|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हट्ट्रिकसाठी चंद्रहार उतरणार महाराष्ट्र केसरीच्या आखाडय़ात

हट्ट्रिकसाठी चंद्रहार उतरणार महाराष्ट्र केसरीच्या आखाडय़ात 

फिरोज मुलाणी/ औंध

डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवलेला भाळवणीचा लढवय्या पैलवान चंद्रहार पाटील ट्रिपल महाराष्ट्र केसरीच्या पंक्तीत विराजमान होण्यासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची कसून तयारी करतोय. आजार पाठ सोडत नसला तरी महाराष्ट्र केसरीचा तिहेरी मुकुट परिधान करायची महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नाही.

  2007 साली औरंगाबाद आणि 2008 साली कडेगांवमध्ये चंद्रहारने महाराष्ट्र केसरी किताब जिंकून दुहेरी मुकुट परिधान केला. 2009 साली हट्ट्रिक करण्यासाठी तो तयारीनिशी आखाडय़ात उतरला मात्र पुण्याच्या अधिवेशनात त्याची संधी हुकली. यानंतर मात्र दुखापतीने त्याचा चांगलाच पिच्छा पुरवला. स्नायूबंद दुखावल्यामुळे तुटल्याने कधी गुडघ्याची तर कधी मांडींची तर कधी खांद्याची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली आहे. दुखापतीमुळे कधी कधी कुस्ती सुटते की काय असे वाटायचे परंतु राम सारंग सरांनी मनोबल वाढविले आणि माझ्यातील आत्मविश्वास पुन्हा वाढला. व्यायाम सरावातील सातत्य सुरू झाले दुर्दैवाने एकदा निवड चाचणीत पराभव पत्करावा लागला. तर गेल्या वर्षी निवड चाचणी वेळीच मानेला झटका बसल्याने बाहेर थांबावे. पण ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्याशिवाय थांबायचे नाही असा मनाचा निश्चय केला आणि सरावाला सुरवात केली.

  कोल्हापूरला राष्ट्रकुल कुस्ती संकुलात राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा कुस्तीचा कसून सराव पुन्हा सुरू झाला आहे. सांगली जिह्याचे नेतृत्व करणाऱया चंद्रहारची कोल्हापूर ही कर्मभूमी आहे. कर्मभूमीत घाम गाळून चंद्रहार आता पुन्हा कुस्तीच्या तयारीत व्यस्त झाला आहे. संकुलात तो नियमित सराव करतो आहे. पहाटे पाच ते सात, सकाळी नऊ ते अकरा, दुपारी चार ते सहा ही त्याच्या सरावाची वेळ आहे. रोजचा सराव सहा तासांचा आहे. त्यात तो कोणतीही तडजोड करत नाही. त्याचबरोबर नंदू आबदार, गुलाब आगरकर, यांच्या बरोबर आखाडय़ात लढतीवर भर असतो. शिवाय प्रोजेक्टरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलेले कुस्तीचे नियम नवीन तंत्रज्ञान डावांची माहिती तो घेत असतो. 

  2005 साली जिंल्हा परिषद निवडणुकीत राजकीय आखाडय़ात उतरलेल्या चंद्रहारने कसलेल्या राजकीय मल्लाला धोबीपछाड देऊन जिल्हा परिषदेचे मैदान मारले होते. अनेकांनी तो राजकारणात उतरल्याने कुस्तीचे नुकसान होणार असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु चंद्रहार याला अपवाद ठरला. राजकीय खुर्चीच्या मोहात न पडता लाल मातीची नाळ त्याने तोडली नाही. बघता बघता महाराष्ट्र केसरी किताबाला त्याने गवसणी घातली. 

 तीन वर्षांपूर्वी चंद्रहार लग्नग्नाच्या बेडीत अडकला. वैवाहिक जीवन जगत असताना पुन्हा कुस्तीच्या आखाडय़ात उतरला आहे. नुकताच एका गोड कन्या रत्न त्याच्या प्रपंच वेलीवर फुलले आहे. आई वडिलांचा आशीर्वाद पत्नीची प्रेरणा आणि राम सारंग यांचे मार्गदर्शन घेऊन तो नव्या उमेदीने तयारी स्पर्धेची करतोय. तीन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा मिळविणे हे आपले ध्येय असल्याचे तो सांगतो.

Related posts: