|Sunday, October 21, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कंसाच्या दरबारात

कंसाच्या दरबारात 

भगवंताचे अनुपम लीलाचरित्र वर्णन करताना नामदेवराय पुढे म्हणतात –

बोलावूनी अवघींयातें । कंस पाहे विचारातें ।।

कोणीएक रे बोलती । आह्मा ठावी देववस्ती ।।

जेथें पुराण कीर्तन । गाईब्राह्मण करिती यज्ञ ।।

तेथें असे नारायण । वधूं तयासी जाऊन ।।

वैरी सहजची मरेल । ऐसे बोलताती बोल ।।

कंसा मानवलें जाण । करा मजसाठीं यत्न ।।

नामयाच्या छंदें । नंद करितो आनंद ।।7।।

वसुदेव देवकीला बंदीगृहातून मुक्त केल्यावर कंसाने झाल्या घटनेचा खूप विचार केला. ती रात्र उलटून गेल्यावर कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलावले आणि योगमायेने जे सांगितले होते, ते सर्व त्यांना कथन केले. कंसाचे मंत्री फारसे शहाणे नव्हते. दैत्य असल्यामुळे स्वभावतःच ते देवांचा द्वेष करीत. आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकल्यावर ते देवशत्रू कंसाला काय म्हणाले याचे श्रीमद्भागवतात आलेले विस्तृत वर्णन असे-महाराज! असे असेल तर आम्ही आजच शहरे, गावे, गवळय़ांच्या वस्त्या इत्यादी ठिकाणी जेवढी लहान मुले असतील, मग ती दहा दिवसांच्या आतील किंवा बाहेरची असोत, सर्वांना आजच मारून टाकतो. रणांगणाला भिणारे देवगण युद्धाची तयारी करूनही काय करणार आहेत? ते तर आपल्या धनुष्याचा टणत्कार ऐकूनच नेहमी घाबरलेले असतात. जेव्हा आपण त्यांच्यावर बाणवर्षाव करून त्यांना घायाळ करता, तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी युद्धभूमी सोडून देव पळू लागतात. काही देव तर आपली शस्त्रास्त्रे जमिनीवर टाकून हात जोडून दीनपणा प्रकट करू लागतात. तर काही जण शेंडय़ा सोडून व कासोटे फेडून आपल्याला शरण येतात आणि म्हणतात की, आम्ही भयभीत झालो आहोत. आमचे रक्षण करा. जे शत्रू शस्त्रास्त्रप्रयोग विसरले आहेत, ज्यांचे रथ मोडून पडले आहेत, जे भयभीत झाले आहेत, जे लोक युद्ध सोडून विमनस्क स्थितीत आहेत, ज्यांची धनुष्ये मोडली आहेत किंवा ज्यांनी युद्धाकडे पाठ फिरविली आहे, अशांना आपण मारीत नाही. जिथे भांडण तंटा नसेल तेथेच देवांचे शौर्य. रणभूमीच्या बाहेरच ते फुशारकी मारतात. ते, तसेच एकांतवासात राहणारा विष्णू, वनवासी शंकर, अल्प सामर्थ्य असणारा इंद्र आणि तपस्वी ब्रह्मदेव यांच्यापासून आपल्याला काय भय असणार आहे? आमचे मत असे आहे की, असे असले तरी देवांची उपेक्षा करता कामा नये; कारण ते आपले शत्रू आहेत. म्हणून त्यांचे मूळच उखडून टाकण्यासाठी आपण आमच्यासारख्या विश्वासपात्र सेवकांची नेमणूक करावी. जेव्हा शरीरात रोग उत्पन्न होतो आणि त्याची उपेक्षा केल्यामुळे आपले मूळ घट्ट करतो आणि मग असाध्य होतो, किंवा इंद्रियांची उपेक्षा केल्यावर त्यांचे नियंत्रण करणे कठीण होते, त्याप्रमाणे जर शत्रूची आधी उपेक्षा केली तर तो आपले सामर्थ्य वाढवितो आणि मग त्याचा पराभव करणे अवघड होऊन बसते. देवांचा आधार विष्णू आहे आणि जिथे धर्म आहे, तिथे तो राहतो. वेद, गाय, ब्राह्मण, तपश्चर्या आणि ज्यामध्ये दक्षिणा दिली जाते ते यज्ञ; ही धर्माची मुळे होत.

Related posts: