|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दूधवाढीच्या आणखी 200 लस जप्त

दूधवाढीच्या आणखी 200 लस जप्त 

प्रतिनिधी / बेळगाव

गायी, म्हशींना दूधवाढीसाठी अपायकारक लस दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. केवळ दोन दिवसांत सीसीबीच्या अधिकाऱयांनी आणखी 200 लस जप्त केल्या असून कारवाईनंतरही हा धोकादायक प्रकार सुरुच असल्याचे उघडकीस आले आहे.

कोनवाळ गल्ली येथील गंगाधर सिद्धाप्पा गवळी (वय 42) याच्या घरातून शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व औषध नियंत्रण विभागाचे दीपक गायकवाड व त्यांच्या सहकाऱयांनी 293 बाटल्या ऑक्सीटॉसीन ही अपायकारक लस जप्त केली होती. दोन दिवसांतच आणखी 200 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयाची परवानगी घेवून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. दूग्ध व्यवसाय करणाऱया अनेकांनी दूध वाढीसाठी या लसीचा सातत्याने वापर केला आहे. रविवारी ताब्यात घेण्यात आलेला साठा गंगाधरनेच मागविला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ट्रकमधून पार्सल येताच पोलिसांनी ते जप्त केले आहे.

 गंगाधर गवळीने शहरातील इतर गवळय़ांनाही आपण ती लस विकत होतो, अशी कबुली पोलीस व औषध नियंत्रण विभागाच्या अधिकाऱयांकडे दिली आहे. गंगाधरने 293 चा साठा जप्त होण्याआधीच आणखी 200 बाटल्या पाठविण्यासाठी मागणी नोंदविली होती. त्याच्या मागणीवरुन पुणे येथून 200 बाटल्यांचे पार्सल पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांतील प्रकार लक्षात घेता पोलीस व जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून मानवी जीवाशी खेळ करणाऱयांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. औषध नियंत्रण विभागातील अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अनेक आजारांना निमंत्रण देणाऱया या धोकादायक प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र धास्तावले आहेत.

Related posts: