|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ओखी वादळाचा गोवा किनारपट्टीला फटका

ओखी वादळाचा गोवा किनारपट्टीला फटका 

उत्तर व दक्षिण गोव्यातील अनेक शॅकचे नुकसान

प्रतिनिधी/ मोरजी, हरमल, वास्को, मडगाव

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन केरळ व तामिळनाडूत निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळामुळे गोव्यातील किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. समुद्राच्या पाण्यात रविवारी पहाटे बरीच वाढ झाली. त्यामुळे उत्तर व दक्षिण गोव्यातील अनेक समुद्रकिनाऱयांवरील शॅकना फटका बसला आहे. समुद्राचे पाणी शॅकमध्ये घुसल्याने किंमती वस्तू खराब झाल्या आहेत. उत्तर गोव्यात मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली असून अंदाजे आकडा 50 लाखांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. दक्षिण गोव्यातील केळशी व मोबोर समुद्रकिनाऱयावरील अनेक शॅकमध्ये पाणी घुसले. कोलवा, बाणावली, माजोर्डा, बेतालभाटी समुद्रकिनाऱयावर देखील पाणी वाढल्याचे आढळून आले.

  रविवारी सकाळी बसला जोरदार तडाखा

 ओखी चक्री वादळाचा तडाखा रविवारी सकाळी मोरजी, मांदे व केरी किनारी भागाला बसला. त्यामुळे अचानक समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पूर्ण पाणी शॅकमध्ये घुसले, लाकडी खाटा, खूर्च्या वाहून गेले. किनाऱयावर उतरायला जागाच उरली नव्हती, सरकारी यंत्रणा मदतीला धावून आली नाही, त्यामुळे अनेकांचे लाखो रुपये नुकसान झाले. त्या परिस्थितीत जीवनरक्षक मात्र लाल रंगाचे बावटे घेवून पाण्यात उभे राहून पर्यटकांना समुद्रात उतरायला हरकत घेत होते, मिळेल ते समान वाचवण्यासाठी व्यावसायिकांची धडपड किनारी भागात दिसून येत होती.

मोरजी, हरमलमध्ये धडकल्या लाटांवर लाटा

सकाळी 9 वाजल्यापासून समुद्राला अचानक उधाण आले त्यात किनारी भागातील होडय़ांना मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण झाला. शिवाय शॅकना मोठी किंमत मोजावी लागली. केरी भागातील विलास आरोलकर, समीर हरजी, अमर तळकर, सुजित कलंगुटकर, योगश तळकर, बबन तळकर, हरमलमधील दशरथ कोचरेकर, गॉडविन सांताना डिसोझा, जॉनी मोंतेरो, सुहास प्रभू व इतर तीन मिळून हरमल येथील आठ शॅकचे नुकसान किमान 10 लाख, केरी किमान 7 लाख, मांद्रे किमान 10 लाख व मोरजी किमान 15 लाख रुपयांचे नुकसान झाले.

हरमलचे माजी सरपंच डेनियाल देसौझा यंनी प्रतिक्रिया देताना सरकारला किमान तीन लाख रुपये खर्च देऊन या रेस्टॉरंटना परवाने द्यावे लागतात. आज नैसर्गिक तडाख्यातून एक एक व्यावसायिकाचे सव्वालाख रुपये नुकसान झाले, शिवाय दिवसाचा पूर्ण व्यवसायही बुडाला. सध्या पौर्णिमेची जोरगत असल्याने आजही रात्री पाणी किनाऱयांवर येण्याची भीती डेनियाल यांनी व्यक्त केली.

मोरजीत टॅक्सी व्यवसायावरही परिणाम

मोरजी टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष संजय कोले यांनी प्रतिक्रिया देताना ऐन पर्यटन हंगामात सरकारकडून पर्यटन टॅक्सी व्यावसायिकांसमोर स्पीड गर्व्हनन्स मीटर ही सक्ती केली जात आहे तर दुसऱया बाजूने पर्यटक ग्राहक मिळवताना अडचणी आहेत, त्यात भर पडली ती आजच्या घटनेमुळे. दिवसभर भाडे मिळाले नाही, किनारी भागात पर्यटक नाहीत ही स्थिती उद्यापर्यंत असू शकते मांद्रे आमदार दयानंद सोपटे यांनी प्रतिक्रिया देताना किनारी भागात ज्यांना नुकसानी झाली त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 मोरजीत मोठा तडाखा

मोरजी किनारी भागात तेंमवाडा येथे सहा तर विठ्ठलदास किनारी 2 मिळून आठ शॅकना धोका निर्माण झाला. त्यात संदीप मोरजे, निवृत्ती मोरजे, नंदकिशोर मोरजे, डिसोझा तर विठ्ठलदास येथी गाब्रीयाल फर्नांडिस व श्री वाल्येन याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. काहीजण मदतीला धावून आले होते तर काहीजण पाण्याचे चित्रिकरण करण्यात मग्न होते असे चित्र दिसत होते.

मोरजीचे पंच विलास मोरजे यांनी सांगितले की किनाऱयापासून वरच्या बाजूला मोठय़ा प्रमाणात सरकारी जागा आहे. त्याठिकाणी त्यांना शॅक घालण्याची परवानगी द्यायला हवी. दरवर्षी भरती किंवा अमावास्या आणि पौर्णिमेला समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते व पाणी थेट निकारी भागातील शॅक व पारंपरिक मासेमारी करणाऱया होडय़ा व झोपडय़ांना धोका निर्माण होत असतो. त्यामुळे वरच्या बाजूला शॅक घालण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

पर्यटन विकास महामंडळाचे संचालक जीत आरोलकर यांनी मोरजी किनारी भागात भेट देवून परिसराची पाहणी केली. शिवाय किनाऱयापासून वरच्या बाजूला भविष्यात शॅक देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून नुकसानी मिळवून देणार असल्याचे सांगितले.

हरमलमध्ये आठ शॅकना बसला तडाखा

‘ओखी’ वादळाचा तडाखा हरमल समुद्रकिनारी भागातील शॅक्स व रेस्टॉरंट चालकाना बसल्याने त्यांना बरेच नुकसान सोसावे लागले आहे. चक्रीवादळाबाबत अजूनही सावधानतेचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने व्यावसायिक व रहिवाशांनी प्रचंड धास्ती घेतली आहे. हरमलमध्ये किनारी भागातील 8 शॅक्सचे प्रत्येकी लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

शनिवारपासून धोका सुरु

शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास किनारी भागात समुद्राने रौद्र रुप धारण केले. साधारण रात्री आठ वाजेपर्यंत पर्यटक किनारी भागात मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिवाय कित्येक जण ड्रम सर्कलकडे मौजमजा करीत होते. पर्यटन खात्याकडून परवाने प्राप्त शॅक्सचा व्यवसाय चालू होता. काही जणांनी सामानाची जमवाजमव केली होती. रात्री 9 च्या सुमारास अचानक घोंगावणाऱया लाटा शॅक्समध्ये धडकल्याने, पर्यटक गिऱहाईके व शॅक्स चालकाची भंबेरी उडाली. लाटांचे पाणी शॅक्समधील विजेवरील उपकरणांना लागल्याने नुकसान झाले. शॅक्समधील रेफ्रिजिरेटर, डीपफ्रीज, ओव्हन तसेच स्पीकर व संगीत वाद्यांचे नुकसान झाले. रविवारी दुपारपर्यंत समुदाचे पाणी शॅक्स परिसरात होते.

नुकसान भरपाईची मागणी

पंच इनासियो डिसोझा यांनी नैसर्गिक आपत्तीवर चिंता व्यक्त केली. सरकारने व पर्यटन खात्याने शॅक चालकांना नुकसान भरपाई द्यावी. शुल्कापोटी भरलेली रक्कम माफ करावी, अशी प्रतिक्रिया डिसोझा यांनी दिली.

केळशी, मोबोर येथे मोठी नुकसानी

ओखी चक्रीवादळामुळे गोव्यातील समुद्राच्या पाण्यात रविवारी पहाटे बरीच वाढ झाली व समुद्राचे पाणी किनारपट्टीवरील शॅकमध्ये घुसले. त्यामुळे शॅकमालकांना नुकसानीचा फटका बसला. दक्षिण गोव्यातील केळशी व मोबोर समुद्र किनाऱयावरील अनेक शॅकमध्ये पाणी घुसल्याची माहिती हाती आली. कोलवा, बाणावली, माजोर्डा, बेतालभाटी समुद्रकिनाऱयावर देखील पाणी वाढल्याचे आढळून आले.

रविवारी पहाटे समुद्राच्या जोरदार लाटा समुद्रकिनाऱयावर येऊन धडकू लागल्याने बऱयाच ठिकाणी पाणी घुसले. केळशी व मोबोर परिसरात याचा जास्त परिणाम दिसून आला. येथील शॅकमध्ये ठेवण्यात आलेले बरेच सामान खराब झाले. खास करून पर्यटकांना विश्रांतीसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चा व पलंग समुद्राच्या पाण्यामुळे खराब झाले. जोरदार लाटामुळे समुद्रकिनाऱयावरील रेती वाहून गेल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली. मात्र कुठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नसल्याची माहिती पोलिसांनी तसेच अग्निशामक दलाने दिली.

संध्याकाळी जोरदार लाटा येण्याचा प्रकार कमी झाल्याने शॅकमालकांना दिलासा मिळाला. समुद खवळेला राहिल्याने मच्छीमारांनीदेखील समुद्रात जाण्याचे टाळले.

बायण किनाऱयावरही फटका

वादळी हवामानाचा परिणाम मुरगावातील बायणा किनाऱयावरही दिसून आला. गेले दोन दिवस या किनाऱयावर जोरदार लाटा आदळू लागल्या आहेत. पाण्याची पातळी या लाटांमुळे वाढलेली असून दृष्टी मरिन कंपनीच्या कर्मचाऱयांना त्यांच्या तरंगत्या जेटीचे काम खराब हवामानामुळे थांबवावे लागले. बायणा किनाऱयावर संध्याकाळी व रात्री मोठय़ा लाटा येत असल्या तरी किनाऱयावरील वाळुला झळ अद्याप बसलेली नाही. किनारा सुरक्षित असून रोजच्याप्रमाणे काल रविवारीही संध्याकाळी व रात्रीपर्यंत किनाऱयावर लोकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होती.

वास्कोत तरंगत्या जेटीच्या कामात व्यत्यय

  खवळलेल्या समुद्रातून मोठमोठय़ा लाटांचे तडाखे बायणा किनाऱयाला मागच्या दोन दिवसांपासून बसत आहेत. रात्रीच्या वेळी पाण्याची पातळी बरीच वाढत आहे. या किनाऱयावर उभारण्यात आलेल्या दृष्टी मरिन कंपनीच्या जेटीच्या कामावरही खराब हवामानाचा परिणाम झाला. या जेटीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. येत्या पंधरा दिवसांत ही जेटी कार्यान्वीत करण्यात येणार आहे. मात्र, खवळलेल्या समुद्रामुळे त्यांना काम थांबवावे लागले आहे. हवामान सुरळीत झाल्यानंतरच पुन्हा हा पदपुल जोडून कामाला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती तेथील कर्मचाऱयांनी दिली.

Related posts: