|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » समायोजित शिक्षकाना हजर न केल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई

समायोजित शिक्षकाना हजर न केल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई 

प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांची माहिती

शाळेत शिक्षक हजर न झाल्यास सेवा होणार संपुष्टात

प्रतिनिधी / ओरोस:

अतिरिक्त समायोजित माध्यमिक शिक्षकांना हजर करून न घेणाऱया मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी एस. एन. मंद्रुपकर यांनी दिली.

सन 2016-17 च्या पटसंख्येनुसार जिल्हय़ातील अनेक माध्यमिक शाळातील शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया गतवर्षी थांबविण्यात आली होती. चुकीच्या पद्धतीने या शिक्षकांना अतिरिक्त ठरविले जात असल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता.

दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रभारी शिक्षणाधिकारी श्री. मुळीक यांनी 24 नोव्हेंबर रोजी 86 शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविली होती. यापैकी नियुक्त्या देण्यात आलेल्या अनेक शिक्षकांना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी हजर करून घेण्यास नकार दिला आहे. याबाबतची पत्रेही त्यांनी संबंधित शिक्षकांना दिली होती.

मुख्याध्यापकांनी हजर करून घेण्यास नकार दिल्याने ‘ना घरका ना घाटका’ अशी परिस्थिती झालेल्या शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांचे लक्ष वेधले होते. शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनीही या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, शनिवारी उपशिक्षणाधिकारी श्री. माने यांनी याबाबत सोमवारी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, या शिक्षकांनी सोमवारी सकाळीच माध्यमिक शिक्षण विभागात हजेरी लावत प्रभारी शिक्षणाधिकारी मंद्रुपकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित शिक्षकांना हजर करून घेण्याबाबतचे फेरपत्र मुख्याध्यापकांना दिले असल्याचे स्पष्ट केले व शिक्षकांनी शाळांशी संपर्क साधावा असे आदेश दिले. तरीही त्या मुख्याध्यापकांनी हजर करून घेण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच सध्याचे रिक्त असलेले पद व्यपगत केले जाईल, असेही स्पष्ट केले.

शिक्षणाधिकाऱयांच्या आदेशानुसार शिक्षक शाळेवर हजर न झाल्यास त्यांची सेवा आपोआप संपुष्टात आली आहे, असे समजण्यात येईल, असेही शिक्षकांना देण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नोकरीची चिंता लागून राहिलेल्या कर्मचाऱयांची मात्र शाळा आणि शिक्षण विभागामधील वादात ससेहोलपट होत आहे.

Related posts: