर्वी, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चर्चासत्रासाठी आलेल्या संशोधकासमवेत मंदिर समूह आणि शिलालेखाची पाहणी केली.

Related posts: