|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तबला जुगलबंदी व संतूरवादनाच्या बहारदार मैफिली

तबला जुगलबंदी व संतूरवादनाच्या बहारदार मैफिली 

29 व्या गिरिजाताई संगीत महोत्सवाची संस्मरणीय सांगता

सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा पत्रकार संघ आयोजित 29 व्या हिन्दूस्थानी शास्त्रिय संगीत समारोहामध्ये गोमंतकीय कलाकारांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रिय व आंतरराष्ट्रिय ख्यातीचे कालाकारासमवेत संगीत कला पेश करून स्वरब्रह्माचा अनोखा साक्षात्कार घडविला. हिन्दूस्थानी शास्त्रिय संगीताच्या क्षेत्रामध्ये गोमंतकीय कलाकार खूप काही करू शकतो याची ग्वाही मुग्धा गावकर, नरेश मडगावकर व ऋग्वेदा देसाई यांच्या सादरीकरणातून मिळाली अशा प्रतिक्रियाही रसिकांच्या उदंड उपस्थितीतील जाणकारांकडून उमटल्या. फर्मागुडी येथील गोपाळ गणपती मंदिराच्या प्राकारात एकाहून एक अशा सरस मैफली रसिकांच्या पसंतीस उतरल्या.

पं. नयन घोष व कु. ईशान घोष

घोष पितापुत्रांनी सादर केलेल्या निकोप तबलावादनाने स्व. गिरिजाताई संगीत संमेलनात नादब्रह्माची बरसातच श्रोत्यानी अनुभवली. तबला जुगलबंदी आणि नाटय़संगीत रजनी हे दोन विशेष कार्यक्रम रसिकांच्या मागणीवरून या संमेलनात आयोजित करण्यात येतात. यावर्षी पं. नयन घोष आणि इशान घोष यांनी केलेल्या सर्वांगसुंदर तबलावादनामुळे या संमेलनाच्या प्रतिष्ठेत मोलाची भर पडली. तबला जुगलबंदीसाठी त्यानी तीन ताल निवडला.

लखनऊ, दिल्ली, फरूखाबाद आणि अजराडा घराण्याच्या विविध रचना पेश करून त्यानी आपली मैफल रंगतदार बनविली. गत, सरपटय़ा, परण यांचे  ओघवते दर्शन घडविताना खंडयुक्त तुकडे, अनागत तालसंथा आणि अनवट व प्रचलित अशा बंदिशी व कत्यदे वाजवून घोष पितापुत्रांनी मैफल अक्षरश: खुलविली. एक संस्मरणीय जुगलबंदीचे श्रवण केल्याची तृप्ती रसिकांच्या चेहऱयावर दिसली. पं. घोष यांना लेहेरासाथ चिन्मय कोल्हटकर यांनी केली.

पं. विजय कोपरकर

पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पुणे येथील पं. विजय कोपरकर यांनी शास्त्रि य संगीताची श्रवणीय मैफल सादर केली. पुरीया कल्याण रागामधील विलंबित एकतालामध्ये निबद्ध असलेली ‘आज सोवन’ ही बंदीश त्यानी गायिली. आवाजातील मिठास सौदर्य स्थळांची उचल, डौलदार आलापी, सखोल तानाबाजी मनस्पर्शी सरगम यामुळे त्याचे गाणे म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच ठरली. आपल्या मैफलीत स्वानंदी रागातील ‘जियरा मानत नाही’ ही झपतालामधील रचना त्यानी समरसून मांडली. शेवटी भैरवीतील ‘आज राधा ब्ा्रिज को चली’ ही बंदीश अर्ध त्रितालामध्ये गाऊन आपली दिमाखदार मैफल आटोपली. दत्तराज सुर्लकर व ऋषिकेश फडके यांनी अनुक्रमे संवादीनी व तबल्याची समर्पक साथ दिली. तानपुऱयावर सुरेश गावडे होते.

मुग्धा गावकर

दुसऱया दिवशीच्या दुसऱया सत्रात गोव्यातील प्रतिथयश गायिका मुग्धा गावकर हीने ‘रसिया मारा अमला रा’ हा अहिर भैरव रागातील खयाल सामंजस्याचे दर्शन घडवित सादर केला. विलंबित एक तालामधील या रचनेत उत्तम स्वरलगाव, लयबद्ध आलापी, समर्पक तानबाजी आणि मनोहारी सरगम अतिशय तल्लिनतेने पेश केले. पुढे  ‘सावन को झटने लो’ हा छोटा खयाल तिने सादर केला. तिन्ही सप्तकात तेवढयात क्षमतेने फिरणारा कंठ, गळय़ातील लवचिकता यामुळे तिचे गाणे रसपरीपोषक ठरले. तबल्यावर पं. तुळशीदास नावेलकर व हार्मोनियमवर शुभम नाईक यानी जमून साथसंगत केली.

नरेश मडगांवकर

संतूरवादनाच्या क्षेत्रात मनसोक्तपणे वावरणाऱया नरेश मडगांवकरानी विद्युल्लतेप्रमाणे छेडलेल्या स्वरामुळे वातावरणात नादमयता पसरली. ताल झपतालामध्ये राग चारूकेशीच्या स्वरछटांची निर्मिती करताना सहजता, सफाई आणि आक्रमतेचा सुंदर नमूना त्यानी पेश केला. आलाप, जोड झाला ऐकविल्यानंतर त्यानी तीनतालामध्ये  द्रूतगत सादर केली. नादब्रह्माचा अभूत साक्षात्कार त्याच्या वादनामुळे झाला. त्याना त्यांचे बंधू सतीश मडगावकर यांनी तोडीस तोड साथ करून मैफल एका विशिष्ट उंचीवर पोहचविली.

ऋग्वेदा देसाई

सकाळच्या पहिल्या सत्रात ऋग्वेदा देसाई यांनी विलंबित एकतालामध्ये राग नटभैरव सादर केला. समजून उमजून केलेला स्वर विस्तार व बढत नीटसपणे केली. तिने आत्मविश्वासाने सादर केलेला तराणा रसिकांची दाद घेऊन गेला. उज्वल भवितव्याची चाहूल तिच्या गायकीत जाणवली. तिला संवादिनीवर महेश धामस्कर व तबल्यावर पं. तुळशीदास नावेलकर यांनी पोषक साथ दिली. शेवटच्या सत्रात नाटय़संगीत रजनीचा बहारदार कार्यक्रम झाला. त्यात प्रल्हाद हडफडकर, रघुनाथ फडके, करूणा गावकर, अंबर मिरिंगकर व दिव्या चाफडकर यांनी भाग घेतला.

 

Related posts: