|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वेदांत खाण दुर्घटनेतील ऑपरेटर अद्याप बेपत्ता

वेदांत खाण दुर्घटनेतील ऑपरेटर अद्याप बेपत्ता 

जीपगाडी सापडली रिपर मशिनचा थांगपत्ता नाही

प्रतिनिधी/ धारबांदोडा

कोडली – दाभाळ येथील सेसा वेदांत खाण कंपनीच्या उत्खनन पिठामध्ये मशिनसह गाढला गेलेला मनोज अनंत नाईक (42, रा नाल्लकोंड-खांडेपार) हा मशिन ऑपरेटर अद्याप सापडलेला नाही. रविवारी पूर्णदिवस यंत्राच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र दिवस अखेर मातीच्या ढिगाऱयाखाली सापडलेली एक जीपगाडी सोडल्यास रिपर मशिन व बेपत्ता मनोजचा थांगपत्ता लागू शकला नाही. आज सोमवारी पुन्हा शोध मोहिम निरंतर सुरु राहणार आहे. 

 कोडली येथील वेदांत खाणीवर शनिवारी सायं. 5.30 वा. सुमारास ही घटना घडली होती. खाणीवरील रिजेक्टेड मालाचा भराव टाकण्याचे काम या रिपर मशिनद्वारे सुरु होते. यावेळी त्याठिकाणी कंपनीचा एक अधिकारी साईटवर थांबून मशिन ऑपरेटर मनोज याला मार्गदर्शन करीत होता. याचवेळी बाजूच्या मातीचा ढिगारा खचल्याने रिपर मशिन उत्खननाच्या पिठात कोसळले. साईटवरील अधिकाऱयाने प्रसंगावधान राखून बाजूला धाव घेतल्याने सुदैवाने तो बचावला. मात्र त्याची जीपगाडी ढिगाऱयाखाली सापडली. रिपर मशिनसह पिठाच्या दलदलीत फसलेला ऑपरेटर मनोज अद्याप बेपत्ता आहे. घटनेनंतर काही वेळातच कंपनीने शोधमोहीम सुरु केली. रविवारी नौदलाचे पथक व इतर यंत्रणांचीही मदत घेण्यात आली. अद्यायावत क्रेन आणून पिठात फसलेल्या मशिन व ऑपरेटरचा दिवसभर शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सायंकाळपर्यंत त्याला यश आले नव्हते.

तर कदाचित दुर्घटनेतून वाचला असता

मनोज हा गेल्या काही वर्षांपासून सेसा वेदांत कंपनीत कामाला आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तो सकाळी पहिल्या पाळीवर कामाला जाणार होता. मात्र काही काम निघाल्याने त्याने पाळी बदलून दुपारच्या दुसऱया पाळीवर तो कामावर रुजू झाला होता. दुर्दैवाने याच फेरबदलामुळे तो या दुर्घटनेत सापडला. घटनेनंतर बराचवेळ त्याच्या मोबाईलवर रिंग वाजत होती. त्यामुळे त्यादृष्टीनेही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याला फारशे यश आले नाही, अशी माहिती त्याच्या काही निकटवर्तीयाकडून मिळाली आहे. मनोजचे निकटवर्तीय व काही ग्रामस्थांनी रविवारी सकाळपासूनच घटनास्थळवर ठाण मांडली होती. मात्र सुरक्षेच्यादृष्टीने मदत पथके सोडल्यास इतर कुणालाच घटनास्थळाजवळ सोडण्यात आले नव्हते.

Related posts: